Friday, 4 December 2009

दि ग्रेट पुणेरी हेल्मेट शो!

टाईम्सच्या "पुणे मिरर" या पुरवणीमध्ये गेल्या काही दिवसांपासुन हेल्मेट वापरा संबधीत मोहीम चालु आहे. रोजच हेल्मेट वापरणारे आणि न वापरणारे यांची मते प्रकाशित केली जातात. हेल्मेटला विरोध करणार्‍यांची काही कारणे आणि अडचणीपैकी मी थोडक्यात जमवलेल्या काही अडचणी:



[असं चित्र काढण्याची आयडीया - 'दि लाईफ' वाल्या 'सोमेश'च्या च्या पोस्ट वाचुन आली!]

१. हेल्मेट वापरल्याने केस गळतात!
अहो आश्चर्यम! नविनच शोध!! - असेलही - मी माहिती - तंत्रज्ञात जरा मागासलेला आहे. जरा त्या शोधाबद्दल माहिती मिळेल का? आणि तसंपण - अ‍ॅक्सिडेंड नंतर चुराडा झालेल्या डोक्यावर केस असले काय अन् नसले काय - काय फरक पडतो. तुम्ही काय जगप्रसिध्द सेलिब्रेटी आहे का काय - की लोक तुमचे केस ताईत बनवुन गळ्यात घालतील? ऑ?

२. मोबाईलवर बोलता येत नाही!
हां, एका हाताने ड्राइव करत दुसर्‍या हाताने मोबाईलवर बोलत जाणार्‍यांसाठी हेल्मेट ही फार मोठी अडचण आहे! पण फोन वाजलाच तर गाडी बाजुला उभी करुन बोलता येतंच की. हेल्मेट घातल्याने तोंड थोडच बंद होतं? शिवाय ब्लु - टुथ चा पर्याय आहेच की! बरेच लोक हेल्मेट घालुनही कानात इअर-फोन लावतातच - ते कधी अशी बोंब नाही मारत!

३. वागवायचे / कॅरी करायचे कुणी?
काय राव, मोबाईलच्या बाबतीत - ऑफिसच्या बॅगच्या - जेवणाचा डब्बा आणत असाल तर - असा कधी विचार आलाय मनात. ते कॅरी करताच ना? शिवाय बाईकला लॉकर बसवुन घ्या..!

४. लोकांचे चेहरे पाहता येत नाहीत!
मला वाटतं तुम्हाला 'मुलींचे' चेहरे पाहता येत नाहीत, असं म्हणायचं आहे! कॉलेज जवळच्या रस्त्यावरुन जाताना किंवा रस्त्यावरही चालु असलेलं हे "निरीक्षण आणि गणना" आम्हीही बर्‍याचदा पाहिली आहे राव. पण सध्या 'मुली' ही ते स्कार्फ बांधुनच मग ??

५. पान - गु-टखा - तंबाखु चं काय?
काय म्हणजे? जर खायचं असेल तर आतल्या आत थुंकायला - म्हणजे - गिळायला शिका. तुमच्या या रंगकामामुळे बरीच जनता आणि इमारती आधीच रंगल्या आहेत!

६. हेल्मेट जड आहे!
अहो, चांगल्या ब्रँडचं - हलकं घ्या.. ड्रेस.. मोबाईल.. शुज अशा वस्तु आपण कसं शोधुन - नाजुक - हलकं घेतो नां, तसंच हेल्मेटही घ्या ना!

मला वाटतं पवार साहेबांच्या काळात - १ जुलै १९८९ रोजी नवा मोटारवाहन कायदा अस्तित्वात आला आणि तेंव्हापासुन हेल्मेटसची सक्ती, कायदेशीर रीत्या आहे. हा कायदा भारत सरकारने देशभर लागू केला असल्याने फक्त महाराष्ट्र सरकारच्या किंवा एखाद्या मंत्र्याच्या नावे बोंब मारण्यात काही तथ्य वाटत नाही!

दोस्त, हेल्मेट वापरायचं किंवा नाही हा मुद्दा जेवढा खेचावा तेवढा वाढणारा आहे. जरा आसपास होणारे अपघात बघ - त्यात मरणारे - अपंग होणारेही आधी असाच वाद घालत होते! त्यांच्या घरच्यांनी काय गमावलंय हे बघ! आज तारुण्याच्या मस्तीत वा धुंदीत झालेला एक अपघात तुला किंवा दुसर्‍या कायमचा अपंग करु शकतो. व्हीलचेअर वरची व्यक्ती रीयल लाईफ मध्ये जगणं सोपं नाही रे! हां आता तू जर हे सारं धुडकावुन 'जाणार'च असशील तर जा - उगाच 'जाणार्‍या'ला अडवु नये! पुन्हा भेट होईल - न होईल म्हणुन आधीच ही प्रार्थना - मृतात्म्यास शांती लाभो!

16 comments:

झकास .. एक नंबर .. :)

अतिशय उपयुक्त लेख आहे. मी बऱ्याचदा हेल्मेटबद्दल लोकांना समजावतो, पण अशीच काही ना काही (फालतू) कारणं सांगत असतात. आता ही पोस्ट तोंडावर फेकली की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील त्यांना. मी पण मोकळा पुढच्या मित्राला "हेल्मेट घाल" म्हणून सांगायला.

हेल्मेटची माझी एक आठवण सांगतो... मी गाडी घेतली तेव्हा आधी नाना पेठेत जाऊन हेल्मेट विकत घेतले आणि मग वाकडेवाडीला जाऊन गाडीची डिलीवरी घेतली.

तात्पर्य: माझी प्रामाणिक विनंती आहे लोकहो, हेल्मेट वापरा(च). असे सुंदर आयुष्य पुन्हा पुन्हा नाही मिळणार.

@सोमेश,
तुझ्यासारखं चित्र काढायचा प्रयत्न केला... आणि तुझी कमेंट म्हणजे - जमलं तर! धन्यवाद!

@पंकज,
हो यार! हेल्मेटसाठी पळवाटा काढणारे खुप जण पाहिले. आज म्हटलं 'उत्तर' तयार आहे!

"तूम्ही काय जगप्रसिध्द सेलिब्रेटी आहे का काय - की लोक तुमचे केस ताईत बनवुन गळ्यात घालतील? ऑ?"

लय भारी!!!

@आनंद,
हो ना... लोकांना फॅशनची - हेअर - स्टाईलची फिकर आहे.. डोक्याची नाही. म्हणे केस गळतात! डोक्यावर केसांचा विग चढवता येतो - मात्र विगसाठी डोकं कुठं खरेदी करणार, हे लोक?

@विक्रम,
बरेच दिवस यावर एक विचार घोळत होता... म्हटलं पटकन लिहाव! तसं या विषयावर बरंच लिहिण्यासारखं आहे, पण तुर्तास एवढं बस्स!

इथे अमेरिकेत लहान मुलांना सायकलसाठीपण हेल्मेट सक्तीचं आहे आणि अशी सायकल रेसमध्ये वापरतात तशी हेल्मेट घालुन सजलेली लहान मुलं इतकी गोड दिसतात ना? माझा भाचा सोसायटीत सारखा पडत असतो त्याला हे सायकलचं हेल्मेट न्यावं म्हणते.
ती कुठली इंग्लिश सिरीयल होती ना रविवारी यायची त्यात तो एक बाइकर त्याचं ते हेल्मेट घालून बाहेर पडायचा आणि एकदम झुमझुम स्पीड वाढायची...नाव आठवत नाही. त्यावेळी त्या स्लिक हेल्मेटची फ़ॅशन आली होती..
बाकी लेख एकदम झकास....

@अपर्णा,
इकडे भारतात, सायकल वाले जाऊ देत, मोटर - सायकल वाल्यांनी जरी हेल्मेट घालायला सुरुवात केली तरी देव पावला - असं होईल. हो, हेल्मेट घालुन सायक्लिंग करणारी चिमुरडी जाम गोंडस दिसतात. जमल्यास तुमच्या भाच्यासाठी हेल्मेट जरुर आणा..!

ही जाहिरात बघा.. हेल्मेट न वापरणं कुल समजलं जातंय हल्ली. हेल्मेट ही बाइकच्या हॅंडलला अडकवण्याची वस्तु नसुन डोक्यावर घालायची आहे हे लक्षात ठेवलेच पाहिजे.
यु ट्य़ुबवर मस्त व्हिडीओज आहेत. इथे पोस्ट करता येत नाहित. जरुर पहा..

@महेंद्रजी,
हो, बरेचजण हेल्मेट गाडीला अडकवुन गाडी चालवतात. "वेळ आलीच तर घालु!" या विचाराने... अहो पण वेळ - काळ काय सांगुन येतो काय? असो - ज्याचे त्याचे नशिबच म्हणायचे. सांगणे - समजावणे आपले काम - बाकी ...........

सही रे भावा!!!
आणि "अ‍ॅक्सिडेंड नंतर चुराडा झालेल्या डोक्यावर केस असले काय अन् नसले काय - काय फरक पडतो. तुम्ही काय जगप्रसिध्द सेलिब्रेटी आहे का काय - की लोक तुमचे केस ताईत बनवुन गळ्यात घालतील? ऑ?""
हे तर सगळ्यावर कडीच आहे .

बंगलोर मध्ये हेल्मेट अनिवार्य आहे .आपल्याला डोक्याची काळजी घ्याची त्यात इतके फाटे कश्याला फोडायचे .

जाऊदे .. "जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे".. आता याच्या पुढचे लोक जाणोत आपण आपले काम करत राहायचे .

@सचिन,
मला वाटतं - देशभरातच हेल्मेट सक्तीचं आहे. पण जेवढी डोकि तेवढी कारणं झालीत.. "जे जे आपणासी ठावे..... " ह्या हिशोबाने काम चालुच आहे - बाकि ?!

cahan zalay lekh....Nadhynatri hostel valyni Gadi valayna helmate sakti ch kel hot.....Mala vatat sangun kai upyog hot nahi....

@सागर,
हेम्लेट सक्तीपेक्षा गरजेचं आहे, हे समजुन घ्यायला हवं! सांगायचे काम आपण केलंच आहे - बाकी हेल्मेट वापरणे - न वापरणे आपल्यावरच आहे! प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!