Categories

Aeroplanes

Aeroplanes

Friday, 4 December 2009

दि ग्रेट पुणेरी हेल्मेट शो!

टाईम्सच्या "पुणे मिरर" या पुरवणीमध्ये गेल्या काही दिवसांपासुन हेल्मेट वापरा संबधीत मोहीम चालु आहे. रोजच हेल्मेट वापरणारे आणि न वापरणारे यांची मते प्रकाशित केली जातात. हेल्मेटला विरोध करणार्‍यांची काही कारणे आणि अडचणीपैकी मी थोडक्यात जमवलेल्या काही अडचणी:


[असं चित्र काढण्याची आयडीया - 'दि लाईफ' वाल्या 'सोमेश'च्या च्या पोस्ट वाचुन आली!]

१. हेल्मेट वापरल्याने केस गळतात!
अहो आश्चर्यम! नविनच शोध!! - असेलही - मी माहिती - तंत्रज्ञात जरा मागासलेला आहे. जरा त्या शोधाबद्दल माहिती मिळेल का? आणि तसंपण - अ‍ॅक्सिडेंड नंतर चुराडा झालेल्या डोक्यावर केस असले काय अन् नसले काय - काय फरक पडतो. तुम्ही काय जगप्रसिध्द सेलिब्रेटी आहे का काय - की लोक तुमचे केस ताईत बनवुन गळ्यात घालतील? ऑ?

२. मोबाईलवर बोलता येत नाही!
हां, एका हाताने ड्राइव करत दुसर्‍या हाताने मोबाईलवर बोलत जाणार्‍यांसाठी हेल्मेट ही फार मोठी अडचण आहे! पण फोन वाजलाच तर गाडी बाजुला उभी करुन बोलता येतंच की. हेल्मेट घातल्याने तोंड थोडच बंद होतं? शिवाय ब्लु - टुथ चा पर्याय आहेच की! बरेच लोक हेल्मेट घालुनही कानात इअर-फोन लावतातच - ते कधी अशी बोंब नाही मारत!

३. वागवायचे / कॅरी करायचे कुणी?
काय राव, मोबाईलच्या बाबतीत - ऑफिसच्या बॅगच्या - जेवणाचा डब्बा आणत असाल तर - असा कधी विचार आलाय मनात. ते कॅरी करताच ना? शिवाय बाईकला लॉकर बसवुन घ्या..!

४. लोकांचे चेहरे पाहता येत नाहीत!
मला वाटतं तुम्हाला 'मुलींचे' चेहरे पाहता येत नाहीत, असं म्हणायचं आहे! कॉलेज जवळच्या रस्त्यावरुन जाताना किंवा रस्त्यावरही चालु असलेलं हे "निरीक्षण आणि गणना" आम्हीही बर्‍याचदा पाहिली आहे राव. पण सध्या 'मुली' ही ते स्कार्फ बांधुनच मग ??

५. पान - गु-टखा - तंबाखु चं काय?
काय म्हणजे? जर खायचं असेल तर आतल्या आत थुंकायला - म्हणजे - गिळायला शिका. तुमच्या या रंगकामामुळे बरीच जनता आणि इमारती आधीच रंगल्या आहेत!

६. हेल्मेट जड आहे!
अहो, चांगल्या ब्रँडचं - हलकं घ्या.. ड्रेस.. मोबाईल.. शुज अशा वस्तु आपण कसं शोधुन - नाजुक - हलकं घेतो नां, तसंच हेल्मेटही घ्या ना!

मला वाटतं पवार साहेबांच्या काळात - १ जुलै १९८९ रोजी नवा मोटारवाहन कायदा अस्तित्वात आला आणि तेंव्हापासुन हेल्मेटसची सक्ती, कायदेशीर रीत्या आहे. हा कायदा भारत सरकारने देशभर लागू केला असल्याने फक्त महाराष्ट्र सरकारच्या किंवा एखाद्या मंत्र्याच्या नावे बोंब मारण्यात काही तथ्य वाटत नाही!

दोस्त, हेल्मेट वापरायचं किंवा नाही हा मुद्दा जेवढा खेचावा तेवढा वाढणारा आहे. जरा आसपास होणारे अपघात बघ - त्यात मरणारे - अपंग होणारेही आधी असाच वाद घालत होते! त्यांच्या घरच्यांनी काय गमावलंय हे बघ! आज तारुण्याच्या मस्तीत वा धुंदीत झालेला एक अपघात तुला किंवा दुसर्‍या कायमचा अपंग करु शकतो. व्हीलचेअर वरची व्यक्ती रीयल लाईफ मध्ये जगणं सोपं नाही रे! हां आता तू जर हे सारं धुडकावुन 'जाणार'च असशील तर जा - उगाच 'जाणार्‍या'ला अडवु नये! पुन्हा भेट होईल - न होईल म्हणुन आधीच ही प्रार्थना - मृतात्म्यास शांती लाभो!