स्वाईन फ्लु चा भीतीने म्हणा अगर बाऊने म्हणा, सप्टेंबर महिना भटकंतीशिवायच गेला. आता सलग आलेल्या गेल्या लाँग विकेंडचा प्लान बनवायलाच पाहिजे असं ठाम मत झाले. मात्र गुडघ्याचं दुखणं त्यावर अडचण आणतं की काय असं राहुन राहुन वाटतच होतं. पण मन मानतच नव्हते. अगदी क्नी पॅड घालुन मी मनाचा ठीय्या करुन जायचेच ठरवले आणि बर्याचवेळा प्लान करुन ऐनवेळी बदललेला - ढाकचा ट्रेक फायनल झाला. नेहमीप्रमाणे मेला-मेली झाली. मात्र लॉंग विकेंडचे काही लोकांचे प्लान आधिच बनले असल्यामुळे बरेच जण यावेळी स्वॉरी म्हणाले.
तरीपण मी, सुरिंदर, सिद्दार्थ [पुण्याहुन], बल्लु [विशाल द जायंट], स्टीव्ही [मुंबईहुन] आणि विशाल, अंजन आणि कपिल लोणावळ्याहुन असा ग्रुप बनला. ऐनवेळी गाडी न मिळाल्याने लोकलने लोणावळ्यापर्यंत जायचे आणि तिथुन पुढची वाटचाल सुरु करण्याचे ठरले.
सकाळची ६.१५ ची लोकल हुकली त्यामुळे ६.५० ची डेक्कन क्विन पकडुन आम्ही लोणावळयाला पोहोवचलो. बाकी मंडळी वाटच बघत होती. स्टेशनच्या बाहेरच मस्त गरमागरम वडापावचा नाष्टा करुन आमची गाडी ढाकच्या दिशेने रवाना झाली. ढाकला जाण्यासाठी आम्ही लोणावळ्याहुन कामशेतकडे जाणारा रस्ता पकडला. रस्त्यात
तुंगार्ली " वादिवले धरण " लागते, हे आपण बरोबर रस्त्यावर असल्याचा संकेत समजावा! तसे, कर्जतहुनही ढाकला जाता येते. शिवाय " सांडशी " गावातुनही रस्ता आहे. अंदाजे ९.०० वाजता पायथ्याशी असणार्या "जांभवली" गावात गाडी लाऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली. ढगाळ वातावरण, स्वच्छ हवा ट्रेक, चारी बाजुनी दिसणारे डोंगर आणि वाटेच्या दोन्ही बाजुला पिवळ्या धमक फुलाचा तांडवा जणु आमचे स्वागतच करत होते.
सभोवताली पसरलेला निसर्गाचा हिरवागार शालु..... वेगवेगळ्या रंगांची फुले, जणु त्या शालुवर रंगीत बुट्टी सारखे शोभत होते. सिनेमाशिवाय असे लोकेशन पाहणे सध्या तरी दुरापास्तच वाटते. डीडीएलजे मधील तो पिवळ्या धमक फुलांचा सिन तुमच्या लक्षात आहे का? अगदी तसाच किंवा त्यापेक्षाही उजवा निसर्ग आम्ही अनुभवत होतो. काही वर्षांपुर्वी राजगडच्या रस्त्यावर फुलांचा असा मखमली गालिचा पाहिला होता. या सिजनमध्ये यायचे ठरवल्याने आम्ही स्वत:ला धन्य समजत होतो.
गावाच्या मागच्या बाजुने जाणारी छोटीशी वाट बहिरीच्या गुहेकडे जाते. रस्त्यात अनेक छोटे धबधबे लागतात. त्यांचे ते शांत वाहणारे पाणी, सभोवताचा हिरवागार परिसर, मला नक्की शब्दांत मांडता येणार नाही. सगळे वातावरण अगदी अवर्णनिय! काही अंतर चालुन गेल्यानंतर थोड्याशा सपाट जमिनीवर दोन रस्ते लागतात. उजव्या हाताने तुम्ही ढाकच्या दिशेने जाता तर डाव्या बाजुने गेल्यास कोंढाणेश्वराचे मंदीर लागते. आम्ही कोंढाणेश्वराचे दर्शन घेऊन पुढे जाण्याचे ठरविले आणि डाव्या रस्ताने चालु लागलो. रस्त्यात अगदीच एक-दोन घरे लागतात आणि बोटावर मोजण्याइतकी माणसे! एका मावशींना मंदीराचा सस्ता विचारुन आम्ही मंदीरात पोहोचलो.
मंदिरारच्या बाहेरच एका आजीने आम्हाला मंदिरात जायचे असल्यास दक्षिणा द्यावाच लागेल असे सांगितले. आम्ही काही हरकत न घेता दर्शन घेतले. आजींशी बोलताना - अगदी पाच - दहा मिनिटे ओरडुन - ओरडुन सांगितल्यावर आम्हांस समजले की त्यांचा ऐकुच येत नाही! तशातही विशालने हार न मानता त्यांच्याकडुन ढाकचा रस्ता विचारुनच घेतला!! मंदिराच्या आसपासचा परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे. पाठीमागुनच एक छोटासा पाण्याचा धबधबा किंवा झरा - ओढा म्हणता येईल असे वाहते पाणी आहे. शिवाय दोन कुंडासारखे डोह ही आहेत. मंदिराच्या समोरचा नंदी अगदी नजरेत भरावा असा मोठा आहे. आसपास मंदिराचे काही अवशेष विखुरलेल्या अवस्थेत पडुन आहेत. दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या पाठीमागुन जाणार्या रस्त्याने ढाकची वाटचाल सुरु ठेवली.
रमत गमत - फोटोगिरी करत आमची वाटचाल चालु होती. आता भुक नावाची प्रक्रिया जोरात चालु असल्याचे जाणवु लागले होते म्हणुन आम्ही एक पठार पाहुन मस्त जेवणाचा प्रोग्राम ठेवला. लोणावणळ्यात घेतलेले वडापाव [
पंकजच्या भाषेत - बातम्या खाणे ;-) ] आणि अंजनने आणलेले जेवण संपविण्याचा बेत केला. मग थोडी विश्रांती घेऊन पुढच्या चालीसाठी तयार!
अंदाजे एक - दिड तास जंगलवजा झाडीतुन चालल्यानंतर ढाकच्या गुहेच्या आधी येणारी खाई येते. अगदीच चिंचोळा भाग - खिंड म्हणा ना! आणि येथुनचा पुढच्या सहसी वाटचालीला सुरुवात होते. पुढच्या वाटचाली आधी आम्ही थोडी रेस्ट करण्याचे ठरवुन जरा आडवे झालो. दहा - पंधरा मिनिटांनी विशालने वेळेची आणि होणार्या अंधाराची जाणीव करुन देत सर्वांना पुढे रेटले. खिडीच्या सुरुवातीला अगदीच सोपी वाटणारी ही छोटीशी वाट दुसर्या टोकाला अगदीच निमुळती आहे. ८ - १० मीटरची ही खिंड माणुस जेमतेम मावेल अशी आहे. अगदी आपल्या पोटाचा अंदाज करुन देणारी! हळु आणि सावधानतेने आम्ही सारे खाली उतरलो. उजव्या बाजुला प्रचंड कडा आणि खाली खोल खाई. नविन भटक्यांचे अगदी डोळे फिरवेल अशी. त्या कड्याच्या बाजुने जाणारी छोटीशी पायवाट बहिरीच्या गुहेकडे जाते. अंदाजे ५० - ६० मी. असणारी ही वाट पार करणे म्हणजे दिव्यच वाटते. घसरडी वाट आणि खाली दिसणारी खोल दरी यांचा मध्य साधुनच ही वाट पार करावी लागते. आता पर्यंत अगदीच नॉर्मला वाटणारा ट्रेक आता हळु - हळु डेंजरस व्हायला लागला होता!
काळ्या पाषणावर काही ठीकाणी ट्रेकर्सनी क्लिप लावल्या आहेत. त्या वाटेवर सापडणारी खाच आणि त्या क्लिप्स एवढेच! हा पॅच पार केल्यानंतर अंदाजे ८-१० मी. चा उभा पायर्या असणारा पॅच लागतो. इथे मात्र मनाची जोरदार तयारी लागते. स्वत:वरचा आत्मविश्वास किंचितही कमी होऊ न देता हा पॅच पार करावा लागतो. वरती पोहचताच बहिरीच्या दारात लावलेले झेंडे दिसतात. त्याखाली शिडीच्या नावाने उभे असणारे फांदीचे लाकुड आणि दोन-तीन लोंबकळणारे दोर! आता त्या दोरांपर्यंत पोहचण्यासाठी पुन्हा एक छोटाशी वाट आहे. पावसामुळे ती अगदीच निसरडी झाली होती. मात्र त्याठीकाणी लावलेल्या क्लिप्स उपयोगी आल्या. अंजनने पुढे चढुन त्या क्लिप्स मध्ये दोर लावला.
आता शिडीपर्यंत पोहचण्यास एक आधार झाला होता. काळजी घेत - घेत आम्ही एकेकाला पुढे पाठवत होतो. दोरीच्या दुसर्या टोकाला पोहोचल्या नंतर त्या फांदी कापलेल्या लाकडावरुन - लोंबकळणारा दोर पकडुन वरती जायचे होते. हा पॅच अगदीच कठीण होता. स्वतःबरोबर आता बहिरीवरही विश्वास ठेवणे जरुरी होते. त्या लाकडावर उभे राहुन - दोर हातात पकडुन एक नजर खाली टाकली तर भल्या - भल्यांचेही डोळे फिरतील अशी अवस्था होते. पाठीवरची सॅक संभाळत आम्ही एक - एक जण वरच्या गुहेत पोहोचलो. अगदी शेवटचा पायरी ओलांडुन तुम्ही बहिरीच्या समोरच उभे राहता. अंदाजे २.३० वाजता आम्ही सारे सुखरुप वरती पोहोचलो.
हा बहिरी फार रागीट आहे. बाईमाणसांचा वाराही त्याला चालत नाही. विटाळचांडाळ करविण्यास तो समोरच्या पाताळस्पर्शी दरीत ढकलुन देतो म्हणे [ अर्थात त्यात काही अर्थ नाही हे आता अनुभवाने सर्वांना कळलं आहे. ]
संदर्भः साद सह्याद्रीची - प्र.के. घाणेकर.
बहिरी हा ठाकरांचा देव! तसा कोणताही खास असा आकार नसणारा हा देव! - एक भल्या मोठ्या दगडाला शेंदुर लाऊन त्यावर डोळे लावलेले... डोळ्यात पाहता अगदी तुमच्या समोरच उभे असळ्याची जाणीव करुन देणारा. बाजुलाच नवसाचे त्रिशुल लावलेले. आसपास उदबत्त्या आणि हळद - कुंकु. बाजुला पाण्याचे भले मोठे टाके. त्यावर तरंगणारी आणि काही बुडलेली भांडी. याच भांड्याचा वापर करुन तिथे जेवण तयार करता येते. वापरुन झाल्या नंतर स्वच्छ करुन परत तिथेच ठेवण्याची पध्दत. त्यांची चोरी करणे म्हणजे बहिरीच्या कोपाला आमंत्रण देणे आहे. असे करणर्यास बहिरी समोरच्या खाईत लोटुन देतो अशी भावना आहे, आणि ती वर्षानुवर्षे कायम आहे!
या प्रसिध्दिपराड्.मुख बहिरोबाची शहरी पर्यटकांना ओळख करुन देण्याचे श्रेय माननीय श्री.गो. नी. तथा अप्पासाहेब दांडेकरांना जाते.या गुहेतल्या बहिरीला सारेजण "गडदचा बहिरी" म्हणुन ओळखतात. - गडद म्हणजे गुहा.
संदर्भः साद सह्याद्रीची - प्र.के. घाणेकर.
कुंडातुन पाणी घेऊन आम्ही हात पाय धूऊन बहिरीचे दर्शन घेऊन समोरच्याच गुहेत आराम करण्यास बसलो. विशालने सोबत आणलेला नारळ चढवुन सर्वांना प्रसाद वाटला. एव्हाना धुक्यांचे लोट वहायला सुरुवात झाली होती. थोड्याशा विश्रांतीनंतर आता खाली उतरायचे टेंशन यायला लागले होते. कोणत्याही ट्रेक मध्ये चढयापेक्षा उतरणेच फार कठीण जाते, याचा अनुभव आम्हा सर्वांनाच होता. खालुन पुण्याचाच मुलांचा एक ग्रुप वरती चढत होता. त्यांना वरती येईपर्यंत वाट पाहुन आम्ही खाली उतरण्याचे ठरवले.
बहिरीला नमस्कार करुन आम्ही एक - एक जण खाली उतरु लागलो. खाली उतरलेल्याने त्याच्या नंतर खाली उतरणार्यास मदत करत आम्ही खालच्या त्या बांधलेल्या रस्सीपर्यंत पोहोचलो. तो पर्यंत आणखी एक ग्रुप पोहोचला होता. त्यांच्यासाठी रस्सी ठेऊन आम्ही थांबायचे ठरवले. मात्र विशाल आणि अंजनने ती रस्सी वरती गेलेल्यांना खाली उतरण्यासाठी आणि मागाहुन येणार्यांसाठी तशीच बांधुन ठेवण्याचे ठरवले. सर्वांनी त्याला दुजोरा देत आम्ही खाली उतरण्यास सुरुवात केली.
परतीचा तोच रस्ता आता धुक्यामुळे अधिकच धुसर वाटत होता. त्यातही वाहणारा वारा अंगाला गारवा देत आमचा थकवा दुर करत होत. खिंडीच्या मुखाला पोहचुन आम्ही पुन्हा थोडी विश्रांती घेतली आणि मग परतीचा रस्ता सुरु ठेवला. एक - दिड तासांच्या चाली नंतर मात्र आता चांगला घाम निघाला होता. एका ठीकाणी छोटासा धबधबा पाहुन आम्ही सर्वांनी पुन्हा एक ब्रेक घ्यायचे ठरवले. मी मात्र त्यात नॅचरल बाथ घ्यायचे ठरवुन मस्त ठंडा - ठंडा स्नान केले आणि मग फ्रेश मनाने आणि शरीराने गाडीच्या दिशेने चालु लागलो. परतीच्या मार्गात - असा हा निसर्गरम्य परिसर सोडुन जाण्याचे कोणाचे मन होत नव्हते. पण दोस्त - संसारी दुनियेत अजुनही कामे आहेतच ना!
रस्त्यामध्ये - कामशेत मध्ये "टोनी दा ढाबा" वर जेवण करुन आम्ही कामशेत स्टेशनवरुन पुण्याची लोकल पकडली. पुणे स्टेशन वर पार्क केलेल्या बाईक्स घेऊन १०.४५ ला घरी!
एका साहशी ट्रेकची अनुभुती आणि प्रचंड निसर्गातल्या एका रौद्र देवतेचे दर्शन घेऊन सुखरुप परतल्याचे समाधान सार्यांच्या चेहर्यावर दिसत होते!
फोटो -
आहेतच हे पहा!