Categories

Aeroplanes

Aeroplanes

Friday 27 February 2009

वेळ घालवण्याचे माझे - सध्याचे - उद्योग...

हा.... त्याचं काय आहे.. औफिसमधुन घरी गेल्यानंतर स्कायवरचे सगळे - अवॅलेबल - चॅनेलस बघणे हाच मोठा उद्योग आहे.. पण सालं ते डबडं गेला आठवडा झाला बंद पडलय... म्हणे सॅटेलाइट सिग्नल मिळत नाही! तसं फार वाईट वाटत नाही.. कारण, इन-मिन ३-४ चॅनेल दिसतात.. स्टार गोल्ड - ज्याच्यावर तेच तेच सिनेमे कितीतरी वेळा दाखवताहेत... आणि मी बघतोय.. दुसरा - स्टार वन आणि उत्सव ..यांच्यावरही भारतात संपलेल्या किंवा बंद पडलेल्या मालिका दाखवल्या जाताहेत.. एक दोन मुझिक चॅनेल - ९-एक्स... तेच का टाईमपास.

बोलायला पण कुणी नाही... तसा यांच्याकडे वेळच नसतो म्हणा.. नुसतं हाय- हॅलो - आणि बाय एवढच काय ते पर्स्नल बोलणं...  नाही तर - तेच रोजचं - प्रोजेक्ट - डेड्लाईन - अपडेटस - चेन्जेस - ब्ला ब्ला ब्ला... हुर्रर्र्रर्र..!

मग सदसदविवेक बुध्दी गहाण ठेवुन मी आजकाल यु-ट्युब वरुन मस्त मराठी सिनेमे पहात असतो... रोज एक... पुण्यात जे सिनेमे बघायचे राहुन गेले ते सध्या पाहुन घेतोय. या आठवड्यांत -
सोमवारी - सखी
मंगळवार - एक उनाड दिवस
बुधवार - डोंबिवली फास्ट
गुरुवार - आबा - झिंदाबाद
शुक्रवार - चकवा  [बघणारच आहे आज!]
शनिवार - अजुन ठरवले नाही, पण "वळु" पहायचाय..

..... अरे हो, मराठी सिनेमांसांठी मराठीट्युब नावाची वेबसाइट आहे.

रविवारी जरा केंब्रिज - सिटी सेंटरमध्ये जाईन म्हणतोय... असंच जरा - विंडो' शौपिंग आणि नयनमटक्का...!

तसा रेडी-टु-इट चा  पण कंटाळा आलाय... पण काय करणार... नाईलाज आहे.... अधुन मधुन फिश आणि चिप्स किंवा फ्राइड चिकन हेच ते काय जरा बदल.. मायला, पण या कोंबड्यांना टेस्टच नाही राव, अगदिच सपाक आहेत..! रविवारी मात्र मस्त कोल्हापुरी स्टाइलमध्ये चिकन बनवतो. तसे आपल्याकडचे सारे मसाले मिळतात म्हणुन बरे... नाहीतर इमॅजिन करा - आपल्याकडच्या मसाल्या बिगर - कोल्हापुरी चिकन अन् रस्सा .. कसा लागेल?

व्हेज - लोकांनी या नौन-व्हेज डिस्कशन बद्दल मला माफि करावी!

असो... रविवारी पुन्हा भेटु ...

Monday 23 February 2009

लक्ष्मणराव देशपांडे यांना लंडनहुन श्रद्धांजली!

....... आज काल बातम्या जरा उशिराच मिळतायत... आत्ताच लक्ष्मणराव देशपांडे यांच्याबद्द्ल महेंद्रच्या ब्लौगवर वाचले... आता तसे म्हणाल तर ही बातमी तशी अनेक ब्लौगवर वाचायला मिळाली असती .. मात्र एका पर्स्नल टच मध्ये वाचायला अन् पहायला महेंद्रच्याच ब्लौगवर मिळाले... महेंद्रच्या ब्लौगवरती "वराड निघालय लंडनला" चा विडिओ सुध्या आहे... जरुर पहा..! ..असो....

लक्ष्मणराव देशपांडे यांना लंडनहुन माझ्याबरोबर त्यांच्या अनेक चाहत्यांकडुन भावपुर्ण श्रद्धांजली!

... "वराड निघालय....." मी आमच्या शाळेच्या दिवसांमध्ये पाहिलेलं - मामाच्या गावी. मामाचं गांव, शेतावरचं घर, आणि आम्ही १५ बच्चे कंपनी [३ मामा आणि त्यांची ५+४+५ आणि मी = १५ मुलं, थोडक्यात हे घर म्हणजे खाटाल्यांचं!] आणि या नाटकाचं सेट-अप अगदी सेम असावं असं... !

तर, हे नाटक गावांमध्ये इतकं प्रसिद्ध झालं होतं की - बरेच दिवस आम्ही ही "त्या" हिंग्लिश स्टाइल मध्ये बोलत होतो... जवळजवळ रोजच्या रात्रीच्या जेवणानंतर , अंगाणातल्या वाळुवर गोल करुन आम्ही टेप-रेकार्डवर ही कॅसेट ऐकत असू. ..... बरेच दायलौग तोंडपाठ होते.... ब-याच वेळा "होल वावर इज अवर!" यासारखे डायलौग असायचे.. मोठी मंडळी कधी कधी आमच्या थिल्लरपणाला वैतागुन म्हणायची "च्या आयचं बावळंट! नुसतं आसलंच बोला... लक्षणं काय नीट नाहिती.... आवतार बघा... आन् लंडनचा आव आणत्याती.... हुड.." .... आज लक्ष्मणरावांची आणि त्या वेळेची आठवण येवुन गेली....!

Friday 20 February 2009

माझ्या ट्रेन किस्स्याची आठवण...

महेंद्रच्या ब्लौगवरची "५ सेकंद -इन लाइफ ऍंड डेथ" ही पोस्ट वाचता वाचता, माझ्या ट्रेन किस्स्याची आठवण झाली....

... अंदाजे १९९४ च्या उन्हाळ्यातला हा किस्सा... आपल्या "देवाच्या गाडीने *" रेल्वेने मी मामाच्या गावावरुन माझ्या गावी चाललो होतो. "बिरोबाची जत्रा" असल्याने ट्रेन अगदीच खचा खच भरलेली. तसा माझा गाव म्हणजे तिसरा थांबा. अगदी दरवाज्याच्या तोंडात उभा राहण्यापुर्ती जागा मिळाली...दोन्ही हातानी दरवाजाजवळचा तो खांब पकडला होता. तर, उन्हाळ्याचे दिवस आणि मला सौलिड घाम आलेला... ! शिवाय महत्त्वाचं म्हणजे - त्यावेळी माझ्या तळपायाला खुपच [घाम?] पाणी सुटायचे... जरा कपाळावरचा घाम पुसायला एक हात वर नेला आणि शेजारच्याचा धक्का लागला... मग काय.. पायातील चप्पल आधीच स्लीपरी झालेली... गेला तोल.. घसारलो आणि गड-गडा लोळत त्या पटरीच्या उतारावरुन खाली... !!

........................ गाडीच्या त्या शेवटच्या डब्याकडे पहात.. कसा बसा उभा राहिलो.. उजव्या पायातली चप्पल आधीच पडल्यामुळे एक दगडाची खापरी चांगलीच तळव्यात घुसली होती.. कपडे झाडले आणि ती उजव्या पायाची चप्पल शोधली.... नशीब - सापडली लगेच.. आता प्रश्न होता त्या गावच्या स्टेशनपर्यंत पोहचायचा... रस्ता एकच - रेल्वेचा मार्ग - रेल्वे रुळांच्या कडं-कडंनी अंदाजे ४ कि.मी. चालत गेलो. गावांतुन परत मामाच्या गावाला जाणारी एक प्रवासी वाहतुक करणारी जीप पकडली आणि बॅक टु मामाचे घर! अर्थात घरी पोहोचल्यावर दवाखाना आणि मलम-पट्टी झालीच... मायला ... त्या डौक्टरचे इंजेक्शन मला पायाला झालेल्या जखमेच्या दुखन्यापेक्षा जास्त वेदनादायक वाटले होते..!

असो... त्या नंतर बराच काळ रेल्वेची धास्तीच घेतली होती.. मागच्या वेळी लंडनच्या त्या ट्युबमध्ये बसतानाही या किस्स्याची एक आठवण झाली होती हे नक्की! ...

* देवाची गाडी - मिरज - पंढरपुर दरम्यान वाहतुक करणारी आगगाडी. सध्या हा मार्ग ब्रौडगेज बनतोय म्हणे, आणि ती देवाची गाडी - मिरजच्या कारखान्यात - की - संग्राहालयात उभी आहे!


Wednesday 4 February 2009

केंब्रिज - कँबोर्न - स्नोफौल चे फोटो...



हुम्म्म.... जरा आरामात लिहिन म्हणतो.. तो पर्यंत तुम्ही फोटो बघुन घ्या .. कसं..?