महेश मांजरेकरांचा नवा चित्रपट "शिक्षणाच्या आयचा घो!" १५ जानेवारी २०१० ला प्रदर्शित होतोय. व्यवहारी शिक्षण आणि मुलभुत शिक्षणाच्या मुद्द्यावरचा विषय असणारा हा चित्रपट त्याच्या प्रोमो पाहिल्यानंतर मला बराच 'आपल्यातल्याच एकाची स्टोरी' असल्यासारखा वाटला! शिक्षण घेत असताना "...घो!" म्हणण्याची एकदा तरी ईच्छा सर्वांनाच झाली असावी...!
मला तर नक्कीच झाली होती... मराठी माध्यमातुन शिक्षण... मग विज्ञान शाखा - इंग्रजीतुन असलं तरीही त्यातही मराठीचा स्वाद! मग पुण्यासारख्या ठिकाणी इंग्रजी माध्यमातुन शिकलेल्यांशी नोकरीसाठीची कसरत! त्यामुळं असा "घो!" घालणं साहजिकच होतं..!
पण शिक्षणाच्या माध्यमाशी वाद कधीच नव्हता. कारण आमच्या ठिकाणी इंग्रजी शाळाच नव्हत्या! मला मान्य होतं की आज ना उद्या मी ही व्यवहाराची भाषाही शिकुन घेईन. त्यामुळं मी 'लिटरेट' आणि 'एज्युकेटेड' असण्यामधला फरक ही समजुन गेलो. पण वाद आहे तो - आपण शिकलेलो, समजलेलो ज्ञान आपल्या जीवनात खरंच १००% उपयोगी पडतं का? उदाहरण द्यायचं तर - मी सायन्स ग्रॅज्युएट.. मग व्यवहारी - टेक्निकल कोर्स. पण माझ्या मुख्य पदवीचा - विज्ञान - चा मला फायदा झाला का? पदवीनंतर मला फक्त एकदाच - सुरुवातीच्या मुलाखतीत - रसायनशास्त्रावर एकच प्रश्न विचारला होता. कदाचित ते मुलाखत घेणारेही विज्ञान शाखेचे पदवीधर होते. त्यानंतर गेल्या दहा वर्षात आठवणीत रहावा असा एकही प्रसंग आला नाही. मला मान्य आहे की शिक्षण कधीच वाया जात नाही... पण .. कधी उपयोगी येणार हा ही एक प्रश्नच आहे.. कदाचित माझ्या मुलीस मी चांगल्यापैकी विज्ञान शिकवु शकेन!
- १७ * ७ =?
अं.. मला माहित नाही. एक मिनिट - मोबाईल मध्ये कॅल्क्युलेट करुन सांगतो. - अलाउदीन खिलजीचा जन्म कधी झाला?
सांगतो ना - एक मिनिट - विकिपिडिया.कॉम किंवा गुगल.कॉम!
तुम्हाला वाटतंय - एका विद्यार्थ्याच्या अयुष्यात हे प्रश्न ती इयत्ता सोडली/ परिक्षा सोडली तर यासारखे प्रश्न कधी येतील? हां एक चान्स आहे - जर तुम्ही एखाद्या रीएलिटी शो मध्ये गेलात तर - पण त्याचा चान्स कीती?
लहानपणापासुनच आपल्या मुलाने/ मुलीने हे व्हावं/ ते बनावं असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. कदाचित जे बननं आपल्याला जमलं नाही, ते आपल्या अपत्यानं बनावं अशीही काहींची अपेक्षा असते. मग आपल्या अपत्याकडुन त्यासाठी प्रयत्न करवुन घेतले जातात. त्याला/ किंवा तिला जर खेळात/ नृत्यात करीअर करावं वाटत असेल तरी आपल्या मर्जीखातर ते तिला इंजिनिअर/ डॉक्टर बनवतात.. काहीजण बनतातही आणि काहीजण मग तो आत्महत्येचा नंबर [१६००] वाढवतात!
बरं, शिक्षण घेतलेल्या क्षेत्रातच नोकरी मिळेल याची शाश्वतीही नसते/ नाही!.. उदाहरण - गेल्या काही दिवसांतील पोलिस भरती - सैन्य भरती ला हजर असणार्यांच्या संख्येकडे पाहिल्यास जाणवते की, १२ वी पासची अट असणार्या या भरतीला पदवीधर - वकील - इंजिनिअर मुलं हजर होती. त्यांनी ही हा असा "घो" घातलाच असेल!
शिक्षणासाठी - व्यवहारीक शिक्षणासाठी - नावारुपास आलेल्या आणि अचानक बंद झालेल्या ए.एच ए. - राय इंस्टिट्युट - बालाजी इंस्टिट्युट या सारख्या शैक्षणिक संस्था करीअर बनवता - बनवता एक दिवस विद्यार्थ्यांनाच बनवतात! सोमवारी - मनसे च्या कार्यकर्त्यानी असंच ए.एच ए. च्या विद्यार्थ्यांबरोबर "
भीक मांगो आंदोलन" केलं.
अगदी बालवाडी पासुन - पदवी पर्यंत डोनेशन्स, भरगच्च फीस, पुस्तके यांचा खर्च झेलावा लागतो. अगदी बाजारी रुप आलय या सार्या पद्धतीला! हे सारं झेलताना - करताना सारे पालकही खुश असतात असं नाही ना. काहींनी तर अगदी कर्ज काढुन डोनेशन्स आणि फीस भरलेल्या असतात. ज्यांना कर्ज मिळत नाही ते सावकारापर्यंतही जातात! त्यांनी अशा या शिक्षणाला नमस्कार घातला असेल असं मला वाटत नाही.
एक विद्यार्थी म्हणुन माझ्या मनात जेंव्हा हा "घो" आला असेल, त्याच्या कीती तरी आधी माझ्या आई-वडिलांनी हा तो घातला असेल!
विषय मोठा आणि वादाचा आहे. थांबतो आता! अरे हां, या चित्रपटाबद्दल अधिक माहिती
या लिंकवर आहे. शिवाय
फेसबुकवर याचा प्रोमोही पहायला मिळाला.
पोस्टर - चित्रपटाच्या नावासोबत - सक्षमचा फोटो जोडलायः साभार इरॉस