ब्लॉगवरचा लेख/ फोटो/ क्रिएटीव्ह कॉपी - पेस्ट करणे हे काही नवीन नाही. काही प्रकरणांत हा उद्देश प्रामाणिक असतो - म्हणजे - आवडलं म्हणुन शेअर केलं - अर्थात ते स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न नसतो. तर काही प्रकरणांत चोरुन - त्यावरचा लोगो - वॉटरमार्क काढुन ते साहित्य आपल्याच नावावर खपवायचा प्रयत्न असतो.
बराच वादाचा आणि "काँप्लिकेटेड" म्हणावा असा एक मुद्दा! मित्रांनीही बर्याचदा यावर प्रश्न विचारलेले. मी काही कायद्याचा तज्ञ अथवा पंडित नाही, मात्र उपलब्ध असणार्या माहितीच्या आधारे काही माहिती इतरांसाठी लिहितोय.
भारतीय प्रताधिकार कायदा हा ब्रिटीश प्रताधिकार कायदा - १९११ वरुन तयार करण्यात आलेला असुन सध्या तो भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार अंमलात आहे.
प्रताधिकार - कॉपीराईट - म्हणजे काय?
प्रताधिकार हा साहित्यिक, नाटककार, कलाकार, सिनेमा - संगितकार - ध्वनिमुद्रण यांना [या कार्याशी निगडीत असणार्यांना] त्यांच्या कार्याची/ कामाची नक्कल होऊ नये यासाठी कायद्याने दिलेला एक अधिकार आहे. त्यामध्ये या संबंधित कामाचा/ कार्याचा वापर, संबधित सार्वजनिक व्यवहार, फेरफार करुन स्वीकार व अनुवादन याबातही अधिकार आहेत. या अधिकारांमध्ये कार्यान्वये काही बदल असु शकतात.
काय काय कॉपी-राईट होऊ शकतं?
- वाङमयीन कार्य
- संगीतयुक्त कार्य व संबधित शब्दरचना
- नाटक - ड्रामा - व संबंधित संगीत
- मूकनाट्य - परीकथेवर आधारित मूकनाट्य - व संबंधिक कोरिओग्राफि कार्य
- चित्रीय - सचित्र, चित्रकला - रंगकला, शिल्पसंबंधी कार्य
- ध्वनिमुद्रण - नोंदणी
- गृहशिल्प - इमारतीचे नकाशे संबधित कार्य
प्रताधिकार - कॉपीराईट - हे शाश्वत/ कायमस्वरुपाचे असु शकते का?
- नाही. प्रताधिकार - कॉपीराईट - कायदा ठराविक कालासाठी आहे. जसं:
- वाङमयीन कार्य
- संगीतयुक्त कार्य व संबधित शब्दरचना
- नाटक - ड्रामा - व संबंधित संगीत
- मूकनाट्य - परीकथेवर आधारित मूकनाट्य - व संबंधिक कोरिओग्राफि कार्य
- चित्रीय - सचित्र, चित्रकला - रंगकला, शिल्पसंबंधी कार्य [छायाचित्र/ छायाचित्रण व्यतिरिक्त]
उदा. जर लेखक/ निर्माता यांचा मृत्यु २०११ साली झाला तर ते कार्य पुढील वर्षापासुन म्हणजे २०१२ पासुन २०७२ पर्यंत कायदेशीर स्वीकारण्याजोगा - वैध - असेल
- निनावी - अनामित कार्य - टोपन नावाने लिखित
- लेखकाच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले कार्य
- छायाचित्र
- चलचित्रनिर्माण - चित्रपट
- ध्वनिमुद्रण - नोंदणी
- शासनाचे - सरकारी कार्य
- सार्वजनिक अंगीकृत कार्य
- आंतरराष्ट्रीय संघटना कार्य
उदा. २०११ साली प्रकाशित कार्य पुढील वर्षापासुन म्हणजे २०१२ पासुन २०७२ पर्यंत कायदेशीर स्वीकारण्याजोगा - वैध - असेल.
- प्रक्षेपण पुनर्निर्माण हक्क:
- प्रेक्षकांसमोर सादर करून दाखवणारा (नट - कलाकार - वादक इ):
उचित व्यवहार - फेअर डीलिंग - च्या आधारे काय करता येते?
या बाबतीत वाङमयीन कार्य, संगीतयुक्त कार्य, नाटक - ड्रामा, मूकनाट्य - परीकथेवर आधारित मूकनाट्य, चित्रीय - सचित्र, चित्रकला - रंगकला, शिल्पसंबंधी कार्य [संगणकीय कार्यक्रमाव्यतिरीक्त] यांचा वापर खालील गोष्टींसाठी करता येतो:
- वैयक्तिक वापर - संशोधन वगैरे
- गुण-दोषविवेचन - समालोचन
- संघ किंवा संघटना - यांच्याकडुन विना फायदा/ नफा या तत्त्वावर वापर/ उपयोग केला गेल्यास
- संघ किंवा संस्था - या बाबतीत प्रयोग/ खेळ हा केवळ हौस म्हणून/ प्रेक्षकांकडुन पैसे न घेता अथवा धर्मसंस्थेच्या फायद्यासाठी वापर/ उपयोग केला गेला असल्यास
- पुस्तकाच्या तीन पेक्षा जास्त प्रती न काढता वापरल्यास
आता ब्लॉगवर/ संकेतस्थळावर केलेले लेखन हे आपल्या विचारातुन झाले असेल तर ते लेखन रुपात आले की कॉपीराईट - प्रताधिकार - लागू होतो. संबधित लेखनाच्या प्रकाशित तारखेवरुन त्याचा अस्सल/खरेपणाही कळतो त्यामुळे अशाप्रकारचे लेखन/ चोरी बर्याचदा सापडते. अशा संकेतस्थळांवर कायदेशीर कारवाईही होऊ शकते.
तर असा हा कॉपीराईट - प्रताधिकार, थोडक्यात!
थोडं विषयांतर करुन पायरसीकडे [चाचेगिरी?] पाहु. संगणक आणि संगणकाची आज्ञावली पासुन ते चित्रपटांच्या पायरसी पर्यंत.
आपल्याला सध्या संबधित असलेली संज्ञा: सॉफ्टवेअर पायरसी [संगणकाची आज्ञावली चौर्य!]: साध्या भाषेत सांगायचं तर - सॉफ्टवेअरचे प्रताधिकार उल्लंघन म्हणजेच सॉफ्टवेअर पायरसी! अर्थात इथेही प्रताधिकार - कॉपीराईट - हा प्रकार आहेच. आपण वापरत असणार्या संगणकावरील कार्यरत प्रणाली [ऑपरेटींग सिस्टम] ते संगणकावर टाकलेले सॉफ्टवेअर्स [संगणकाची आज्ञावली] हे सर्व सॉफ्टवेअर पायरसी मध्ये येते. त्यामुळे कोणतंही सॉफ्टवेअर फुकट मिळालं अथवा मित्रानं दिलं म्हणुन इंस्टॉल करायच्या आधी नक्की विचार करा.
बिझनेस सॉफ्टवेअर अलायंसच्या पाहणीनुसार भारत ६९% इतका पायरसी प्रमाण नोंदवुन ४२व्या क्रमांकावर आहे तर चीनचे पायरसी प्रमाण ८२% असुन तो १७व्या क्रमांकावर आहे.
वरील लिखाण लिहिताना मित्रासोबत या विषयांवर थोडं बोलणं झालं, मात्र त्यातील वादग्रस्त मुद्दे असे:
निखिल: मला रोज कुणी ना कुणी एखादा लेख/ कविता/ फोटो पाठवत असतं. अर्थातच ते फॉरवर्डेडच असतं. मलाही माहिती आहे की पाठवणार्याची हे लिहिण्याची किंवा तयार करण्याची क्षमताच नाही. मात्र त्यालाही हे कुणीतरी फॉरवर्डच केलेलं असतं? अशा वेळी कॉपीराईट किंवा मुळ लेखक/ छायाचित्रकार यांचा संबंध कसा?
मी: हे बघ, लेखकाने त्याचे विचार लेखनात उतरवले किंवा छायाचित्रकाराने एखादे छायाचित्र काढुन ते प्रकाशित केलं की कॉपीराईट - प्रताधिकार - लागू होतो. जर मुळ लेखक/ छायाचित्रकार माहित नसेल तर असं फॉरवर्डेड मटेरियल शक्यतो आपणहुन फॉरवर्ड करणं थांबवावं [ हां, मात्र काही सामाजिक संदेश/ माहिती देणार्या मेल्स फॉरवर्ड करा.] शिवाय अशी मेल पाठवणार्यालाही आपण हाच संदेश द्यावा. माहित असेल तर संबधिताच्या संकेतस्थळाचा दुवा द्यायलाच हवा. ते लेख/ छायाचित्र प्रत्यक्ष त्या - त्या संकेतस्थळावरच पाहुन आपणही त्या लेखकाला/ चित्रकाराला प्रोत्साहन द्यायला पाहिजे असं माझं मत. शिवाय अशा प्रकारे आपणही कुठतरी अशा प्रकाराला थांबवण्यात मदत करतोय ही जाणीवही राहिल.
निखिलः आता मला सांग, समज मी माझ्या एखाद्या मित्राचा/ ओळखीच्याचा किंवा आवडलेला एक लेख/ एक फोटो किंवा एखादं डिझाईन मी माझ्या ब्लॉगवर वापरलं. मला माहित आहे की तो लेख ज्या संगणकावर लिहिला गेला आहे - त्याची प्रणाली [ओ.एस] - किंवा - तो फोटो जे सॉफ्टवेअर [फोटोशॉप/ लाईटरुम] वापरुन प्रोसेस केला आहे - किंवा - ते डिझाईन जे सॉफ्टवेअर वापरुन बनवलं आहे [फोटोशॉप/ इलुस्ट्रेटर] - ते सारं पायरेटेड आहे! त्याच्या मशिनवर कित्त्येक - पायरेटेड - सिनेमे पडलेत!! जर आपण आपले काही चोरी झाल्याचे म्हणत असाल तर ते चोरीतुनच निर्माण झालेलं नाही का? मग त्याने "कॉपीराईट - कॉपीराईट" असं म्हणावं का? की तुम्ही केली तर कलाकारी आणि आम्ही केली तर चोरी?
मी: अरे बापरे! अगदी खोडालाच हात घातलास लेका!
हे बघ माझं प्रामाणिक मत असं आहे की पायरसी आणि कॉपीराईट्स दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. " स्वत: पायरेटेड सॉफ्टवेअर्स वापरुन कॉपीरायटेड मटेरियल आहे " असं संबोधणं चुकीचं असेल/ नसेल. त्याकडे नक्कीच प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे. आणि कॉपीराईट्स संबंधी जागरुक असणारे हे लिगल सॉफ्टवेअर्सच वापरतील ना? कारण उद्या त्यांनी अशा एखाद्या चोरा-विरुध्द तक्रार करायची म्हटली तर त्यांना संबधित पुरावे देताना त्यांच्याकडील असणार्या मुळ प्रतिसोबत संबधित संगणक किंवा सोफ्टवेअर्स यांचीही माहिती द्यावी लागु शकते आणि अशा वेळी कॉपीराईट्सच्या ऐवजी पायरसीची केस होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.
ब्लॉग - साहित्यचोरी - फोटो - ग्राफिक्स ते पायरेटेड सॉफ्टवेअर्स पासुन सिनेमाचे टॉरेंट्स सगळं एकच! कुणी कुणाला दोष द्यायचा? पायरसी आणि कॉपीराईट्स याबाबतीत लेखक आणि वाचक दोघांमध्येही प्रामाणिकतेची आणि कर्तव्यनिष्ठेची जाणीव हवीच हवी!
5 comments:
बर्याच गोष्टी स्पष्टं झाल्या.तुमचा हा लेख पुन्हा पुन्हा वाचला पाहिजे.सगळीच माहिती एकदम लक्षात रहात नाही.आंतरजालावरच्या लिखाणाला कॉपीराईट लागू नाही असा सर्वसाधारण समज आहे.पण तसं कॉपीराईट लागू असल्याचं आपल्या लिखाणावरून समजतं.माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद.बाकी तुम्हाला तसदी देतोय.यापूर्वी मी मेल केला आहे.आठवण करतोय माझ्या ब्लॉगचं विजेट कोड करून देण्यासंदर्भातली.आपण बिझी असाल.सवडीप्रमाणे कळवावे.आभार!
खूप छान माहिती दिलीत ..
४ वर्षापूर्वी मी व्यवसाय सुरु केला तेव्हा पहिल काम केल ते अधिकृत संगणक प्रणाली विकत घेण्याच .. ते माझ्या खूप फायद्याच ठरलं कारण आता मला कोणी काम द्यायला कचरत नाही अगदी मोठे स्टुडिओ सुद्धा .. आणि मला ही जाहीर पणे माझ काम दाखवता येत .. लपवा छपवी नाही ..
भारताचा क्रमांक ४२ आहे हे वाचून जरा बर वाटल .. मला तो क्रमांक १ वाटत होता .. :D
माहिती पुर्ण लेख.
अनुत्तरीत प्रश्न मांडले आहेत सगळे. सगळ्यांची उत्तरं माहीत असूनही उघडपणे देण्याची हिम्मत होत नाही असे... :) छान लेख.
Deepak, khoopach IMP info aahe.
atishay mahiti purn lekh. Chhan mandani.
Ya vishayavr adhik mahitichi garaj hotich.
Dhanyavaad.
Post a Comment