Monday, 14 December 2009

शिक्षणाच्या आयचा घो!

महेश मांजरेकरांचा नवा चित्रपट "शिक्षणाच्या आयचा घो!" १५ जानेवारी २०१० ला प्रदर्शित होतोय. व्यवहारी शिक्षण आणि मुलभुत शिक्षणाच्या मुद्द्यावरचा विषय असणारा हा चित्रपट त्याच्या प्रोमो पाहिल्यानंतर मला बराच 'आपल्यातल्याच एकाची स्टोरी' असल्यासारखा वाटला! शिक्षण घेत असताना "...घो!" म्हणण्याची एकदा तरी ईच्छा सर्वांनाच झाली असावी...!



मला तर नक्कीच झाली होती... मराठी माध्यमातुन शिक्षण... मग विज्ञान शाखा - इंग्रजीतुन असलं तरीही त्यातही मराठीचा स्वाद! मग पुण्यासारख्या ठिकाणी इंग्रजी माध्यमातुन शिकलेल्यांशी नोकरीसाठीची कसरत! त्यामुळं असा "घो!" घालणं साहजिकच होतं..!

पण शिक्षणाच्या माध्यमाशी वाद कधीच नव्हता. कारण आमच्या ठिकाणी इंग्रजी शाळाच नव्हत्या! मला मान्य होतं की आज ना उद्या मी ही व्यवहाराची भाषाही शिकुन घेईन. त्यामुळं मी 'लिटरेट' आणि 'एज्युकेटेड' असण्यामधला फरक ही समजुन गेलो. पण वाद आहे तो - आपण शिकलेलो, समजलेलो ज्ञान आपल्या जीवनात खरंच १००% उपयोगी पडतं का? उदाहरण द्यायचं तर - मी सायन्स ग्रॅज्युएट.. मग व्यवहारी - टेक्निकल कोर्स. पण माझ्या मुख्य पदवीचा - विज्ञान - चा मला फायदा झाला का? पदवीनंतर मला फक्त एकदाच - सुरुवातीच्या मुलाखतीत - रसायनशास्त्रावर एकच प्रश्न विचारला होता. कदाचित ते मुलाखत घेणारेही विज्ञान शाखेचे पदवीधर होते. त्यानंतर गेल्या दहा वर्षात आठवणीत रहावा असा एकही प्रसंग आला नाही. मला मान्य आहे की शिक्षण कधीच वाया जात नाही... पण .. कधी उपयोगी येणार हा ही एक प्रश्नच आहे.. कदाचित माझ्या मुलीस मी चांगल्यापैकी विज्ञान शिकवु शकेन!

  • १७ * ७ =?
    अं.. मला माहित नाही. एक मिनिट - मोबाईल मध्ये कॅल्क्युलेट करुन सांगतो.
  • अलाउदीन खिलजीचा जन्म कधी झाला?
    सांगतो ना - एक मिनिट - विकिपिडिया.कॉम किंवा गुगल.कॉम!

तुम्हाला वाटतंय - एका विद्यार्थ्याच्या अयुष्यात हे प्रश्न ती इयत्ता सोडली/ परिक्षा सोडली तर यासारखे प्रश्न कधी येतील? हां एक चान्स आहे - जर तुम्ही एखाद्या रीएलिटी शो मध्ये गेलात तर - पण त्याचा चान्स कीती?

लहानपणापासुनच आपल्या मुलाने/ मुलीने हे व्हावं/ ते बनावं असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. कदाचित जे बननं आपल्याला जमलं नाही, ते आपल्या अपत्यानं बनावं अशीही काहींची अपेक्षा असते. मग आपल्या अपत्याकडुन त्यासाठी प्रयत्न करवुन घेतले जातात. त्याला/ किंवा तिला जर खेळात/ नृत्यात करीअर करावं वाटत असेल तरी आपल्या मर्जीखातर ते तिला इंजिनिअर/ डॉक्टर बनवतात.. काहीजण बनतातही आणि काहीजण मग तो आत्महत्येचा नंबर [१६००] वाढवतात!

बरं, शिक्षण घेतलेल्या क्षेत्रातच नोकरी मिळेल याची शाश्वतीही नसते/ नाही!.. उदाहरण - गेल्या काही दिवसांतील पोलिस भरती - सैन्य भरती ला हजर असणार्‍यांच्या संख्येकडे पाहिल्यास जाणवते की, १२ वी पासची अट असणार्‍या या भरतीला पदवीधर - वकील - इंजिनिअर मुलं हजर होती. त्यांनी ही हा असा "घो" घातलाच असेल!

शिक्षणासाठी - व्यवहारीक शिक्षणासाठी - नावारुपास आलेल्या आणि अचानक बंद झालेल्या ए.एच ए. - राय इंस्टिट्युट - बालाजी इंस्टिट्युट या सारख्या शैक्षणिक संस्था करीअर बनवता - बनवता एक दिवस विद्यार्थ्यांनाच बनवतात! सोमवारी - मनसे च्या कार्यकर्त्यानी असंच ए.एच ए. च्या विद्यार्थ्यांबरोबर "भीक मांगो आंदोलन" केलं.

अगदी बालवाडी पासुन - पदवी पर्यंत डोनेशन्स, भरगच्च फीस, पुस्तके यांचा खर्च झेलावा लागतो. अगदी बाजारी रुप आलय या सार्‍या पद्धतीला! हे सारं झेलताना - करताना सारे पालकही खुश असतात असं नाही ना. काहींनी तर अगदी कर्ज काढुन डोनेशन्स आणि फीस भरलेल्या असतात. ज्यांना कर्ज मिळत नाही ते सावकारापर्यंतही जातात! त्यांनी अशा या शिक्षणाला नमस्कार घातला असेल असं मला वाटत नाही.

एक विद्यार्थी म्हणुन माझ्या मनात जेंव्हा हा "घो" आला असेल, त्याच्या कीती तरी आधी माझ्या आई-वडिलांनी हा तो घातला असेल!

विषय मोठा आणि वादाचा आहे. थांबतो आता! अरे हां, या चित्रपटाबद्दल अधिक माहिती या लिंकवर आहे. शिवाय फेसबुकवर याचा प्रोमोही पहायला मिळाला.
पोस्टर - चित्रपटाच्या नावासोबत - सक्षमचा फोटो जोडलायः साभार इरॉस

14 comments:

भुंगा,
बर्याच बाबतीत सहमत. माझ्या मते शिक्षणात काही दोष नाहीये दोष आहे तो म्हणजे परीक्षा पद्धतीमध्ये. ती मात्र बर्याच अंशी दोषपूर्ण आहे.
दहावी पूर्वी जर सर्व विषय नाही शिकलो तर आपल्याला कुठली साईड मध्ये आवड आहे, कुठे करिअर करायचे हे कसे कळणार? जन्मतः सगळ्यांना करिअर बद्दल सहावा सेन्स नसतो.
हे पण खरे आहे कि बरेच व्यावहारिक विषय आपल्या समाजात/शिक्षण पद्धतीत मान्यता मिळवून नाहीयेत. शिक्षणाचा बाजार तर झाला आहेच, त्याला शिक्षक, मानसिकता, भौतिक सुखाचा हव्यास अशी बरीच कारणे आहेत.

विषय वादाचा आणि मोठा आहे, मीपण इथेच थांबतो.
धन्यवाद.

@आनंद,
हो, खरंय. शिक्षक, मानसिकता, भौतिक सुखाचा हव्यास अशी बरीच कारणे आहेत. याचबरोबर - दुसर्‍याने केले - "तेरा बेटा प्लेन उडायेगा और मेरा बेटा पैसा!!" - समजुतही आहेच.

"तारे जमिनपर" च्य त्या छोट्याची मानसिकता याबद्दल बरंच काही सांगुन जाते!

मी ह्याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. विषयाचा आवाका खूप मोठा आहे. पालक, शिक्षण पद्धती व विद्यार्थी यांचा समन्वय असणे खूप आवश्यक बाब आहे. माझी पोस्ट पण विषयाला
गवसणी घालण्यासाठी परिपूर्ण नाही परंतु एक शिक्षिका म्हणून माझा विचार मांडला आहे. मी आपणाला लिंक देते. भेट देवून नक्की वाचा.....
http://anukshre.wordpress.com/2009/10/30/%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87/

good article.. it shows whats reality in education sector in India.. and movie is best..
kapil sibbal is taking forward steps to change this education system.. God knows when 10th class remove from school..

@मंदार,
सिनेमा चांगला असावाच. सत्यपरिस्थिवरचे चित्रपट नेहमीच चांगले बनतात! सिब्बल साहेबांच्या मेहनतीस सफलता मिळावी हीच अपेक्षा.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

@अनुक्षरे,
तुमचा लेख वाचला. असा लेख एक शिक्षिकाच लिहु शकते यात वाद नसावा. शिक्षण पद्धतीबरोबरच शिकण्याच्या पद्धतीही बदलल्यात. कदाचित शिक्षण मंडळ आपणासारख्या सुज्ञ - विचारी लोकांचा विचार घेऊन नविन शिक्षण प्रणाली तयार करेल/ करावी असं मला वाटतं.

आजच्या शाळकरी मुलांची अवस्था पाहिली, की आपले दिवस बरे होते, असं वाटतं. रेगिओ थेरपीचा वापर आपल्याकडे सुरू झाला आहे पण तो केवळ शिशूवर्गाच्या शिक्षणासाठी होतो. तसे न होता, वरच्या वर्गांतही ह्या प्रकारची शिक्षणपद्धती सुरू केली पाहिजे असं वाटतं. मी या विषयावर एक लेख लिहीला होता. इथे त्याचा दुवा देत आहे. वेळ मिळाल्यास अवश्य वाचा.

@कांचन,
लेख वाचला. छान आहे. असा स्वप्नवत गाव आणि 'रेग्गीओ एमिलीया' अप्रोच आपल्याकडेही सुरु व्हावा!

अगदी खरे आहे. आपण शिकलोय काय आणि काम कुठल्या क्षेत्रात करतोय याचा काही अर्थाअर्थीही संबंध राहिलेला नाही. त्यातून आजकाल तर पोरांना शिकवतांना पालकांना फेसच येऊ लागलाय. अगदी प्रिकेजीपासूनचे डोनेशनचे आकडे पाहून पुढे कोठले ताट वाढलेय ते कळतेच आहे.शिक्षण वाया जात नाही हे नक्कीच पण गंज मात्र चढतो. सिनेमा अजूनतरी पाहायला मिळाला नाहीये. आशा आहे चांगला असेल.बाकी आज पाठ उद्या सपाट अशीच सध्याची अभ्यासाची परिस्थिती आहे....तरी अजून निदान सतरा नवे किती हे कॆलक्युलेटर न वापरता ९०% लोक सांगू शकतील यातच आनंद आहे बा. नाहीतर $1 मधून $0.89 गेले तर किती यासाठी कॆलसी वापरणारे...

@भानस,
"आज पाठ उद्या सपाट" ह्या परिस्थितीचा तर मी स्वतःच अनुभवी आहे. मला वाटतं की देवसेंदिवस माझी 'मेमरी' विक होत चाललीय. एक-दोन मोबाईन नंबर सोडले तर माझ्या लक्षात राहणारा / असलेला असा एकही नंबर मला सांगता येणार नाही :(
डोनेशन्स् - फीसबद्दल म्हणाल तर मी जेवढ्या पैशात पदवीधर झालो, तेवढे पैसे माझ्या मुलीच्या एल्.के.जी. साठी लागले...!!

@संकेत,
ब्लॉग ठिक आहे का पोस्ट का सिनेमा?

नमस्कार भुंगा,
माझा पण अनुभव/ मत फार वेगळं अस नाही आहे रे.....वर भानस ने लिहिलं आहे ना कि - अजून निदान सतरा नवे किती हे कॆलक्युलेटर न वापरता ९०% लोक सांगू शकतील यातच आनंद आहे...... खरच प्रयत्न केला पण काही जमेच ना रे.... पण तरीही माझा पगार पाणी छान आहे म्हणून काही दुख होत नाही ह्या गोष्टीनबद्दल... :)
पण मला अस वाटत कि चांगलं जीवन जगण्यासाठी तुमच्या कडे चांगलं शिक्षण असलंच पाहिजे अस काही नाही.... फक्त आपला आपल्या स्वतः वर किती आत्मविस्वास आहे ह्या गोष्टी वर जीवन विकास अवलंबून आहे....चांगलं शिक्षण आत्मविश्वास वाढवते हि बाब तर खरी आहे.... पण सध्या बरेचशी तरुण मंडळी असे असे शिक्षण घेताना दिसते कि ज्यात त्यांचा काहीच इंटरेस्ट नाही आहे....याने त्यांचा आत्मविश्वास कमी होण्याचा फारच जास्त chance आहे.... त्या मुळे मला अस वाटत कि, अस काही तरी व्यासपीठ असावं कि जिथे मुलांचा आत्मविश्वास वाढायला मदत होयील....जशी गुरुकुल पद्धत होती....जिथे जास्तीत जास्त भर आत्मगौरव उभा करण्या वर असायचा....मग एकदा जर का आत्मविश्वास उभा राहिला तर मग विचार पद्धत बदलते, आणि चांगले निर्णय घेण्याची क्षमता वाढते.... मग जीवन विकास चांगला होवू शकतो....आजची शिक्षण पद्धत सुरु होणार मुलाच्या १३ व्या वर्षी...कारण ८ वी पर्यंत ढकलनार आहे म्हणे...याने कोणता आत्मविश्वास वाढणार देव जाणे.... आणि भविष्यात काय होणार हे पण तोच जाणे... अस मला वाटत रे... आता तू हि जागा दिलीस लिहिण्या साठी म्हणून तुझे फार आभार...चूक भूल माफ असो... :)

नमस्कार अमोल,
अरे वा! तुझी प्रतिक्रिया म्हणजे एक पोस्टच झाली असती. असो... तुझे मतही मला पटले.. म्हणजे स्व-ची जाणीव होणं महतवाचं.. गुरुकुल पद्धतीचं म्हणाल तर - हो, पुर्वी गुरुकुल मध्ये जायचं म्हणजे अर्थातच क्षत्रिय धर्म आणि आणि त्याच्या रक्षणार्थ कार्य करणं हे आधीपासुनच माहित असायचं. सध्या तेवढं पालकांनाही समजलं तरीही खुप झालं नाही का?