Categories

Aeroplanes

Aeroplanes

Friday, 9 October 2009

मतदार बंधु - भगिनींनो....



येत्या १३ ऑक्टोंबरला तुम्ही आपल्या मतदानाचा हक्क बजावायला जाल. अर्थातच जाल! कारण त्या दिवशी करण्यासारखं खास काही नसेल. म्हणजे एक तर ऑफिसला सुट्टी असेल आणि बहुतेक दुकाने, मॉल्स, सिनेमाघरे बंद असतील. मग घरी बसुन काय करणार? तर, मतदान करा. मात्र ते करण्याआधी तुम्ही या गोष्टी ध्यानात घ्या:

१. आपल्या वार्डा मतदार संघातील उमेदवाराचे आपणास कीती मेसेज - फोन आले यांची खात्री करा. कारण त्यावरुनच त्यांच्या "कार्यशिलतेची" कल्पना येऊ शकते.
२. आपल्या घरापासुन किंवा वार्डा मतदार संघापासुन लागणार्‍या प्रत्येक चौकात यांचे कीती आणि कीती फुटी मोठे होर्डींग्ज लागलेत यांची गिनती करा. त्यावरुन त्यांनी केलेल्या खर्चाची जाणीव होईल!
३. उमेदवाराने आपली मालमत्ता कोटीमध्ये जाहिर केली असेल तरच त्याचा उमेदवारीसाठी विचार करा. किरकोळ मालवत्तावाला तुमची - आमची काय मदत करणार हो?
४. उमेदवाराचे क्रिमिनल रेकॉर्ड असणे महत्त्वाचे. अगदीच सभ्य उमेदवार तुमच्यासाठी काहीही करु शकणार नाही! कठीण समयी असलेच उमेदवार कामी येतात.
५. शक्य तितक्या लवकर आपल्या मताचा - एका आणि फॅमिली पॅकचा - दर ठरवा. उगाच नंतर घासाघासी नको. बारगेनिंग आणि सेलचा जमाना आहे म्हटलं!
६. कॅश किंवा गिप्ट आधीच ठरवा. हवं तर टी.व्ही., फ्रिज, डी.व्ही.डी. प्लेअर किंवा कंबो - ऑफरचा विचार आधीच करा.आणि मतदानाच्या आधी हे घरपोच होईल याची खात्री करा!
७. तुम्ही जर एखादा जिम, क्लब किंवा इतर काही संस्था चालवत असाल तर त्यासाठीचे साहित्य आधीच तुमच्या संस्थेत पोहचेल याची खात्री करा. हार-जित तो चलती रहेगी.. उगाच आपल्या पायावर कशाला कुर्‍हाड मारा?
८. एखादी पोलिस केस वगैरे चालु असेल तर ती त्यांच्या मार्फत आधीच "निल" करुन घ्या. नाहीतर मतदाना नंतर पुढची पाच वर्षे तुम्हालाच ते निस्तरावे लागेल.
९. आपल्या मुलाचे - मुलीचे शाळा - कॉलेजचे प्रवेशाचे काम अजुनही रेंगाळले असेल तर हीच वेळ आहे. त्यांच्या नावाने ताबडतोब प्रवेश करवुन घ्या!
१०. उमेदवाराची काही कार्यसुत्री असली - नसली तरी, तुमच्या आडलेल्या कामाचा उल्लेख करुन घ्या. उदा. नळाला पाणी न येणे... रस्ता खराब असणे... विजेची अडचण वगैरे - वगैरे!

हां, आता स्वत:च्या मनात, आपण ही "दशसुत्री योजना" राबविण्याचा पुर्णपणे नक्की करा. ऑनेस्टी, मताचा अधिकार, प्रामाणिकता, सामाजिक बांधिकलकी आणि जबाबदारी वगैरे सारख्या गोष्टी स्वतःवर हामी - वरचढ - होऊ देऊ नका. तुम्ही - आम्हीच या गोष्टींचा विचार करायचा काय ठेका घेतलाय? शिवाय तुमच्या - आमच्यावर केला जाणारा खर्च हा ते एका वर्षाच्या आतच भरुन काढतील, अगदी व्याजासहित! तेंव्हा तुम्ही कोणताही सुविचार न करता मतदान करा!

ता.क. माझे वोटर कार्ड आले नाही, साहजिकच मला यावेळी मतदान करता येणार नाही. मात्र तुमच्यासारख्या एकाला तरी मी योग्य उमेदवार निवडण्यास जागरुक करु शकलो, याचं समाधानही माझ्यासाठी खुप आहे, नाही का?

बदलः वार्ड = मतदार संघ  [अनामिताच्या सुचनेवरुन!]
स्वत:चं डोकं वापरा, आता तरी जागे व्हा! यावेळी विचारपुर्वक मतदान करा!