महेंद्रजींच्या ब्लॉगवर 'पेपर दिला' ही पोस्ट वाचुन मी अर्ध्यात सोडलेली ही पोस्ट: कदाचित पुर्ण नाही!
गेली एक-दोन वर्ष 'रिसेशन',' स्लोडाऊन', 'मर्जर' अशा दिसायाला छोट्या मात्र फार मोठी भीती दाखवणार्या टर्मस् ऐकण्यात - वाचण्यातच गेली. काही [? बर्याच!] लोकांच्या नोकर्या गेल्या.... कंपन्या दिवाळखोरी निघाल्या.... बंद झाल्या मात्र आज काल परिस्थिती थोडी बदलल्याची जाणीव व्हायला लागली आहे! काल - परवा पर्यंत अगदी दोन पानांचा "टाईम्स अॅसेंट" गेल्या वेळी मस्त ८-१० पानांचा होता. 'अर्ध-पान'भर असणार्या जाहिराती पुन्हा दिसु लागल्यात. बंद झालेले जॉब कंन्सलटंटचे फोन पुन्हा वाजताहेत. मेलबॉक्स मध्ये नविन ओपनिंगच्या मेल यायला लागल्यात! थोडक्यात - नविन नोकर्या उपलब्ध होताहेत आणि पेपर पडताहेत........... आज जरा यावरच बोलु ..पेपर टाकण्याच्या कारणापासुन - नोटीस पिरिअड मधील कामापर्यंत आज जरा सविस्तर बोलुयात!
तर, पेपर टाकण्यामागे बरीच कारणे असतात, अगदी ढोबळ-मानाने मला जाणवलेली:
१. अधिक सॅलरी पॅकेज मिळणे
२. मोठी - चांगली कंपनीची ऑफर असणे
३. बढतीवर जाणे - म्हणजे लीड पोस्ट - मॅनेजर वगैरे
४. स्टॅग्नंट फीलिंग येणे - म्हणजे वाढ थांबल्यासारखं वाटणे
५. इनसिक्युर फिल होणे!
६. खास मित्राने पेपर टाकणे
७. पर्सनल कारण असणे
यापेक्षा अधिक किंवा वेगळी कारणेही असतील, असावीत. त्यासाठी तुमच्या कमेंटस् आहेतच!
आता हीच कारणे जरा डिटेलमध्ये:
१. अधिक सॅलरी पॅकेज मिळणे: "बाईला वय आणि पुरुषाला पगार विचारु नये" असं म्हणतात! जास्त पैसा कुणाला नको असतो? खरं तर आपल्याला नक्की किती पगार दिला म्हणजे आपण खुश होऊ हे सांगणं कोणालाही जमणार नाही - मला तर नाही. कारण दिलेला पगार मग तो कितीही असो ३० तारखेच्या आत संपतोच आणि आम्ही पुन्हा १ तारखेची वाट पहातो! जो पर्यंत आपल्याला आपल्या मित्राचा किंवा कलिगचा पगार माहित नसतो, तोपर्यंत आपला पगार ठीक ठाक वाटतो. मात्र जर त्यांचा पगार जास्त असेल तर मात्र मनांत एक "जलन" होऊ लागते. मग जास्त पगाराची नोकरी शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न करु लागतो! काही वेळा आपलं राहणीमान - वाढलेले खर्च यांचा ताळमेळ घालण्यासाठीही मग अधिक पगाराची गरज भासु लागते! मला वाटतं अगदी कोटी मध्ये पगार दिला तर तो पचवायची ताकद/ अक्क्लही पाहिजेच ना! आणि अकलेपेक्षा जास्त अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे? सॉफ्ट्वेअर कंपन्यात बलाढ्य पगार असतात - असं म्हणतात - असतातही. पण ते असे-तसे कुणालाही मिळतात का? त्यासाठी अनुभव - एक्सपर्टीज सारखे गुणही लागतात. सांगायचा मुद्दा एवढाच की - एखाद्याला त्याच्या अनुभव - एक्सपर्टीज वरुन पगार मिळतो - मिळावा. जास्त पगाराच्या अपेक्षेत बरेच लोक अगदी सहा महिने - एक वर्षाच्या आत जॉब बदलतात - चांगलं ऑप्शन आहे - एक वर्षात जेवढं अॅप्राइजल होत नाही - त्यापेक्षा अधिक इंक्रीमेंट जॉब बदलताना मिळते! एवढंच काय, अहो मी लोकांना महिना १ हजारच्या वाढीवर जॉब बदलताना पाहिलंय!
२. मोठी - चांगली कंपनीची ऑफर असणे: दुसर्याची नोकरी आणि बायको की नेहमी चांगली वाटते! खरं तर लोकांना स्वत:ची म्हणजे स्वतः काम करत असलेली कंपनी सोडुन दुसर्या सगळ्या चांगल्या वाटतात ! आता चांगली कंपनी म्हणजे काय किंवा ती चांगली हे कसं म्हणायचं? मला वाटतं ज्या कंपनीत ५०-६०...... हजार! लोक काम करतात, आय.टी. पार्क किंवा एम्.आय.डी.सी. मध्ये एकर - दोन एकर मध्ये भव्य बिल्डींग असते वगैरे वगैरे! आता अशा स्वप्नवत कंपनीतुन ऑफर असेल तर काय कुणाची - नाही - म्हणायची टाप आहे? शिवाय मित्रांच्या कंपनीच्या पॉलिसीज, मेडिक्लेम्स, पेड हॉलिडेज, हायर - एज्युकेशची सोय अशा बर्याच गोष्टी मनाला भुरळ पाडतात!
३. बढतीवर जाणे - म्हणजे लीड पोस्ट - मॅनेजर वगैरे: काही लोकांना पहिल्या नोकरीतच बॉसची, लीडची किंवा मॅनेजरची पोस्ट ही स्वतःची पोस्टअसावी अशी स्वप्ने पडतात! हो, खरंच सांगतोय! माझ्या बघण्यातलीच उदाहरणं आहेत. मग आपण अजुन ज्युनिअर आहोत हे फिलिंग जाऊन - सिनॅरीटीचं भुत लागतं. आपलीच कामं करण्यात मन लागत नाही.. कुणी काम सांगितलं तर अपमान वाटतो अशी अवस्था होते आणि मग आम्ही नविन नोकरी विथ सिनिअस पोस्ट, शोधु लागतो. मला वाटतं, अनुभवातुन - एक्सपर्टीज मधुन मिळालेली सिनिअर पोस्ट ही अधिक मजबुत आणि खंबीर असते. बर्याचदा 'नोकरी सोडुन जाऊ नये' म्हणुनही सिनिअर पोस्ट मिळाल्याचं पाहण्यात आहे. मग या मिळालेल्या पोस्टवर काही वेळ थांबुन आम्ही हक्काची नविन सिनिअर - लीड पोस्ट शोधु लागतो. काही वेळा आमचा लीड - मॅनेजर इतका इंप्रेसीव्ह असतो की - आम्हाला त्याच्या पोस्टचा हेवा वाटु लागतो आणि आम्ही ती पोस्ट मिळवण्याचा प्रयत्न करु लागतो, भलेही मग ती नविन कंपनीत का असेना!
४. स्टॅग्नंट फीलिंग येणे - म्हणजे वाढ थांबल्यासारखं वाटणे: हे असलं फिलिंग म्हणजे नक्की काय ते मलाही सांगता येणार नाही. मग - नोकरी बदलण्यासाठी काहीच कारण नाही मिळालं तर ठोकुन द्यायचं - आय एम फिलिंग स्टॅग्नंट! माझे काही मित्र एकाच कंपनीत ५ वर्षे काम करत होते. नविन प्रोजेक्टस होतेच शिवाय वेळेवर होणारी पगार वाढ आणि चांगला बॉस यामुळे त्यांना बरेच दिवस "पेपर टाकावे" असं वाटलंच नाही! त्यांच्या मते काम चांगले आहे - व्यवस्थित पगार आणि वाढ आहे - बॉस चांगला आहे, मग कशाला जॉब बदला? समोरची कंपनी काय बसुन थोडाच पगार देणार आहे? पाच वर्षांनी मात्र त्यांनी ती कंपनी बदलली - कारण होतं - नविन/ लेटेस्ट टेक्नॉलॉजीशिकणं/ त्यावर काम करणं!
५. इनसिक्युर फिल होणे: शेजारच्या क्युब मध्यल्याने "पेपर टाकले" की त्या पुर्ण स्क्वेअरमध्ये एक पॅनिक लहर येते! उगाचच आपला जॉब सिक्युअर नसल्याचं फिलिंग तयार होतं. शेजार्याचं कारण काहीही असो - आम्हालाही नविन जॉब बघावा असं वाटु लागतं. बोलता - बोलता 'रीसेशन', 'स्लो-डाऊन' अशा दिसायला छोट्या पण मोठी भीती दाखवणार्या टर्म डिस्कस होऊ लागतात. जाणारा त्यात अधिकच भर घालतो. काही वेळा तर अगदी कंपनीच्या ताळे-बंदी विषयीही बोलायला मागे-पुढे पहात नाही. ' ** वैताग आला इथे', 'आपुन तो निकल गया, बॉस!' असं बोलणं उगाचच आमच्या मनात इनसिक्युर पणाचं फिलिंग भरतात आणि आम्ही ऑनलाईन रिजुमी अपडेट करु लागतो!
६. खास मित्राने पेपर टाकणे: ऑफिसमधल्या काही काळातच काही खास दोस्त बनतात. स्मोकिंग फ्रेंड्स, सकाळी ब्रेकफास्टला एकत्र जाणारे दोस्त, एकाच टीममध्ये असणारे दोस्त... असे काही दोस्त - दोस्ती बनते. मग यातील एखाद्याने - इतर कोणत्याही कारणाने - पेपर टाकले की मग आमचेही मॅनेजमेंट बिघडते. बर्याचदा हा खास मित्र - रुम/ फ्लॅट मेट असतो. मग अशा वेळी त्या मित्राच्याच कंपनीत किंवा जवळ जॉब शोधला जातो. इंटरेस्टिंगली - हे कारण मी खास बोलतानाच - डिस्कशन मध्येच - ऐकले आहे. पेपर टाकण्याच्या ऑफिशल मेल मध्ये किंवा नविन कंपनीत विचारण्यात येणार्या - नविन जॉब का शोधताय? - या प्रश्नाच्या उत्तरादाखल हे - "खास मित्राने पेपर टाकले म्हणुन मी ही..." कारण माझ्या पाहण्यात नाही!
७. पर्सनल कारण असणे: आता पर्सनल कारणे खुप असु शकतात. पैकी, मी पाहिलेली काही - ऑफिसातल्या आवड्त्या मुलीचे लग्न होणे किंवा मित्राबरोबर - फ्रेंडशिप - लग्न - होणे...लीड / मॅनेजर / बॉसबरोबर " तु तू-मै मै " होणे...पॅरेंटस ची बदली होणे...
..... या परिस्थितीही नविन जॉब शोधुन - पेपर टाकले जातात!
हूम्मम्म! तर आता पेपर टाकल्यानंतर: एकदा पेपर टाकले की आपण मोकळे झालो अशा आविर्भावात काही लोक वावरतात. कालपर्यंत ज्यांच वागणं - बोलणं जबाबदारीचं असतं - तेच आता बिंधास्त झालेलं असतं! इतरांना "तो" कुठे चाललाय?.. किती इंन्क्रीमेंट भेटली?.. असे क्युरीअस प्रश्न विचारायचे असतात. नोटीस पिरीड हा "त्याच्या" अगदी जीवावर आलेला असतो. उशिरा येणं... वारंवार ब्रेक घेणं चालु असतं! साला, नोकरीत असताना जे करता येत नव्हतं, ते आता बिधास्तपणे चालु असतं! मग कंपनी, बॉस, मॅनेजर, लीड यांचा अगदी मनापासुन "धावा आणि पुजा" केली जाते. एकंदरीत - " आपुन तो निकल गया, बॉस! " असा अॅटीट्युड होतो!
दोस्त! कंपनी बदलली म्हणजे जग बदलत नाही! आज- नाही तर उद्या एकमेकांसमोर येण्याचा चान्स असतोच. तेव्हा - नोटीस मध्ये असताना, आपण केलेल्या कामाचे डॉक्युमेंटेशन करणे - आपले काम व कामाचे स्टेटस व्यवस्थित दुसर्याकडे सोपवणे, इतर डिपार्टमेंट्स चे क्लिरंस सर्टिफिकेट मिळवणे हे कंटाळवाणे न समजता एक जबाबदारी म्हणुन कर! कुणा एकाच्या 'पेपर टाकण्याने' कंपनी बंद झाल्याची बातमी - माझ्या तरी ऐकिवात नाही. तेंव्हा जाताना उगाच 'इगो' दाखवु नकोस. "रेफरन्स कॉल्स", "रिलिविंग लेटर", "एक्सपेरिंस लेटर" आणि "यु-टर्न" या टर्म विसरु नकोस. काय सांगावं - उद्या हाच लीड/ बॉस उद्या तुझ्याच नविन कंपनीत नविन बॉस म्हणुन येईल! ऑल द बेस्ट!!