पुण्यात [आणि काल मुंबईलाही पाहिलं!] चालताना - गाडी चालवताना - जरा आसपास नजर हिरवा. आपणांस "सायबांचे" अभिनंदन किंवा स्वतःचे "शुभेच्छा" करणारे/ देणारे छोट्यापासुन बोर्डपासुन अगदी मोठ्या होर्डींग दिसतील. सगळयांची चुरस हीच की आमचा/ माझा बोर्ड सगळ्यात मोठा कसा दिसेल! मग अक्कल पायतळी तुडवत बोर्डावर बोर्ड चढवायचे. सगळीचकडे बॅनर्स/ होर्डींग लावायची जणु होडच लागली आहे.
[वर्षाने पाठवलेल्या ई-मेल मधील हे अधिक बोलकं चित्र!]
हे सारं पाहुन मनात प्रश्नांच काहुर उभारतं:
- ह्या बोर्ड लावणार्यांना असं वाटत असेल का - की आपण आपल्या सायबाचा बोर्ड जेवढा मोठा लाऊ, तेवढा आपल्याला लोक सायबाचा डावा-उजवा हात समजतील? 'उजवा' समजणारच नाहीत कारण तो आधीच कुणीतरी जवळचा किंवा घरातलाच असतो! डाव्याची कामं माहित असुनही यांना 'डावा' व्हायला काय-काय करावं लागतं?
- भलेही अंगठा छाप असला तरी फोटो मात्र रेबॅन ग्लास मध्ये - फ्रेंच कट ठेऊन का असतो?
- वरती ब्लेझर चढवलेला असतो, मात्र खाली पायात स्पोर्टस् शुज का असतात?
- गल्ली किंवा मतदार संघ/ वार्ड सोडला तर यांना कुणी ** ओळखत नसलं तरी फोटो मात्र अगदी विक्टरी V - ची पोज मध्ये का असतो?
- शहिदांना श्रध्दांजली असं लिहिलेल्या बोर्डवर यांचेच फोटो शहिदांपेक्षा मोठे होते. म्हणजे हे सायबा किंवा त्यांचे ते कार्यकर्ते शहिदांच्या श्रेणीचे किंवा त्यांच्याही पेक्षा मोठे आहेत का?
- हे कार्यकर्ते किंवा त्यांचे 'सायबा' कितीही म्हातारे झाले तरी या बोर्डावर फोटो हे जवानीतलेच का लावतात? संदेश देताहेत की लग्नाची उमेदवारी जाहिर करताहेत?
- काही बोर्डांवर तर अक्षरशः काळे - सावळे - गोरे अशा तीन रंगात यांचे फोटो होते. ही त्या फेअर अन् लवली ची जाहिरात नव्हती?
उत्पादने, सुविधा किंवा बाजारात एखादं नविन उत्पादन आलं की कंपन्या भली मोठी होर्डींग्ज लाऊन त्याची जाहिरात करतात. उद्देश सरळ असतो, त्यांचं ते उत्पादन सगळ्यांना दिसावे, समजावे त्यांनी ते खरेदी करावे. एक सरळ-सरळ व्यावसाहिक पावित्रा असतो तो. थोडक्यात म्हणजे "ही वस्तु विकावु आहे!" गल्लो-गल्ली आणि रस्त्यांच्या मध्ये लावलेले हो बोर्ड वाहतुकीसाठी नक्कीच एक 'पेन इन **' आहेत!
मात्र मला आजपर्यंत हे नाही समजले की - आपला स्वत:चा किंवा सायबांचा - वाढदिवस/ सत्कार/ अभिनंदन/ एकसष्ठी/ निषेध/ दुखः/ शुभेच्छा/ आणि असेच काही काही संदेश देण्यासाठी असे बोर्ड लावणे आवश्यक आहे का? तुम्ही काय विचार करुन असे बोर्ड लावता हो? तुम्ही स्वत: ला आणि 'सायबा' लाही 'विकायला' तर मांडत नाही ना?
मला सांगा - दर वेळी/ दरवर्षी येणारे हे - वाढदिवस/ सत्कार/ अभिनंदन/ एकसष्ठी/ निषेध/ दुखः/ शुभेच्छा/ आणि असेच काही काही संदेश देण्यासाठी तुम्ही किमान २५ हजार तरी नक्कीच खर्चत असाल..? हो, या पेक्षाही जास्तच! मग त्या पैशात:
- एखाद्या शेतकर्याचं कर्ज फेडायला तुमची किंवा सायबाची ** मरते काय? नाहीतरी, "गरज सरो आणि वैद्य मरो" ही म्हण सार्यांनाच लागु आहे...! द्या ना ते पैसे शेतकर्यांना - सांगा तुमचा/ सायबा चा वाढदिवस आहे - करा मदत. कीती दिवस फक्त त्यांच्या दु:खावरच / आत्महत्यांवरच आपली खिचडी पकवणार आहात?
- एखाद्या गरिब/ आश्रम शाळेला वह्या-पुस्तके / कपडे द्या... "शिक्षणाच्या आयचा घो" घालण्यापेक्षा त्याचा प्रसार करायला मदत करा!
- तुमच्या गल्लीत/ वार्डात नसलेला/ बिघडलेला एखादा रस्ता दुरुस्त करा... नव्याने बनवा आणि सांगा - वाढदिवसानिमित्त आम्ही जनतेला रस्ता बनवुन दिला. आशिर्वाद मिळतीलच हो!
- शिवाय असं काहीतरी वेगळं - चांगलं केलंत तरे फायदाही तुमचाच आहे - तुमचं नाव होऊल - चार लोकं चांगल्या कामाचं कौतुक करतील... माझ्यासारखाच एखादी सा.की. तुमच्या बद्दल/ सायबाबद्द्ल चार शब्द 'चांगले' लिहिल. सायबाचीही तुमच्यावर 'मेहर' राहिल शिवाय सत्कार्य केल्याचं जे सुख-समाधान आहे त्याची महती म्या पामरानं काय सांगावी... आपणच ती अनुभवा!
अजुनही बरेच मार्ग आहेत.. तुमचे आणि सायबाचे "संदेश" चांगल्या मार्गाने जनतेपर्यंत पोहचवण्याचे..!
ही पोस्ट कुण्या एका 'सायबा' साठी नाही. माझ्यासाठी सारे सायब, बाबु, आण्णा, काका, तात्या, दादा, मावशी वहिनी सगळे सारखेच आहेत. त्यामुळे तुम्ही कुणा एकाला धरुन विचार करु नका!
संदेश/ शुभेच्छा मनापासुन निघाव्यात आणि मनापर्यंत पोहचाव्यात. दिखाव्याची काय गरज आहे हो? तुमचे काम तुमच्या समाज कार्यातुन दाखवुन द्या.. काय सायबा ...?
मलाही माझा आणि माझ्या नेत्याचा/ सायबाचा रास्त अभिमान आहे.. पण फालतु आणि पोकळ शुभेच्छा आणि संदेशांपेक्षा मी नेहमीच कार्याला/ कृतीला महत्त्व देईन. तुमचं काय?
22 comments:
लय भारी राव
साहेबांना हे कळल तर बरे होईल.
मनापासून आवडली पोस्ट.
हल्ली असंच असतं भुंगोबा! अंगठाबहाद्दर लोकांना शाळेच्या नवीन मजल्याच्या उद्घाटनाला बोलावून समाजानेच त्यांची ’व्हॅल्यू’ वाढवलेली आहे. आता मला सांगा, एक गुंड शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडला रे पडला, की ताबडतोब कारागृहाच्या आवारातच त्याच्यावर नवीन वॉरंट काढून त्याला पुन्हा आत डांबणारी लोक आहेत आपल्याकडे. पण त्यांना अडवणारे साहेबसुद्धा आहेत आपल्याकडे. आता तो गुंड एरियाचा वाली झालाय, महानगरपालिकेत मानाची जागा मिळाली त्याला. नगरसेवक म्हणजे, नगर ज्यांचं सेवक असतं ते.
वनजमिनींवर बांधकाम करायला परवानगी दिल्यानंतर बिबळ्या वाघांना सुद्धा शहरत फिरायची परवानगी नको का द्यायला? पण वनजमिनींवरच्या बांधकामाला कोर्टाने परवानगी दिली म्हणून नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकतात आणि बिबळ्य़ा शहरात शिरला की नागरिकांत घबराट पसरते. आता हे नागरिक कोण?
आणि हो, साहेब हा शब्द मस्ट आहे आजकाल. अहो, आपली जाहिरात करताना आपणच स्वत:चा उल्लेख आदरार्थी नाही केला, तर कोण विचारणार?
काल मुंबईत येऊन गेलात. एक ईमेल आधी मिळालं असतं, तर तुम्हाला, महेंद्रजींना आणि अनिकेतला भेटण्याची संधी मिळाली असती.
@सलील,
हो रे, कळायलाच हवं! त्यासाठीच तर हा सारा खटाटोप!
@कांचन,
फार सविस्तर आणि समर्कम प्रतिक्रिया दिलीत. आपलीच अवस्था "कळतय पण वळत नाही" अशी झालीय. कार्यकर्त्यांनी जरी हे मनावर घेतलं तरी आपण फार मिळवलं असं मी समजेन!
काल मुंबईला "स्टार माझा" च्या पारितोषिक वितरणासाठी आलो होतो.. महेंद्रजी आणि विजेत्या ब्लॉगर्सची भेट झाली.. आपणही पुढच्या मेळाव्यात भेटु.
कालच आम्ही आमच्या 'सायबांना' आमच्या ब्लॉगवर पोस्ट टाकून शुभेच्छा दिल्या.
बाकी ते फ्लेक्स वैगेरे नाही कधी लावले अजून मी आणि लावेल असेही वाटत नाही
बाकी त्या पैस्यातून सामाजिक करावे यास अनुमोदन बर का
@विक्रम,
अरे धन्यवाद. मला वाटलं तु जरा सिरियस घेतोस की काय.. कारण परवाचे तुझी सायबांची पोस्ट झाली.. सत्कर्मे व्हावीत हाच विचार!
एकदम सही लिवलंत सायबा..पण या लोकांना ही उधळपट्टी आहे हे कधी समजणार??? सगळे मुद्दे एकदम पटलेत..
आणि हो मुंबैची सफ़र कशी झाली?? आवडली का आमची मुंबई?? :)
@अपर्णा,
होर्डींगचा विचार बरेच दिवसांपासुन मनात होता... मग पटापट लिहुन काढला... हो, सायबाला - कार्यकर्त्याना ते कळणं महत्त्वाचं!
मुंबई ची सफर ओझरती होती... पण मस्त झाली.. अनिकेत आणि विक्रांत होते सोबत, शिवाय महेंद्रजींनाही भेटलो!
मी सिरीयसलीच घेतलय रे ;)
वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे यात काही गैर नाही मी माझ्या भावना माझ्या ब्लॉगवर व्यक्त केल्या
त्याचे प्रदर्शन करायचे असते तर मी तू म्हणतोयस तसे फ्लेक्स लावले असते आणि तसे मला करायचे हि नव्हते
सामाजिक कार्य अशी औचित्य साधून झाली पाहिजेत या मताचा मी हि आहे, मग तो 'सायबाचा' असो नाहीतर आपल्या घरातील किंवा मित्राचा असो
@विक्रम,
औशी मनातलं बोललास बग... समद्यांशी हे पोचायला पायजे... आपन पोचवुच :)
समर्थ रामदास म्हणतात "आपली स्तुस्ती करी तो एक मूर्ख " .... आता असे बरीच मंडळी दिसतात .
समाजामध्ये अस्मिता अशी काही राहिलेलीच नाही . कोणीही माणूस आज विकला जात आहे .
अस्मिता पूर्ण समाज असेल तर , या असल्या गोष्टींची गरजच भासणार नाही.
आणि कोणाला काही मदत करायचीच असेल तर ती ग्रेसफुली करा.ज्यांना मदत मिळते आहे त्यांना होता येयील तेवढे मिंधे करून मदत केली जाते.
बेसिक पासूनच बदल आवश्यक आहेत .
मस्त सुंदर झकास जमलिय पोस्ट. मला अगदी हेच याच श्ब्दात म्हणायचं होतं. अलिकडेच ठाण्यात काही बोर्ड उतरवणं भाग पाडलं होतं. अरे रे ते रेबॅन्चे गॉगलपरवडले पण गळ्यात सोन्याचे साखळदं असणारे तथाकथित भाऊ आणि भैय्या पाहिले की माझी शिरच उडते. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत असताना यांने असे फ़ोटो लावायची लाज वाटली पाहिजे आणि नेमकी तीच वाटत नाही हे आपल्या सगळ्यांचं दुद्रैव आहे.
@सचिन,
हाच शब्द - अस्मिता! पण मला नाही वाटत 'त्या' पैकी एकाने तरी हा शब्द ऐकला किंवा जाणला असेल.
@शिनु,
तेच म्हणतो मी.. किलोभर सोन्यातलं कुणी तोळाभर सुद्धा मदत म्हणुन का देत नाही?
दिपक मनापासून लिहीलयेस अगदी......मागे महेंद्रजींनीही यावर एक पोस्ट टाकलं होतं, खरय रे या सगळ्या प्रकारात होणाऱ्या खर्चात खरं तर अनेकांना जेवण मिळू शकतं, हे होर्डिंग्स लावणाऱ्या कार्यकर्त्यांची शक्ती ईतर विधायक कामाना नाही का लावता येणार????
अरेच्चा.. मी आधी कमेंटलो होतो इकडे. दिसत नाहीये. बहुतेक गेला नसेल. म्हणून पुन्हा कामेंटतो.
हे सगळे साहेब आणि त्यांचे डावे, उजवे, तिरपे, तारपे हात यांनी हा लेख अवश्य वाचला पाहिजे.. तरीही डोळे उघडतील कि नाही शंकाच आहे. आणि ते fair and lovely वालं छगन भुजबळचं होर्डिंग मेल मध्ये आलं होतं. अगदी खरच fair and lovely ची ad वाटते !!
@सहजच,
हो, महेंद्रजींची ती पोस्ट वाचली होती. या लोकांना अक्कल कधी येणार, देव जाणे!
@हेरंब,
हो रे.. एखाद्या जरी कार्यकर्त्याने ही पोस्ट वाचुन काही विधायक काम केलं तर मी या पोस्ट, किंबहुना, या ब्लॉग आणि स्वत:ला धन्य समजेन!
हा हा
आमच्या इथे हि एकदा 'बबन' ला अशाच हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या होत्या
आणि त्याच्या चर्चा मैलोन मैल चालू होत्या
त्यानंतर काही दिवस कोणाच्या वाढदिवसाच्या शुभेच्चा पाहण्याचा योग लवकर नाही आला आम्हाला ;)
जीवनमूल्य
update :
On Saswad-pune road I saw boards with 'Saheb' along with his 3 yr son and 'raje' in front of that kid's name ... !!
Manjrachya Galyat Ghanta Kon Bandhnar?
Regadrs
Shrikant
www.shrikantescapades.com
मस्त! पण झालेय काय की आपले सामान्यजन खूप विसराळू, म्हणजे चांगले केले तरी 'हे' ज्यांच्याकडून काहीतरी मिळेल किंवा मग ज्यांच्या प्रचाराला सल्लू वगैरे येईल त्यालाच मतदान करणार. मान्य आहे बदल होतोय पण, जो पर्यंत आपण सर्व येनकेन प्रकारे या सगळ्या विरोधात बोंब उठवत नाहीत तो पर्यंत हे असेच चालत राहणार. ते आहेच ना, ब्रांड बिल्डींग मध्ये जाहिरात लागते. वस्तू अगदी साधीच का असेना सारखी लोकाच्या समोर असली की वस्तू [साहेब] फॉर्मात आहे असा समज होतो. फॉर्मात असणे म्हत्वाचे! दुकानात जाऊन कापड घेताना बघतो ना [आधीच्या काळात] आपण की बबा कापड कस आहे [नाही कळला तरी हात लावतोच ;-)] ? पण आता थोडासा बदल झालाय आपण आता बघतोय ते लेबल! तसच सगळच एकदम व्यावसायिक रित्या चालेले आहे! शेवटी राजकारण हा व्यवसायच ना! कारण साहेबांकडे मागच्या निवडणुकीला फॉर्म भरताना ४ कोटी असतात आणि त्या नंतरच्या १६ कोटी. आणि तसे पहिले तर साहेब असतात शेतकरी किंवा मग व्यवसायिक. ५ वर्षात चारपट [किंवा जास्त] करणारा व्यवसाय! आता मला तर असा प्रश्न पडतो मायला हे शेतात घेतेत तरी काय की यांना ५ वर्षात ४ पट वैध मार्गाने [आता निवडणुकीच्या अर्जात हा आकडा लिहितात म्हणजे तो मार्ग वैधच असणार ना!] रिटर्न मिळतात. मला जर ह्या पिकाचे नाव कळले तर आमच्या सगळय शेतात हेच लावतो की, नाही त मग शासनाला गरिबी निर्मूलनाचा मार्गच देतो, सगळेच करोडपती नाहीत कमीत कमी लखपती!
एकंदर या सगळ्यांचे कारण, सर, आपण सर्व लोक आहोत ज्यांना कळतनाही [अपवाद आहेत] ते मतदान करतात आणि ज्यांना कळते ते करत नाहीत [अपवाद आहेत]. मागे यांच्या त्या इंग्रजी आणि बऱ्याच मराठी पेपरात आले की देश बदणार, आणि काय ते तरुणांचा सहभाग वाढला, बरेच शिक्षित तरुण राजकारणाकडे वळले, मग पुन्हा ते गेट वे वर मेणबत्त्या लावल्या गेल्या वगैरे, वी वांट चेंज असा ओरड झाला; शेवटी यांना निवडणुकीच्या दिवशी वेळ मिला नाही; आणि निवडणुकीत आमचे बरेच युवक पडले!
एकंदर यांच्या फोटोच्या च्या मोहात ना पडता कामे पाहून मतदान केले तर नाही लागायचे फोटो 'कदाचित'!
जय महाराष्ट्र!
@प्रकाश,
वा मित्र! काय प्रतिक्रिया दिलीत! कदाचित माझ्या पोस्ट मध्ये हे सांगायचं राहुनच गेलं. पण आपण ती कमी पुर्ण केलीत.
भेटत रहा - आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत!
अनेक आभार.
Post a Comment