गेल्या दहा वर्षात पुण्यातला वाहतुकीचा आणि वाहनचालकांचा अनुभव पाहता, मी खालील तर्क काढले आहेत.
कदाचित ते चुकीचेही असतील किंवा त्यामध्ये तुम्हाला अतिशोक्तीही वाटेल... पण मी माझ्या मतावर अजुनही ठाम आहे!
१. वाहतुकीचे नियम पाळले तर आपली गर्लफ्रेंड / मित्र आपल्याला भ्याड समजेल / समजतील अशी यांची पक्की समजुत असते.
२. समोर पोलीस दिसला तरच नियम पाळायचा, असा पुणेकरांचा स्वतःचा नियम असतो.
३. समोरच्या चौकात पोलीस आहेत की नाही, याची दुरूनच खात्री करुन घ्यायची आणि जर तो नसेल, तर एकदम बिनधास्त - स्पीडमध्ये सिग्नल तोडून वन-टु का फोर व्हायचे हे त्यांना कुणी सांगावे लागत नाही!
४. सिग्नल ऑरेंज होत असेल तर, स्पीड कमी न करता, अधिकच वाढवत, गाडी तशीच दुमटत पुढे न्यायची... भलेही रस्त्याच्या मधोमध थांबावे लागले तरी हरकत नाही!
५. सिग्नल ग्रीन झाला की तुमच्या पाठीमागचा न चुकता हॉर्न वाजवतोच! बर्याचदा असा हॉर्नच सिग्नल ग्रीन झाल्याची निशाणी असते!
६. आपल्या लाखाच्या गाडीला दोन इंडिकेटर्स असतात यांची जाणीव आणि त्यांचा वापर, या दोन्ही गोष्टींचा यांना पुर्ण विसर पडलेला असतो. इंडिकेटर लावलाच तर तो गाडी बंद होई पर्यंत चालुच असतो!
७. कानात हेडफोन घालुन एखासा चार चाकी गाडी चालवत असेल तर - साहेबांनी आत्ताच दुचाकी विकुन - चारचाकी घेतली आहे असे समजावे!
८. अशा इस्टंट गाडीवाल्यांपासुन दहा -फुट अंतराने आपले वाहन हाकावे. यांची दुचाकीची सवय अजुनही गेलेली नसते - ते कधी - कसाही कट मारु शकतात!
९. झेब्रा क्रॉसिंग - फुटपाथ या ठीकाणांची यांना खास आवड - आकर्षण असते. त्यावर गाडी थांबवणे - चालवणे - याला ते शौर्य समजतात!
१०. गाडी चालवताना, ओव्हरटेक कोणत्या बाजुने करावे - यापेक्षा थोडीशी मोकळी जागा कोणत्या बाजुला आहे, यावर त्यांचे खास ध्यान असते आणि चुकुन अशी थोडीशी जागा मिळाल्यास ते कुशलतेने ओव्हरटेक करतात!
११. नो - एन्ट्री/ रोड क्लोज्ड असे बोर्ड असताना देखिल हे त्या रोडवर एन्ड पर्यंत जातील. परत येतील... मात्र दुसर्या दिवशी पुन्हा तो रोड चेक करायला जरुर जातील.
१२. हेल्मेट घालणं म्हणजे यांना जीवावर आल्यासारखे वाटते. त्याच्या विरोधात ते राष्टीयच काय आंतराष्ट्रीय पातळीवरही लढायला तयार असतात.
मला वाटतं:
१३. रिक्षा चालकांना पुण्यात खास ट्रेनिंग दिले जाते. कुठेही ३६० डिग्रीमध्ये वळावे... सायकलही न जाणार्या जागेतुन रिक्षा कशी घालावी... कुणी हात केलाच तर जागेवरच कसे थांबावे - हे त्यातले काही धडे!
१४. पी.एम.टी. वाल्यांना वर ट्रेनिंग घेतलेल्या रिक्षावाल्यांकडुन खास सवलतीच्या दरात तेच ट्रेनिंग दिले जाते.
१५. चार चाकी वाला नेहमीच दुचाकी आणि तीन चाकी वाल्याकडे अगदीच तुच्छतेने पाहतो. उगाचच, अशी एखादी तरी झलक देतीलच!
बाकी, आपण अनुभवी आहातच... आपले अनुभव - तर्क काय म्हणताहेत?