Categories

Aeroplanes

Aeroplanes

Monday, 2 November 2009

चार दिवस आजारपणाचे!

... दिवाळी मस्त खाण्यात आणि गावी नातेवाईक फिरण्यात घालवली... पुण्यात आलो आणि ३-४ दिवसांतच तापाने फणफणलो... गुरुवारी संध्याकाळ पर्यंत ऑफिसमध्ये अगदी दात कुड-कुडण्यासारखी थंडी वाजु लागली... घरी येऊन कसाबसा फ्रेश झालो.. बेडवर पडताच अगदी हुडहुडी भरली... रात्रीपर्यंत ताप महाराज अगदी १०४ ला पोहोचले! त्यात अंगदुखी... या कुशीवरुन - त्या कुशीवर बदलायचे म्हणजे मला एखादा ट्रेक परवडेल अशी अवस्था झाली..! खोकुन - खोकुन, फुफ्फुस तोंडातुन बाहेर पडतंय की काय असं वाटायला लागलं! नशीब फॅमिली डॉक्टर हजर होते... लागलीच सुत्र फिरवली गेली... हिस्टरी तपासली गेली आणि साखर-गोळ्यांचे -[ हो.पॅथी ] डोस सुरु झाले!! स्वाईन - फ्लुची काळजी म्हणुन मुलगी आणि बायको माहेरीच [ जवळच आहे - ;) ] ... तीन दिवस ..... अगदीच क्वारंटाईन जगलो! नशिब स्वाईन फ्लु नाही निघाला.. देवच पावला म्हणायचं!


माझ्या मुलीनं - वेदिका - माझ्यासाठी बनवलेलं हे कार्ड! लकी बाबा ना? ;)

आज, तीन दिवसांनी .... मस्त टापरुन जेवलो... थोडा टी.व्ही. बघितला... मेल चेक केल्या.. आणि आता हे 'क्विक - पोस्ट'....कसं मोकळं - मोकळं वाटतंय... !

लहाणपणी शाळेला दांडी मारण्यासाठी बर्‍याचदा खोटं - खोटं आजारी पडायचं नाटक करायचो... अगदी नविन नविन नोकरी करायला लागलो होतो तेंव्हाही अशाच दांड्या मारायचो...! आजकाल मात्र असं करता नाही येत.. जबाबदारी म्हणा किंवा पहिल्यासारखं सफाईदारपणे खोटं बोलता येतं नसावं ;)

पूण्यात वाढत्या थंडीमुळे, स्वाईन फ्लु बरोबर आता आम्हास डेंगु - हिवतापाचाही सामना करायला तयार राहायचंय. काळजी घ्या!