Categories

Aeroplanes

Aeroplanes

Thursday, 20 August 2009

स्री. बैलांचा सण: बैल पोळा!

काल पोळा व्हता. हा स्री. बैलांचा सण असल्याने यास "बैल पोळा" पण म्हणत्यात. पण गाईंच्या सणाला "पोळी" म्हणत न्हाईत. पुण्यात चपातीला पोळी म्हणत्यात. पोळा सरावणातल्या आमुशेला येतो. वरिसभर मर-मर काम करणार्‍या स्री. बैलांनला प्रेम दाखविण्यासाठी हयो सण साजरा करत्यात. हायस्कुल संपस्तोवर मी पण बैल होतो त्यामुळे या सणाशी माझी वैयक्तिक जवळीक आहे. तसेच भारत हा शेतकर्यांचा देश असल्याने हा एक राष्ट्रीय सण असावा आनि या दिवशी सर्व्यांना सुट्टी आसावी अशी माझी इच्छा आहे. बैलपोळा हा माज्या माहितीतला - मुक्या प्रान्यांसाठी मानसासारख्या जनावरानं साजरा केलेला एकुलता एक सण आहे.


पोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलांच्या आदी उठतात. बैलांना नदीवर नायतर वड्यावर नेऊन निरमा लाऊन धुत्यात. शिंगे तासली जातात. नाकात नवी येसण आणि गळ्यात नवा कासरा लावतात. पायची खुरं कापुन पत्री मारत्यात.

आपल्याला नाय का आइ दिवाळीला लवकर उठ्वते आन् मोती साबणानं आंगुळ घालुन नवी कापडं देत्यात. तस या दिवशी बैलांचा लय थाट आसतुय. त्यांनला दिवसभर कामाला लावत न्हाइत. बैलांच्या वशिंडावर हळद व आसेलच तर तेल/ तुप लाऊन मालिश करत्यात. मोठं वशिंड असणारा बैल हा पैलवान बैल असतो. सर्व्या आंगावर रंगाचं नायतर गेरुचं ठिपके देत्यात आन् आपल्या हाताचे शिक्के पण मारत्यात. शिंगावर शेंदुर नायतर इंगुळ लावुन त्यावर रंग-बिरंगी बेगडं चिटकवत्यात. बेगाड लय नाजुक असतं. ते दोर्‍याने कापत्यात व त्याच्या पट्ट्या करुन ते शिंगावर लावत्यात. शिंगाच्या टोकाला चिलिमीसारखे पितळेचे एक इभुषण घालत्यात. ते पडु नये म्हणुन एक - एक मोळा बी मारत्यात. पण त्याच्यानं शिंगातुन रगत येत नाही. त्याच्यावर उभे गोंडे लावतात. गळ्यात चंगाळ बांधतात. चंगाळ घराच्या आडाला बांधल्यामुळे ते धुराने काळं कळ-कुळीत झालेलं असतं. बैलाच्या गळयात बांधाच्या आदी ते निरम्याने धुवावे लागतं. नाही तर पांढर्‍या बैलावर त्याचा काळा रंग लागतो. बैल चालताना त्या चंगळाचा लय मस्त आवाज व्हतो. गळ्यात चंगाळ्याबरोबर कवड्याच्या माळाबी बांधत्यात. पायात काळ्या आन् लाल रंगाचं करदोड्याचं तोडं बांधत्यात. त्यामुळं बैल लय भारी दिसतो आन् तेला द्रुष्ट लागत नाय.. म्हणुन मी अजुनपर्यंत माझ्या पायात काळा करदोडा बांधतो.

पाठीवर नक्शी केलेलं झुल टाकत्यात. आन् त्यां सगळ्याशिनला गावातन वाजवत नेत्यात. त्यांच्या मोरं हालगी वाजणार मस्त ठेका लाउन वाजवत असतो. डांग नाकी कोकणाकी..डांग नाकी कोकणाकी.. ड डांग डांग नाकी कोकणाकी.. असा आवाज आसतोय.

गावातल्या येशीवर सगळी बैलवाली मंडळी गोळा होत्यात .. मग वाजंत्री .. नगारं .. ढोल.. सनया वाजवुन झडत्या म्हणत्यात. जिकणार्‍या पार्टीस सरपंच नायतर पाटील इनाम देत्यात. त्यातपन येकादा आगावपणा करुन भाशनाला उभारतो. बैलाची तारीप करत्यात. आन् पावसा-पान्याच्या गोश्टी पन. पान तंबाकुचं देनं-घेनं होतं आन् मग पोळा फुटतो. मग संद्याकाळी परतीच्या वाटंवर मारतीच्या देवळाला दर्शनाला जात्यात. घरी आल्यावर पुन्यांदा बैलांनला आन् बैलकर्‍यास ववाळतात. बैलाशिनला खायला पुरणाची पोळी आन् सुग्रास - पेंडीचा निवद देत्यात. बैलकर्‍यासबी नवी कापडं मिळत्यात. दिवसबर दोगंबी लय खुशीत असत्यात.

असा हा स्री. बैल पोळा मला लय - लय आवडतो. तुमास्नी बी आवडतच आसल. व्हय ना... मान हालउ नगा... तसं लिव्हा!
मामाच्या गावी पोळा मोठ्या आनंदानं साजरा केला जायचा. " सादया - महादया " ही बैलांची जोडी मनात कायम राहिलेली. अगदी मोटनं पाणी खेचण्यापासुन नांगरणी - पेरणीच्या वेळी नांगरावर बसुन मामाबरोबर - बैलांबरोबर फिरायचो. आज त्या आठवणी पुन्हा दस्तक देऊन गेल्या!