Categories

Aeroplanes

Aeroplanes

Thursday, 25 February 2010

सादर करत आहोत मराठी मंडळी.कॉम, मराठी ब्लॉगर्सचे हक्काचे व्यासपीठ!

ज्ञानेश्वरांच्या”परि अमृताच्याही पैजा जिंके” नंतर कुण्या पोर्तुगीज फादर स्टीफन्सने लिहिलेल्या या ओळीच मराठीचा गोडवा सांगण्यास पुरेशा आहेत. आहेच आमची मऱ्हाटी वाणी अशी की… कुणालाही ऐकताना भुरळ पडावी. कुणी मनापासून कौतुक केले की कानात सतारीच्या तारा छेडल्याचा भास व्हावा आणि अगदी मनापासून शिवी हासडली तर कानात उकळते तेल ओतल्यागत जाळ अंतर्मनात निघावा अशी आमची मराठी. “महा”राष्ट्राची बोलीभाषा, राजभाषा आणि जनभाषा.

होय तोच मराठी जिथे प्रांत उगवत्या सुर्याच्या साक्षीने मंदिरातल्या काकडआरतीबरोबरच मशिदीची पहिली सुरेल बांगही तेवढीच सुंदर ऐकू येते. जिथे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ओवीने अवघ्या जगाला वेडे केले. तुकोबांच्या अभंगांनी अवघा मनुष्यगण अद्वैत झाला. संत एकनाथांनी जगाला भूतदयेचा संदेश दिला. रामदास स्वामींनी बलोपूजेचा मंत्र फुंकला.


याच संत-महंतांपासून स्फूर्ती घेऊन शहाजीराजे आणि जिजाऊंनी शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडवला, शिवाजी महाराजांनी याच ओघवत्या मराठी भाषाकौशल्यावर जेधे, पिंगळे, देशपांडे, गुजर, मालुसरे अशी वाघाच्या काळजाची माणसे जोडली, महाराष्ट्राबाहेर जाऊन प्रांत जोडला आणि परक्या शक्तींना आपल्या तलवारीच्या आणि या मराठी मातीतून आलेल्या धाडसाच्या जोरावर पाणी पाजले. याच मराठी धर्मापायी संभाजीराजांनी मृत्यू कवटाळला.पेशव्यांनी शिंदे फडणीसांच्या बळावर अटकेपार झेंडे लावले. तात्या टोपेंनंतर वासुदेव बळवंत फडकेंनी क्रांतीची पताका उभारली आणि पुढे टिळक, आगरकर आणि सावरकरांसारखे निधड्या छातीचे वीर ती पताका घेऊन मिरवले.
गोखले, आंबेडकर, कर्वे, फुले, विनोबा भावे, भाऊराव पाटील, कॉ. डांगे यांसारख्या समाज धुरिणांनी जो पाया घालून दिला होता त्यावर बाबा आमटे आणि त्यांचे कुटुंबीय, अशासारख्यांनी कळस उभारला. कला-क्रीडा आणि साहित्यामध्येही फाळके, मंगेशकर, प्रभात, भीमसेन जोशी, पुल देशपांडे, माडगूळकर, तेंडुलकर ते आजचे सलील-संदीप, अजय-अतुल, गावसकर, कुंटे, हजारे, वाडेकर अशा अनेक रथी-महारथींनी जग पादाक्रांत केले आहे.

ही सगळी ऊर्जा कुठून आली? त्याचे एकच उत्तर आहे “आमची मराठी”. होय तीच मराठी अस्मिता जी सह्याद्रीच्या कातळकड्यांत आहे, भीमा-कृष्णा-कोयनेच्या तीरावर आहे, कोकणातल्या लाल मातीत आहे, विदर्भाच्या रांगड्या बोलीत आहे, मराठवाड्यातल्या अजंठा-वेरुळच्या पाषाणकलेत आहे, सातपुड्याच्या थंड हवेत आहे. त्याच मातीने आम्हाला जन्म दिलाय. आणि तिचे आमच्यावर सात जन्माचे ऋण आहे. या ऋणातून आम्ही मुक्त होऊ इच्छित नाही. पण थोडी का होईना परतफेड नक्की करावीशी वाटते आहे. म्हणूनच हा एक प्रामाणिक प्रयत्न. “मराठी मंडळी”चा…!!!

नऊवारी जरीकिनारी पैठणी, बुगड्यांची माळ आणि पसाभर मोठी नथ घातलेले खानदानी सौंदर्य या मराठी भाषेच्या अलंकारामध्ये दडलेले आहे. शाहिरी पोवड्याची डफाची थाप, लेझीमची गाज आणि ढोल-ताशाचा नाद मराठी भाषेत वीररस काठोकाठ ओतत आहेत. ढोलकीवरचा ताल आणि घुंगराचा छणछणाट ऐकून मराठीचा घट शृंगाररसाने निथळत आहे. नाट्यसंगीताचा आब मराठीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो आहे. तसाच सुमधुर भावगीताने धबाबा कोसळणारा अधीर मनःप्रपातही संथ होतो आहे.

संक्रांतीच्या तिळगूळाने ऊबदार आणि मधुर झालेली मराठी वाणी जहालपणे शिमग्याला मुक्तहस्ते शिव्या देऊ शकते आणि धुळवडीला गटारात लोळवू शकते. काळ्या आईचं दान संक्रांतीला वाणाच्या रुपाने तिला परत करायचं हे या मराठी माणसांनीच जगाला शिकवले. याच मराठी काव्य-शास्त्र-विनोदाने अवघ्या विश्वात सन्मानी गुढ्या उभारल्या आहेत. आषाढी-कार्तिकीला अवघा महाराष्ट्र “ग्यानबा-तुकाराम” करत भक्तीरसात न्हाऊन लाडक्या विठूमाऊलीला भेटायला पायी वारीला निघतो. श्रावणी सोमवारच्या गाभाऱ्यातल्या पहाटेची धीरगंभीर मंत्रोच्चारणा अवघे ब्रम्हांड अवतरल्याचा अनुभव देते. बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला पुरणाचा घास भरवून त्याच्याही उपकारांची जाणीव आम्हांला असते. गौरी-गणपतीला अवघा महाराष्ट्र उत्सवी वातावरणात रमून जात असतो. कोजागिरीच्या टिपूर चांदण्यात केशरी दुधाच्या साथीने गप्पांना काय तो बहर येतो. दिवाळीला अवघा मराठी मुलुख ऐश्वर्यात न्हाऊन निघतो. एवढे ऐश्वर्य की लक्ष्मीपूजनला उदारपणे जुगारही खेळावा. पाडव्याला नथ सांभाळत कारभारीला ओवाळणारी घरधनीण आपल्या सख्याकडे किती नजाकतदार लाडिकपणे पाहून पाडवा “वसूल” करत असते हे काय अवघ्या मराठी मुलखाला ठाऊक नाही?

अशी ही विविधरंगी विविधढंगी मराठी संस्कृती. हिच्या पायीच आम्ही हा यज्ञ सुरु केला आहे. खात्री आहे की आपण पण या यज्ञात सामील व्हाल. आपणा सर्वांचे स्वागत.

आम्ही “मराठी मंडळी”ला यज्ञ म्हणतोय कारण, आम्हाला पुर्णपणे कल्पना आहे की सगळ्याची सुरुवात ही नवख्याच्या नशिबानं होते, आणि मग सुरु होते अत्यंत खडतर अशी परिक्षा… पदोपदी! पण तरीही हा यज्ञ करण्याचा घाट आम्ही घातलाय… आपल्या माय मराठीसाठी. आत्ताच्या जगामध्ये आणि जागतिकीकरणामध्ये कोणतीही प्रादेशिक भाषा टिकवुन ठेवणं तसं अवघड झालंय. पण ते अशक्य नक्कीच नाही! आपली मराठी या रेट्यातही टिकुन राहावी यासाठी आपल्यापैकी प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करतोय. मराठी साहित्य तर समृद्ध आणि सक्षम आहेच. कोणी अजुनही मराठी वाचन आवर्जून करतोय, कोणी मराठीमधुन लेख लिहीतोय. अनेक मराठी वृत्तपत्रं, मासिकं, साप्ताहिकं आहेत ज्यातुन बरेच लोक आपले लेख लिहीत असतात. असंच अजुन एक माध्यम आहे – ब्लॉग्स. तुम्हाला वाचतांना आश्चर्य वाटेल, पण आजमितीला सुमारे १५ ते २० हजार लोक आपापल्या ब्लॉग्सवर मराठीमधुन लिहीत आहेत! हे लोक तिथं आपल्या कथा लिहीतात, कविता प्रकाशित करतात, मतं मांडतात, अभ्यासपुर्ण लिखाणसुद्धा करतात!! आणि हो, इथं सुद्धा तेवढंच दर्जेदर लिखाण असतं!!! पण अजुन म्हणावा तेवढा प्रकाशझोत या माध्यमावर आणि या माध्यमातुन लिहिणाऱ्यावर पडलेला नाहीये. नेमकं याच कारणासाठी हा यज्ञ आहे. या यज्ञाचं स्वरुप, त्याची व्याप्ती आणि त्याची फलनिष्पत्ती याबद्दल स्वतंत्रपणे लिहुच, पण यात सगळ्यात महत्वाचं ते सुरुवात करणं.

तर अशी ही आमची “इये मराठिचिये नगरी”

संक्रांतीचा मुहुर्त साधून याच मराठी आईचे वाण घेऊन आम्ही वाटचाल सुरु केली. आमची सगळी एकेकाची संगणक कौशल्ये एक केली आहेत या “मराठी मंडळी” नावाच्या सुगड्यात. येताय ना तुम्ही पण? यंदाच्या धुळवडीला हा चौदा विद्या, चौसष्ट कला असा विविधरंगांनी भरलेला घट आम्ही तुमच्यावर रिता करत आहोत, तुम्हांला नवरसात चिंब भिजवायला… आहात ना तयार?

सादर करत आहोत, मराठी ब्लॉगर्सचे हक्काचे व्यासपीठ, मराठीमंडळी.कॉम

यंदाच्या धुळवडीच्या दिवशी, १ मार्च २०१० रोजी.
फाल्गुन कृष्ण द्वितिया, शके १९३१.
रात्रौ: १०:०३ मि. (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

आपली ऑनलाईन उपस्थिती नोंदवा.

अधिक माहितीसाठी जरुर लिहा अथवा चॅट करा

pankajzarekar[at]gmail.com
mebhunga[at]gmail.com
aniket.com[at]gmail.com
vikrant.deshmukh888[at]gmail.com

- मराठी मंडळीसाठी - पंकज झरेकर.

Thursday, 18 February 2010

शिवजयंतीच्या शुभेच्छा!


प्रौढप्रताप पुरंधर, क्षत्रिय कुलवतंस,
गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधीश्वर,
राजाधिराज, छत्रऽपतीऽऽ शिवाजी महाराज कीऽ जऽयऽऽ!

[छायाचित्र साभारः मराठी विकि]

Tuesday, 16 February 2010

मराठी संकेतस्थळांची स्पर्धा

अलीकडे संगणकावर मराठीतून माहितीची देवाणघेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनातील विविध विभागांकडे असणारी माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी ह्यासाठी प्रयत्न होत आहेत. कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान, अर्थव्यवहार अशा विविध विषयांवरील माहिती आज मराठीतून संगणकावर उपलब्ध होऊ लागली आहे. अशा वेळी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ह्या वर्षी राज्य मराठी विकास संस्थेने सीडॅक मुंबई (बॉस) आणि माहिती तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र शासन ह्यांच्या सहकार्याने मराठी संकेतस्थळांची (वेबसाईट्सची) खुली स्पर्धा आयोजित केली आहे.

ही स्पर्धा १. शासकीय संकेतस्थळे आणि २. अशासकीय संकेतस्थळे अशा दोन गटांत घेण्यात येईल. पहिल्या शासकीय संकेतस्थळे ह्या गटासाठी पहिले, दुसरे आणि तिसरे असे अनुक्रमे १५०००, १०००० आणि ५००० रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील. तर दुसऱ्या अशासकीय संकेतस्थळे ह्या गटासाठी पहिले, दुसरे आणि तिसरे असे अनुक्रमे ३५०००, २०००० आणि १५००० रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील.

दि. २०/०२/२०१०पासून दि. ०६/०३/२०१० पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या दुवा क्र. १ ह्या अधिकृत संकेतस्थळाच्या मुख्य पानावर ऑनलाइन प्रवेशपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. प्रवेशपत्रिकेचा दुवा (लिंक) राज्य मराठी विकास संस्थेच्या दुवा क्र. २ तसेच दुवा क्र. ३ आणि दुवा क्र. ४ ह्या संकेतस्थळांवरही देण्यात येईल. वरील कालावधीत स्पर्धकांनी ऑनलाइन प्रवेशपत्रिका संपूर्णपणे भरून स्पर्धेतील सहभाग नोंदवायचा आहे. प्रवेशपत्रिका स्वीकारण्याची अंतिम मुदत ०६/०३/२०१० ही आहे. वरील गटांपैकी प्रत्येक गटाला पहिले, दुसरे आणि तिसरे अशी तीन पारितोषिके देण्यात येतील.

संकेतस्थळासाठी वापरलेली प्रमाणके (स्टॅन्डर्ड्‌स), वापरलेला टंक (फॉण्ट), संकेतस्थळाची तांत्रिक गुणवत्ता, वापरासंबंधी पुरवलेल्या सोयी, उपयुक्तता, अद्ययावत्‌पणा, वापरकर्त्यांच्या सहभागाची सोय (इण्टरऍक्टिव्हनेस), माहितीची मांडणी, भाषेचा दर्जा, माहितीचा संग्रह इत्यादी निकषांवरून तज्ज्ञ परीक्षकांकडून सहभागी संकेतस्थळांचे परीक्षण करण्यात येईल.

शासनाचे विविध विभाग तसेच विविध विषयांवर संकेतस्थळे निर्माण करणाऱ्या व्यक्ती, संस्था इत्यादींनी ह्या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेने केले आहे.

[मनोगत वरुन - जसंच्या तसं - माहितीसाठी.]

सदर स्पर्धेसाठीची ऑनलाइन प्रवेशपत्रिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तेंव्हा ६ मार्चपुर्वी आपला अर्ज पाठवा.

Monday, 1 February 2010

बुकमार्कलेट्सः एक क्लिक - काम फत्ते!

कधी कधी इंटरनेटवर अगदी छोट्या गोष्टी म्हणजे - पहात असलेल्या साईटची पी.डी.एफ. बनवने, लिंक ट्विटर वर पाठवने किंवा तुम्हाला आवडलेली ती वेबसाईट/ ब्लॉग मित्राला पाठ्वणे यासाठी बरीच मशागत करावी लागते. मात्र या सार्‍या आणि आणखी काही उपयुक्त गोष्टी जर एका क्लिक मध्ये करता आल्या तर? सोप्प आणि काम फत्ते ना?


फायरफॉक्ससाठी: हिरव्या बॉर्डर च्या बॉक्स वर क्लिक करुन [धरुन ठेवा] ते वरच्या बुकमार्कबारवर आणुन सोडा! किंवा हिरव्या बॉर्डर च्या बॉक्सवर राईट क्लिक करुन - "बुकमार्क धिस लिंक" सिलेक्ट करा. आलेल्या बॉक्स मधुन "Folder = Bookmarks Toolbar" सिलेक्ट करा आणि सेव करा!

आय.ई.: हिरव्या बॉर्डर च्या बॉक्सवर राईट क्लिक करुन - "अ‍ॅड टु फेवरीट" सिलेक्ट करा. जरी अनसेफ आहे असा मेसेज दिला तरी ठिक आहे म्हणा!

बुकमार्कः ब्राउजरमध्ये, अ‍ॅड्रेसबारच्या खाली [या जागेला बुकमार्क'बार म्हणतात] एखाद्या वेबसाईट/ ब्लॉगची लिंक जोडुन ठेवणे. [बुकमार्कींग]

बुकमार्कलेटः ब्राउजरमध्ये, बुकमार्क'बार वर 'जावास्क्रिप्ट' किंवा ब्राउजर मध्ये चालणारी स्क्रिप्ट वापरुन एखादं काम [ई-मेल/ प्रिंट/ ट्विट इ.] एका क्लिक मध्ये करुन देणार्‍या छोट्या कमांड्स.


गुग.ल: सध्या माझ्या सर्वात जास्त वापरात असणारी ही सुविधा. ट्विटर वगैरेसाठी लांबलचक लिंक छोटी करण्यासाठी ही सोय मस्त आहे. तशा, टायनी युआरएल किंवा बीट्.ली अशा आहेतच. मात्र बुकमार्ककरुन एका क्लिकमध्ये तुम्हाला शॉर्ट लिंक करुन देणारी ही सोय माझी तरी आवडती आहे!

गुगल बुकमार्क: गुगलची गुगल बुकमार्क ही सुविधा आपल्या आवडत्या वेबसाईट्स एकत्र केलेली करण्यास मदत करते. यामध्ये जोडलेल्या साईट्स/ लिंक्स आपणास कधीही आणि कोणत्याही ब्राउजर मधुन पाहता येतात. त्यामुळे एखादी साईट आवडली की ती लागलीच बुकमार्क करणं कधीही फायद्याचच!

नोट करा:गुगलची नोटबुक ही सुविधा म्हणजे ऑनलाईन नोंदवहीच आहे. यामध्येही आपण वेबसाईट्स लेबल्स आणि आपल्या विशेष नोंदीसह बुकमार्क/ सेव करु शकता.

ट्विट करा: ट्विटरबद्दल नव्यानं काही सांगायची गरज नाहीच. आपण जर "एकोफोन" वापरत असाल तर अतिउत्तमच. नाही तर ही सोय वापरुन तुम्हाला लागलीच सध्या पहात असलेल्या साईटबद्दल ट्विट करता येईल.

ब्लॉग पोस्ट करा: जर तुम्ही ब्लॉगरवर लिहित असाल आणि एखादी झटपट पोस्ट टाकायची असेल तर हा उत्तम मार्ग. म्हणजे समजा तुम्ही एखादं बातमीपत्र वाचताहात आणि वाटलं की ती न्युज पटकन ब्लॉगवर टाकावी. या बुकमार्कलेटचा वापर करा. तो त्या बातमीची लिंक वगैरे आपोआपच घेईल. हां मात्र तुमचे एकापेक्षा जास्त ब्लॉग असतील तर पब्लिश करायच्या आधी उजव्या कोपर्‍यात जरुर पहा - कोणत्या ब्लॉगवर पब्लिश करताहात.

जीटॉक: जीमेल नेहमीसाठी ओपन न ठेवता जर जी'टॉक पहायचं असेल तर ते एका छोट्याशा पॉप-अप बॉक्स मध्येही दाखवता येतं. हवं तेव्हा पहा.. बंद करा. एक क्लिक!

जीमेल: एखादी लिंक पटकन जीमेल ने पाठवण्यासाठी हा मस्त शॉर्टकट. एका क्लिक मध्ये मेल कंपोज होते. विषय आणि आशय आपोआपच भरला जातो. कुणाला पाठवायची, त्याचा इ-मेल अ‍ॅड्रेस टाका आणि क्लिक सेन्ड!

कोण ट्विटले?:तुमच्या पहात असलेल्या साईट् किंवा ब्लॉगची/ वेबपेजची लिंक ट्विटरवर आहे का? असेल तर कुणी ट्विट टाकले हे एका क्लिकमध्ये माहित करुन घेण्यासाठी ही चांगली सोय आहे!

स्क्रीनशॉट:ही आणखी एक भन्नाट सोय आहे. काहीवेळा आपणास वेबपेजचा स्क्रिनशॉट हवा असतो. प्रिंटस्क्रिन करुन - पेंटब्रश वापरुन फार अवघड काम होतं! मग ही सोय - एकाच क्लिक मध्ये समोर असलेल्या पानाचा स्र्कीनशॉट तयार. शिवाय हीच सोय वापरुन तुम्ही घेतलेला स्क्रीनशॉट पीडीएफ/ मेल./ ब्लॉग/ ट्विट..... आणि बरंच काही करु शकता. शिवाय तो स्क्रीनशॉट एडिट करण्यासाठी पिक्सलर ही सुविधाही वापरता येईल.

पीडीएफ:ऑनलाईन पी.डी.एफ. बनवण्यासाठी ही चांगली सोय आहे. समोर ओपन असलेल्या साईटची एका क्लिकमध्ये पी.डी.एफ. फाईल बनवता येते. मराठी किंवा इतर भाषांमधील साईट्स यांच्या पी.डी.एफ, चांगल्याबनत नाहीत. मात्र इंग्रजीमधल्या साईट्सची चांगली पी.डी.एफ बनवता येते. ओपन ऑफिसच्या रायटरमध्येही तुम्हाला एका क्लिकमध्ये पी.डी.एफ. बनवता येते हे माहितच असेल. शिवाय टेंप्लेट वापरुन तुम्हीही ई-बुक बनवु शकता!

जर तुम्ही पी.डी.एफ. बनवण्यासाठी सॉप्टवेअर शोधत असाल तर जीडॉक क्रीएटर नावाचं फ्री सॉप्टवेअर उत्तम आहे. वर्ड/ पॉवरपॉईंट यापासुन पी.डी.एफ. बनवण्यासाठी हे उत्तम सॉप्टवेअर आहे.

या शिवाय, पिक्सलर, ब्राउजर मध्ये चालणारा एक फोटो एडिटर आहे. फोटोशॉप वगैरे सारखी सॉप्टवेअर ला चांगला पर्याय आहे! त्याचं फायरफॉक्सचं एक्टेंशन वापरुन कोणताही ऑनलाईन फोटो तुम्ही ब्राउजरमध्येच एडिट करु शकता! फायरशॉट हे फायरफॉक्सच एक्टेंशन ही स्क्रीनशॉट घेण्यासाठी अतिउत्तम! पिकनिक हा ऑनलाईन फोटो एडिटरही त्याच तोडीचा आहे!

आणि हो, गुगलच्या काही सुविधा वापरण्यासाठी गुगल अकॉंटनं लॉगिन करणं गरजेचं आहे

तुम्ही हे बुकमार्कलेट्स वापरुन पहा.. पुन्हा भेटुच! हो, काही प्रश्न - आहेत..? कमेंट्स/ ई-मेल लिहा!