पुण्यात [आणि काल मुंबईलाही पाहिलं!] चालताना - गाडी चालवताना - जरा आसपास नजर हिरवा. आपणांस "सायबांचे" अभिनंदन किंवा स्वतःचे "शुभेच्छा" करणारे/ देणारे छोट्यापासुन बोर्डपासुन अगदी मोठ्या होर्डींग दिसतील. सगळयांची चुरस हीच की आमचा/ माझा बोर्ड सगळ्यात मोठा कसा दिसेल! मग अक्कल पायतळी तुडवत बोर्डावर बोर्ड चढवायचे. सगळीचकडे बॅनर्स/ होर्डींग लावायची जणु होडच लागली आहे.
[वर्षाने पाठवलेल्या ई-मेल मधील हे अधिक बोलकं चित्र!] हे सारं पाहुन मनात प्रश्नांच काहुर उभारतं:
- ह्या बोर्ड लावणार्यांना असं वाटत असेल का - की आपण आपल्या सायबाचा बोर्ड जेवढा मोठा लाऊ, तेवढा आपल्याला लोक सायबाचा डावा-उजवा हात समजतील? 'उजवा' समजणारच नाहीत कारण तो आधीच कुणीतरी जवळचा किंवा घरातलाच असतो! डाव्याची कामं माहित असुनही यांना 'डावा' व्हायला काय-काय करावं लागतं?
- भलेही अंगठा छाप असला तरी फोटो मात्र रेबॅन ग्लास मध्ये - फ्रेंच कट ठेऊन का असतो?
- वरती ब्लेझर चढवलेला असतो, मात्र खाली पायात स्पोर्टस् शुज का असतात?
- गल्ली किंवा मतदार संघ/ वार्ड सोडला तर यांना कुणी ** ओळखत नसलं तरी फोटो मात्र अगदी विक्टरी V - ची पोज मध्ये का असतो?
- शहिदांना श्रध्दांजली असं लिहिलेल्या बोर्डवर यांचेच फोटो शहिदांपेक्षा मोठे होते. म्हणजे हे सायबा किंवा त्यांचे ते कार्यकर्ते शहिदांच्या श्रेणीचे किंवा त्यांच्याही पेक्षा मोठे आहेत का?
- हे कार्यकर्ते किंवा त्यांचे 'सायबा' कितीही म्हातारे झाले तरी या बोर्डावर फोटो हे जवानीतलेच का लावतात? संदेश देताहेत की लग्नाची उमेदवारी जाहिर करताहेत?
- काही बोर्डांवर तर अक्षरशः काळे - सावळे - गोरे अशा तीन रंगात यांचे फोटो होते. ही त्या फेअर अन् लवली ची जाहिरात नव्हती?
उत्पादने, सुविधा किंवा बाजारात एखादं नविन उत्पादन आलं की कंपन्या भली मोठी होर्डींग्ज लाऊन त्याची जाहिरात करतात. उद्देश सरळ असतो, त्यांचं ते उत्पादन सगळ्यांना दिसावे, समजावे त्यांनी ते खरेदी करावे. एक सरळ-सरळ व्यावसाहिक पावित्रा असतो तो. थोडक्यात म्हणजे "ही वस्तु विकावु आहे!" गल्लो-गल्ली आणि रस्त्यांच्या मध्ये लावलेले हो बोर्ड वाहतुकीसाठी नक्कीच एक 'पेन इन **' आहेत!
मात्र मला आजपर्यंत हे नाही समजले की - आपला स्वत:चा किंवा सायबांचा - वाढदिवस/ सत्कार/ अभिनंदन/ एकसष्ठी/ निषेध/ दुखः/ शुभेच्छा/ आणि असेच काही काही संदेश देण्यासाठी असे बोर्ड लावणे आवश्यक आहे का? तुम्ही काय विचार करुन असे बोर्ड लावता हो? तुम्ही स्वत: ला आणि 'सायबा' लाही 'विकायला' तर मांडत नाही ना?
मला सांगा - दर वेळी/ दरवर्षी येणारे हे - वाढदिवस/ सत्कार/ अभिनंदन/ एकसष्ठी/ निषेध/ दुखः/ शुभेच्छा/ आणि असेच काही काही संदेश देण्यासाठी तुम्ही किमान २५ हजार तरी नक्कीच खर्चत असाल..? हो, या पेक्षाही जास्तच! मग त्या पैशात:
- एखाद्या शेतकर्याचं कर्ज फेडायला तुमची किंवा सायबाची ** मरते काय? नाहीतरी, "गरज सरो आणि वैद्य मरो" ही म्हण सार्यांनाच लागु आहे...! द्या ना ते पैसे शेतकर्यांना - सांगा तुमचा/ सायबा चा वाढदिवस आहे - करा मदत. कीती दिवस फक्त त्यांच्या दु:खावरच / आत्महत्यांवरच आपली खिचडी पकवणार आहात?
- एखाद्या गरिब/ आश्रम शाळेला वह्या-पुस्तके / कपडे द्या... "शिक्षणाच्या आयचा घो" घालण्यापेक्षा त्याचा प्रसार करायला मदत करा!
- तुमच्या गल्लीत/ वार्डात नसलेला/ बिघडलेला एखादा रस्ता दुरुस्त करा... नव्याने बनवा आणि सांगा - वाढदिवसानिमित्त आम्ही जनतेला रस्ता बनवुन दिला. आशिर्वाद मिळतीलच हो!
- शिवाय असं काहीतरी वेगळं - चांगलं केलंत तरे फायदाही तुमचाच आहे - तुमचं नाव होऊल - चार लोकं चांगल्या कामाचं कौतुक करतील... माझ्यासारखाच एखादी सा.की. तुमच्या बद्दल/ सायबाबद्द्ल चार शब्द 'चांगले' लिहिल. सायबाचीही तुमच्यावर 'मेहर' राहिल शिवाय सत्कार्य केल्याचं जे सुख-समाधान आहे त्याची महती म्या पामरानं काय सांगावी... आपणच ती अनुभवा!
अजुनही बरेच मार्ग आहेत.. तुमचे आणि सायबाचे "संदेश" चांगल्या मार्गाने जनतेपर्यंत पोहचवण्याचे..!
ही पोस्ट कुण्या एका 'सायबा' साठी नाही. माझ्यासाठी सारे सायब, बाबु, आण्णा, काका, तात्या, दादा, मावशी वहिनी सगळे सारखेच आहेत. त्यामुळे तुम्ही कुणा एकाला धरुन विचार करु नका!
संदेश/ शुभेच्छा मनापासुन निघाव्यात आणि मनापर्यंत पोहचाव्यात. दिखाव्याची काय गरज आहे हो? तुमचे काम तुमच्या समाज कार्यातुन दाखवुन द्या.. काय सायबा ...?
मलाही माझा आणि माझ्या नेत्याचा/ सायबाचा रास्त अभिमान आहे.. पण फालतु आणि पोकळ शुभेच्छा आणि संदेशांपेक्षा मी नेहमीच कार्याला/ कृतीला महत्त्व देईन. तुमचं काय?