Categories

Aeroplanes

Aeroplanes

Wednesday, 25 November 2009

भावपूर्ण श्रद्धांजली...!

जीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे: हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे आदी अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...!



"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा" - शहीद रामप्रसाद बिस्मिल.

Thursday, 19 November 2009

मंडळ आपले आभारी आहे!

स्टार माझा च्या "ब्लॉग माझा" स्पर्धेचे निकाल लागल्याचे सकाळी ट्विटरवर समजले आणि मग मेल वरुन सविस्तर बातमी समजली!



आपल्या प्रोत्साहनासाठी, आपण सर्व मित्र - वाचक वर्ग आणि स्टार माझाच्या टीमच्या या कौतुकास्पद कार्यक्रमासाठी - मंडळ आपणा सर्वांचे हार्दिक आभारी आहे!! सर्व विजेत्याचेही मन:पुर्वक अभिनंदन!



FIRST THREE WINNERS:
Aniket Samudra: http://manatale.wordpress.com

Neeraja Patwardhan: http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

Dipak Shinde: http://bhunga.blogspot.com

REMARKABLE PARTICIPATION:

Hariprasad Bhalerao: http://www.chhota-don.blogspot.com

Devdatta Ganar: http://maajhianudini.blogspot.com/

Medha Sakpal: http://www.medhasakpal.wordpress.com

Salil Chaudhary: http://www.netbhet.com

Pramod Dev: http://purvaanubhava.blogspot.com/

Raj Kumar Jain: http://rajkiranjain.blogspot.com

Minanath Dhaske: http://minanath.blogspot.com

Vijaysinh Holam: http://policenama.blogspot.com

Deepak kulkarni: http://aschkaahitri.blogspot.com/

Anand Ghare: http://anandghan.blogspot.com

ता. क. खास करुन मला पंकज - भटक्या चे जाणीवपुर्वक आभार मानायचे आहेत. त्यानेच मला ह्या कार्यक्रमाची माहिती पाठवली आणि भाग घेण्यास सुचवले. मित्रा, तुझे शतशः आभार!

चला, पुन्हा कामाला लागतो. १ तारखेला रीलिज आहे... चला भेटत राहु!

Tuesday, 17 November 2009

कामाच्या बैलाला... हो s s s s!

"वर्कोहोलिक" - एखाद्याचे कामाबद्दल असलेले डिवोशन दाखवण्यासाठी / बर्‍याचदा अभिमानाने वापरली जाणारी टर्म! मात्र या सगळ्या प्रकारात फॅमिली आणि सोशल लाईफचे बारा वाजतात हे पण समजुन घ्यायला पाहिजे ना? किमान माझ्या पाहण्यात असलेले काही लोक अगदी अभिमानाने सांगतात की मी/ मला दररोज १२-१४ तास काम करतो/ करावे लागते. आता तुम्ही जर काम एन्जॉय करत असाल तर ठीक आहे. म्हणजे काही वेळा अगदी मनाविरुध्द - उशिरा थांबुन - विकेन्डसला येऊन काम करण्यात कसला आलाय एन्जॉय? पण काय करणार... घरी बसुन पगार कोण देणार... कांचन परवा म्हटल्या की घरी बसुन - भत्ता मिळतो - पगार नाही... अगदी खरंय...!



यु.एस. / यु.के. मध्ये विकेन्डला किंवा एक्स्ट्रा अवर्स मध्ये काम करणं फारच कमी आहे. यु.के. मध्ये तर मी हे स्वतः पहिलंय... त्यांची पर्सनल लाईफ - प्रोफेशनल लाईफच्या फार आधी येते. मात्र आपल्याकडे हे अगदीच उलटं आहे. आम्ही शक्यतो बॉसला " नाही जमणार " किंवा " नाही !"म्हणु शकत नाही!

थोडक्यात सांगायचे तर - मी आजकाल रोजच "वैतागवाडी" ला जातो.. पासच काढलाय म्हणा हवं तर! परवाच्या आजारपणानंतर जो कामाला जुंपलोय - त्यात उसंत नाहीच. परवा, अगदी ठरवुनही - पंकजचे - फोटोग्राफर्स पुणे - दृष्टीकोन -पहायला जाता आले नाही. ब्लॉग वर वेळ काढुन लिहायचं म्हटलं तरी झालं नाही.... अगदी अपर्णा यांनी तर - लिहायची आठवणही करुन दिली, म्हणुनच ही "क्विक पोस्ट". १ डिसे. पर्यंत असाच बिझी-बी रहावं लागणार आहे... त्या नंतर जरा वेळ मिळेल! तोपर्यंट ट्विटर वर भेटत राहु!

Monday, 2 November 2009

चार दिवस आजारपणाचे!

... दिवाळी मस्त खाण्यात आणि गावी नातेवाईक फिरण्यात घालवली... पुण्यात आलो आणि ३-४ दिवसांतच तापाने फणफणलो... गुरुवारी संध्याकाळ पर्यंत ऑफिसमध्ये अगदी दात कुड-कुडण्यासारखी थंडी वाजु लागली... घरी येऊन कसाबसा फ्रेश झालो.. बेडवर पडताच अगदी हुडहुडी भरली... रात्रीपर्यंत ताप महाराज अगदी १०४ ला पोहोचले! त्यात अंगदुखी... या कुशीवरुन - त्या कुशीवर बदलायचे म्हणजे मला एखादा ट्रेक परवडेल अशी अवस्था झाली..! खोकुन - खोकुन, फुफ्फुस तोंडातुन बाहेर पडतंय की काय असं वाटायला लागलं! नशीब फॅमिली डॉक्टर हजर होते... लागलीच सुत्र फिरवली गेली... हिस्टरी तपासली गेली आणि साखर-गोळ्यांचे -[ हो.पॅथी ] डोस सुरु झाले!! स्वाईन - फ्लुची काळजी म्हणुन मुलगी आणि बायको माहेरीच [ जवळच आहे - ;) ] ... तीन दिवस ..... अगदीच क्वारंटाईन जगलो! नशिब स्वाईन फ्लु नाही निघाला.. देवच पावला म्हणायचं!


माझ्या मुलीनं - वेदिका - माझ्यासाठी बनवलेलं हे कार्ड! लकी बाबा ना? ;)

आज, तीन दिवसांनी .... मस्त टापरुन जेवलो... थोडा टी.व्ही. बघितला... मेल चेक केल्या.. आणि आता हे 'क्विक - पोस्ट'....कसं मोकळं - मोकळं वाटतंय... !

लहाणपणी शाळेला दांडी मारण्यासाठी बर्‍याचदा खोटं - खोटं आजारी पडायचं नाटक करायचो... अगदी नविन नविन नोकरी करायला लागलो होतो तेंव्हाही अशाच दांड्या मारायचो...! आजकाल मात्र असं करता नाही येत.. जबाबदारी म्हणा किंवा पहिल्यासारखं सफाईदारपणे खोटं बोलता येतं नसावं ;)

पूण्यात वाढत्या थंडीमुळे, स्वाईन फ्लु बरोबर आता आम्हास डेंगु - हिवतापाचाही सामना करायला तयार राहायचंय. काळजी घ्या!

Wednesday, 14 October 2009

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

यशाची रोशनि,
समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदील,
आकाश उजळवणारे फटाके...

... मित्रहो, हे सगळं तुमच्यासाठी घेऊन... येत्या दिवाळीनिमित्त तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
हे कार्ड डाऊनलोड करा.

दिवाळीच्या सणाबद्दल थोडक्यात माहिती:

वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी)
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी)
धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. व्यापारी, दुकानदार लोक ह्या दिवशी या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. शेतकर्‍यांच्या दॄष्टीने नवीन आलेले धान्य हेच त्यांचे धन असते. त्यामुळे ते नवीन धान्याची पूजा करतात. त्यावेळी धने व गूळ ह्यांचा नैवेद्य दाखवतात. ह्या सुमारास झेंडू व शेवंतीची फुले मुबलकप्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे पूजेला झेंडू ची व शेवंतीची फुले वापरतात. या दिवसापासून दारांत आकाशकंदील व पणत्या लावण्यास सुरूवात करतात. व्यापारी वर्गात हा दिवस फार मोठा उत्साहाने साजरा करतात. वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.

नरक चतुर्दशी (आश्विन वद्य चतुर्दशी)
आश्विन वद्य चतुर्दशी या दिवशी नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले. ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वजण स्नान करतात.स्नानाच्या वेळी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरतात. सूर्योदयापूर्वीच्या ह्या स्नानाला अभ्यंगस्नान असे म्हणतात. ह्या दिवशी जो कोणी अभ्यंगस्नान करणार नाही तो नरकात जातो अशी समजूत आहे. स्नानानंतर मुले फटाके उडवतात. या दिवशी पहाटेच पणत्या लावतात. सर्वत्र समृद्धी व्हावी याकरितां अशा पणत्या लावण्याची प्रथा आहे. या दिवशी सणाच्या दिवशी करतात तसा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात.

लक्ष्मीपूजन (आश्विन वद्य अमावास्या)
या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली व लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून यादिवशी लक्ष्मीपूजन करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरूवात करतात.

पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा / बलिप्रतिपदा)
बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. या दिवशी विक्रम संवत सुरू होते. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहीत दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयांस आहेर करतात.

भाऊबीज (कार्तिक शुद्ध द्वितीया / यमद्वितीया)
या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते अशी पौराणिक कथा आहे. म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भाऊ बहिणीकडून ऒवाळून घेतो. भाऊ तिला प्रेमाचे प्रतिक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून ऒवाळते. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण साजरा करतात. या दिवशी ज्याला मरण येईल त्याला मोक्ष मिळतो असे म्हणतात.

Friday, 9 October 2009

मतदार बंधु - भगिनींनो....



येत्या १३ ऑक्टोंबरला तुम्ही आपल्या मतदानाचा हक्क बजावायला जाल. अर्थातच जाल! कारण त्या दिवशी करण्यासारखं खास काही नसेल. म्हणजे एक तर ऑफिसला सुट्टी असेल आणि बहुतेक दुकाने, मॉल्स, सिनेमाघरे बंद असतील. मग घरी बसुन काय करणार? तर, मतदान करा. मात्र ते करण्याआधी तुम्ही या गोष्टी ध्यानात घ्या:

१. आपल्या वार्डा मतदार संघातील उमेदवाराचे आपणास कीती मेसेज - फोन आले यांची खात्री करा. कारण त्यावरुनच त्यांच्या "कार्यशिलतेची" कल्पना येऊ शकते.
२. आपल्या घरापासुन किंवा वार्डा मतदार संघापासुन लागणार्‍या प्रत्येक चौकात यांचे कीती आणि कीती फुटी मोठे होर्डींग्ज लागलेत यांची गिनती करा. त्यावरुन त्यांनी केलेल्या खर्चाची जाणीव होईल!
३. उमेदवाराने आपली मालमत्ता कोटीमध्ये जाहिर केली असेल तरच त्याचा उमेदवारीसाठी विचार करा. किरकोळ मालवत्तावाला तुमची - आमची काय मदत करणार हो?
४. उमेदवाराचे क्रिमिनल रेकॉर्ड असणे महत्त्वाचे. अगदीच सभ्य उमेदवार तुमच्यासाठी काहीही करु शकणार नाही! कठीण समयी असलेच उमेदवार कामी येतात.
५. शक्य तितक्या लवकर आपल्या मताचा - एका आणि फॅमिली पॅकचा - दर ठरवा. उगाच नंतर घासाघासी नको. बारगेनिंग आणि सेलचा जमाना आहे म्हटलं!
६. कॅश किंवा गिप्ट आधीच ठरवा. हवं तर टी.व्ही., फ्रिज, डी.व्ही.डी. प्लेअर किंवा कंबो - ऑफरचा विचार आधीच करा.आणि मतदानाच्या आधी हे घरपोच होईल याची खात्री करा!
७. तुम्ही जर एखादा जिम, क्लब किंवा इतर काही संस्था चालवत असाल तर त्यासाठीचे साहित्य आधीच तुमच्या संस्थेत पोहचेल याची खात्री करा. हार-जित तो चलती रहेगी.. उगाच आपल्या पायावर कशाला कुर्‍हाड मारा?
८. एखादी पोलिस केस वगैरे चालु असेल तर ती त्यांच्या मार्फत आधीच "निल" करुन घ्या. नाहीतर मतदाना नंतर पुढची पाच वर्षे तुम्हालाच ते निस्तरावे लागेल.
९. आपल्या मुलाचे - मुलीचे शाळा - कॉलेजचे प्रवेशाचे काम अजुनही रेंगाळले असेल तर हीच वेळ आहे. त्यांच्या नावाने ताबडतोब प्रवेश करवुन घ्या!
१०. उमेदवाराची काही कार्यसुत्री असली - नसली तरी, तुमच्या आडलेल्या कामाचा उल्लेख करुन घ्या. उदा. नळाला पाणी न येणे... रस्ता खराब असणे... विजेची अडचण वगैरे - वगैरे!

हां, आता स्वत:च्या मनात, आपण ही "दशसुत्री योजना" राबविण्याचा पुर्णपणे नक्की करा. ऑनेस्टी, मताचा अधिकार, प्रामाणिकता, सामाजिक बांधिकलकी आणि जबाबदारी वगैरे सारख्या गोष्टी स्वतःवर हामी - वरचढ - होऊ देऊ नका. तुम्ही - आम्हीच या गोष्टींचा विचार करायचा काय ठेका घेतलाय? शिवाय तुमच्या - आमच्यावर केला जाणारा खर्च हा ते एका वर्षाच्या आतच भरुन काढतील, अगदी व्याजासहित! तेंव्हा तुम्ही कोणताही सुविचार न करता मतदान करा!

ता.क. माझे वोटर कार्ड आले नाही, साहजिकच मला यावेळी मतदान करता येणार नाही. मात्र तुमच्यासारख्या एकाला तरी मी योग्य उमेदवार निवडण्यास जागरुक करु शकलो, याचं समाधानही माझ्यासाठी खुप आहे, नाही का?

बदलः वार्ड = मतदार संघ  [अनामिताच्या सुचनेवरुन!]
स्वत:चं डोकं वापरा, आता तरी जागे व्हा! यावेळी विचारपुर्वक मतदान करा!

Sunday, 4 October 2009

गडदचा बहिरी: ढाक बहिरी

स्वाईन फ्लु चा भीतीने म्हणा अगर बाऊने म्हणा, सप्टेंबर महिना भटकंतीशिवायच गेला. आता सलग आलेल्या गेल्या लाँग विकेंडचा प्लान बनवायलाच पाहिजे असं ठाम मत झाले. मात्र गुडघ्याचं दुखणं त्यावर अडचण आणतं की काय असं राहुन राहुन वाटतच होतं. पण मन मानतच नव्हते. अगदी क्नी पॅड घालुन मी मनाचा ठीय्या करुन जायचेच ठरवले आणि बर्‍याचवेळा प्लान करुन ऐनवेळी बदललेला - ढाकचा ट्रेक फायनल झाला. नेहमीप्रमाणे मेला-मेली झाली. मात्र लॉंग विकेंडचे काही लोकांचे प्लान आधिच बनले असल्यामुळे बरेच जण यावेळी स्वॉरी म्हणाले.


तरीपण मी, सुरिंदर, सिद्दार्थ [पुण्याहुन], बल्लु [विशाल द जायंट], स्टीव्ही [मुंबईहुन] आणि विशाल, अंजन आणि कपिल लोणावळ्याहुन असा ग्रुप बनला. ऐनवेळी गाडी न मिळाल्याने लोकलने लोणावळ्यापर्यंत जायचे आणि तिथुन पुढची वाटचाल सुरु करण्याचे ठरले.


सकाळची ६.१५ ची लोकल हुकली त्यामुळे ६.५० ची डेक्कन क्विन पकडुन आम्ही लोणावळयाला पोहोवचलो. बाकी मंडळी वाटच बघत होती. स्टेशनच्या बाहेरच मस्त गरमागरम वडापावचा नाष्टा करुन आमची गाडी ढाकच्या दिशेने रवाना झाली. ढाकला जाण्यासाठी आम्ही लोणावळ्याहुन कामशेतकडे जाणारा रस्ता पकडला. रस्त्यात तुंगार्ली " वादिवले धरण " लागते, हे आपण बरोबर रस्त्यावर असल्याचा संकेत समजावा! तसे, कर्जतहुनही ढाकला जाता येते. शिवाय " सांडशी " गावातुनही रस्ता आहे. अंदाजे ९.०० वाजता पायथ्याशी असणार्‍या "जांभवली" गावात गाडी लाऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली. ढगाळ वातावरण, स्वच्छ हवा ट्रेक, चारी बाजुनी दिसणारे डोंगर आणि वाटेच्या दोन्ही बाजुला पिवळ्या धमक फुलाचा तांडवा जणु आमचे स्वागतच करत होते.

सभोवताली पसरलेला निसर्गाचा हिरवागार शालु..... वेगवेगळ्या रंगांची फुले, जणु त्या शालुवर रंगीत बुट्टी सारखे शोभत होते. सिनेमाशिवाय असे लोकेशन पाहणे सध्या तरी दुरापास्तच वाटते. डीडीएलजे मधील तो पिवळ्या धमक फुलांचा सिन तुमच्या लक्षात आहे का? अगदी तसाच किंवा त्यापेक्षाही उजवा निसर्ग आम्ही अनुभवत होतो. काही वर्षांपुर्वी राजगडच्या रस्त्यावर फुलांचा असा मखमली गालिचा पाहिला होता. या सिजनमध्ये यायचे ठरवल्याने आम्ही स्वत:ला धन्य समजत होतो.

गावाच्या मागच्या बाजुने जाणारी छोटीशी वाट बहिरीच्या गुहेकडे जाते. रस्त्यात अनेक छोटे धबधबे लागतात. त्यांचे ते शांत वाहणारे पाणी, सभोवताचा हिरवागार परिसर, मला नक्की शब्दांत मांडता येणार नाही. सगळे वातावरण अगदी अवर्णनिय! काही अंतर चालुन गेल्यानंतर थोड्याशा सपाट जमिनीवर दोन रस्ते लागतात. उजव्या हाताने तुम्ही ढाकच्या दिशेने जाता तर डाव्या बाजुने गेल्यास कोंढाणेश्वराचे मंदीर लागते. आम्ही कोंढाणेश्वराचे दर्शन घेऊन पुढे जाण्याचे ठरविले आणि डाव्या रस्ताने चालु लागलो. रस्त्यात अगदीच एक-दोन घरे लागतात आणि बोटावर मोजण्याइतकी माणसे! एका मावशींना मंदीराचा सस्ता विचारुन आम्ही मंदीरात पोहोचलो.

मंदिरारच्या बाहेरच एका आजीने आम्हाला मंदिरात जायचे असल्यास दक्षिणा द्यावाच लागेल असे सांगितले. आम्ही काही हरकत न घेता दर्शन घेतले. आजींशी बोलताना - अगदी पाच - दहा मिनिटे ओरडुन - ओरडुन सांगितल्यावर आम्हांस समजले की त्यांचा ऐकुच येत नाही! तशातही विशालने हार न मानता त्यांच्याकडुन ढाकचा रस्ता विचारुनच घेतला!! मंदिराच्या आसपासचा परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे. पाठीमागुनच एक छोटासा पाण्याचा धबधबा किंवा झरा - ओढा म्हणता येईल असे वाहते पाणी आहे. शिवाय दोन कुंडासारखे डोह ही आहेत. मंदिराच्या समोरचा नंदी अगदी नजरेत भरावा असा मोठा आहे. आसपास मंदिराचे काही अवशेष विखुरलेल्या अवस्थेत पडुन आहेत. दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या पाठीमागुन जाणार्‍या रस्त्याने ढाकची वाटचाल सुरु ठेवली.

रमत गमत - फोटोगिरी करत आमची वाटचाल चालु होती. आता भुक नावाची प्रक्रिया जोरात चालु असल्याचे जाणवु लागले होते म्हणुन आम्ही एक पठार पाहुन मस्त जेवणाचा प्रोग्राम ठेवला. लोणावणळ्यात घेतलेले वडापाव [पंकजच्या भाषेत - बातम्या खाणे ;-) ] आणि अंजनने आणलेले जेवण संपविण्याचा बेत केला. मग थोडी विश्रांती घेऊन पुढच्या चालीसाठी तयार!

अंदाजे एक - दिड तास जंगलवजा झाडीतुन चालल्यानंतर ढाकच्या गुहेच्या आधी येणारी खाई येते. अगदीच चिंचोळा भाग - खिंड म्हणा ना! आणि येथुनचा पुढच्या सहसी वाटचालीला सुरुवात होते. पुढच्या वाटचाली आधी आम्ही थोडी रेस्ट करण्याचे ठरवुन जरा आडवे झालो. दहा - पंधरा मिनिटांनी विशालने वेळेची आणि होणार्‍या अंधाराची जाणीव करुन देत सर्वांना पुढे रेटले. खिडीच्या सुरुवातीला अगदीच सोपी वाटणारी ही छोटीशी वाट दुसर्‍या टोकाला अगदीच निमुळती आहे. ८ - १० मीटरची ही खिंड माणुस जेमतेम मावेल अशी आहे. अगदी आपल्या पोटाचा अंदाज करुन देणारी! हळु आणि सावधानतेने आम्ही सारे खाली उतरलो. उजव्या बाजुला प्रचंड कडा आणि खाली खोल खाई. नविन भटक्यांचे अगदी डोळे फिरवेल अशी. त्या कड्याच्या बाजुने जाणारी छोटीशी पायवाट बहिरीच्या गुहेकडे जाते. अंदाजे ५० - ६० मी. असणारी ही वाट पार करणे म्हणजे दिव्यच वाटते. घसरडी वाट आणि खाली दिसणारी खोल दरी यांचा मध्य साधुनच ही वाट पार करावी लागते. आता पर्यंत अगदीच नॉर्मला वाटणारा ट्रेक आता हळु - हळु डेंजरस व्हायला लागला होता!

काळ्या पाषणावर काही ठीकाणी ट्रेकर्सनी क्लिप लावल्या आहेत. त्या वाटेवर सापडणारी खाच आणि त्या क्लिप्स एवढेच! हा पॅच पार केल्यानंतर अंदाजे ८-१० मी. चा उभा पायर्‍या असणारा पॅच लागतो. इथे मात्र मनाची जोरदार तयारी लागते. स्वत:वरचा आत्मविश्वास किंचितही कमी होऊ न देता हा पॅच पार करावा लागतो. वरती पोहचताच बहिरीच्या दारात लावलेले झेंडे दिसतात. त्याखाली शिडीच्या नावाने उभे असणारे फांदीचे लाकुड आणि दोन-तीन लोंबकळणारे दोर! आता त्या दोरांपर्यंत पोहचण्यासाठी पुन्हा एक छोटाशी वाट आहे. पावसामुळे ती अगदीच निसरडी झाली होती. मात्र त्याठीकाणी लावलेल्या क्लिप्स उपयोगी आल्या. अंजनने पुढे चढुन त्या क्लिप्स मध्ये दोर लावला.

आता शिडीपर्यंत पोहचण्यास एक आधार झाला होता. काळजी घेत - घेत आम्ही एकेकाला पुढे पाठवत होतो. दोरीच्या दुसर्‍या टोकाला पोहोचल्या नंतर त्या फांदी कापलेल्या लाकडावरुन - लोंबकळणारा दोर पकडुन वरती जायचे होते. हा पॅच अगदीच कठीण होता. स्वतःबरोबर आता बहिरीवरही विश्वास ठेवणे जरुरी होते. त्या लाकडावर उभे राहुन - दोर हातात पकडुन एक नजर खाली टाकली तर भल्या - भल्यांचेही डोळे फिरतील अशी अवस्था होते. पाठीवरची सॅक संभाळत आम्ही एक - एक जण वरच्या गुहेत पोहोचलो. अगदी शेवटचा पायरी ओलांडुन तुम्ही बहिरीच्या समोरच उभे राहता. अंदाजे २.३० वाजता आम्ही सारे सुखरुप वरती पोहोचलो.

हा बहिरी फार रागीट आहे. बाईमाणसांचा वाराही त्याला चालत नाही. विटाळचांडाळ करविण्यास तो समोरच्या पाताळस्पर्शी दरीत ढकलुन देतो म्हणे [ अर्थात त्यात काही अर्थ नाही हे आता अनुभवाने सर्वांना कळलं आहे. ]
संदर्भः साद सह्याद्रीची - प्र.के. घाणेकर.

बहिरी हा ठाकरांचा देव! तसा कोणताही खास असा आकार नसणारा हा देव! - एक भल्या मोठ्या दगडाला शेंदुर लाऊन त्यावर डोळे लावलेले... डोळ्यात पाहता अगदी तुमच्या समोरच उभे असळ्याची जाणीव करुन देणारा. बाजुलाच नवसाचे त्रिशुल लावलेले. आसपास उदबत्त्या आणि हळद - कुंकु. बाजुला पाण्याचे भले मोठे टाके. त्यावर तरंगणारी आणि काही बुडलेली भांडी. याच भांड्याचा वापर करुन तिथे जेवण तयार करता येते. वापरुन झाल्या नंतर स्वच्छ करुन परत तिथेच ठेवण्याची पध्दत. त्यांची चोरी करणे म्हणजे बहिरीच्या कोपाला आमंत्रण देणे आहे. असे करणर्‍यास बहिरी समोरच्या खाईत लोटुन देतो अशी भावना आहे, आणि ती वर्षानुवर्षे कायम आहे!

या प्रसिध्दिपराड्.मुख बहिरोबाची शहरी पर्यटकांना ओळख करुन देण्याचे श्रेय माननीय श्री.गो. नी. तथा अप्पासाहेब दांडेकरांना जाते.या गुहेतल्या बहिरीला सारेजण "गडदचा बहिरी" म्हणुन ओळखतात. - गडद म्हणजे गुहा.
संदर्भः साद सह्याद्रीची - प्र.के. घाणेकर.


कुंडातुन पाणी घेऊन आम्ही हात पाय धूऊन बहिरीचे दर्शन घेऊन समोरच्याच गुहेत आराम करण्यास बसलो. विशालने सोबत आणलेला नारळ चढवुन सर्वांना प्रसाद वाटला. एव्हाना धुक्यांचे लोट वहायला सुरुवात झाली होती. थोड्याशा विश्रांतीनंतर आता खाली उतरायचे टेंशन यायला लागले होते. कोणत्याही ट्रेक मध्ये चढयापेक्षा उतरणेच फार कठीण जाते, याचा अनुभव आम्हा सर्वांनाच होता. खालुन पुण्याचाच मुलांचा एक ग्रुप वरती चढत होता. त्यांना वरती येईपर्यंत वाट पाहुन आम्ही खाली उतरण्याचे ठरवले.

बहिरीला नमस्कार करुन आम्ही एक - एक जण खाली उतरु लागलो. खाली उतरलेल्याने त्याच्या नंतर खाली उतरणार्‍यास मदत करत आम्ही खालच्या त्या बांधलेल्या रस्सीपर्यंत पोहोचलो. तो पर्यंत आणखी एक ग्रुप पोहोचला होता. त्यांच्यासाठी रस्सी ठेऊन आम्ही थांबायचे ठरवले. मात्र विशाल आणि अंजनने ती रस्सी वरती गेलेल्यांना खाली उतरण्यासाठी आणि मागाहुन येणार्‍यांसाठी तशीच बांधुन ठेवण्याचे ठरवले. सर्वांनी त्याला दुजोरा देत आम्ही खाली उतरण्यास सुरुवात केली.

परतीचा तोच रस्ता आता धुक्यामुळे अधिकच धुसर वाटत होता. त्यातही वाहणारा वारा अंगाला गारवा देत आमचा थकवा दुर करत होत. खिंडीच्या मुखाला पोहचुन आम्ही पुन्हा थोडी विश्रांती घेतली आणि मग परतीचा रस्ता सुरु ठेवला. एक - दिड तासांच्या चाली नंतर मात्र आता चांगला घाम निघाला होता. एका ठीकाणी छोटासा धबधबा पाहुन आम्ही सर्वांनी पुन्हा एक ब्रेक घ्यायचे ठरवले. मी मात्र त्यात नॅचरल बाथ घ्यायचे ठरवुन मस्त ठंडा - ठंडा स्नान केले आणि मग फ्रेश मनाने आणि शरीराने गाडीच्या दिशेने चालु लागलो. परतीच्या मार्गात - असा हा निसर्गरम्य परिसर सोडुन जाण्याचे कोणाचे मन होत नव्हते. पण दोस्त - संसारी दुनियेत अजुनही कामे आहेतच ना!

रस्त्यामध्ये - कामशेत मध्ये "टोनी दा ढाबा" वर जेवण करुन आम्ही कामशेत स्टेशनवरुन पुण्याची लोकल पकडली. पुणे स्टेशन वर पार्क केलेल्या बाईक्स घेऊन १०.४५ ला घरी!

एका साहशी ट्रेकची अनुभुती आणि प्रचंड निसर्गातल्या एका रौद्र देवतेचे दर्शन घेऊन सुखरुप परतल्याचे समाधान सार्‍यांच्या चेहर्‍यावर दिसत होते!

फोटो - आहेतच हे पहा!

Friday, 2 October 2009

लालबहादूर शास्त्री - श्रध्दांजली

भारताचे तिसरे पंतप्रधान.. ज्यांच्या कामगिरीला आज सगळे नेते विसरले आहेत, पण भारतीय जनता त्यांच्या योगदानाला कधीच विसरणार नाही.... पुर्ण लेख - महेंद्रजींच्या ब्लॉगवर वाचा.


Tuesday, 29 September 2009

डु नॉट डिस्टर्ब!

डी.एन. डी. अर्थात डु नॉट डिस्टर्ब - म्हणजे - त्रास देऊ नका! पण हे त्या टेलीमार्केटींगवाल्यांना कोण सांगणार? दोन आठवडे झाले, सारखे फोन करताहेत. टाईमपास म्हणुन कीती फोन घेणार? आणि हो, यांचे फोन कधी ही येतात! म्हणजे तुम्ही ऑफिसला पोहचायच्या आधी यांचं ऑफिस सुरु झालेलं असतं.. तुम्ही ड्रायविंग करत असता आणि फोन वाजतो. गाडी कडेला घेऊन तो महत्वाचा फोन अटेंड केल्यावर समजते की तो टेली मार्केटींग कॉल आहे! बॉसबरोबर बोलतोय - आणि यांचे कॉल सुरु... अहो, फोन कट केला, तरी काही वेळातच पुन्हा कॉल येतोच!

कदाचित ह्या सार्‍या टेलीमार्केटींगवाल्यांना माझ्या बद्द्ल कुणीतरी चुकिची माहिती दिली आहे ज्यामुळे ते मला अति-श्रीमंत कॅटेगरीतील समजु लागलेत किंवा इंटरनेटवर कुणीतरी - कुठेतरी माझे बँक खाते - बॅलन्स वगैरे अगदी वाढवुन - चढवुन - पब्लिक डिस्प्ले साठी ठेवलंय! नाहीतर अचानक एवढे सारे लोक मलाच का फोन करतील? ;)

तर, सुरुवात झाली ती एस.बी.आय. च्या क्रेडीट कार्ड वाली कडुन:

ती: हॅलो... क्या मै. मि. *** से बात कर सकती हुं?
मी: जी, आप मि. *** से ही बात कर रही हो..
ती: थॅक्यु सर. मै एस.बी.आय. बँक के बि - हाफ से बोल रही हुं..हमारी बँक ने नया क्रेडीट कार्ड लॉंच किया है.... इसमें आपको ५% कॅश बॅक मिलेगा... और अ‍ॅड-ऑन कर्ड भी मिलेगा... आप अपने दुसरे कार्ड का बॅलन्स ट्रान्सफर कर सकते हो...और आपको कोई खास डॉक्युमेंट्स भी नही देने पडेंगे.......... हुश्श्श...!
मी: आपल्याला मराठी येतं?
ती: हो.. येतं ना!
मी: अच्छा. मग आपण, मराठीतच बोलु. त्याचं काय आहे मॅडम, माझ्याकडे आधीच ए.बी.एन आणि स्टॅ.चॅ. ची कार्डे आहेत. त्यामुळे मला आता नविन नकोय्! सॉरी.
ती: पण सर या कार्डवर आपणांस पेट्रोल सरचार्ज लागणार नाही?
मी: हो, पण माझ्याकडच्या कार्डवरही लागत नाही. अगदीच खास काय आहे, तुमच्या या कार्डामध्ये?
ती: ५% कॅश बॅक!
मी: अच्छा! वर्षाचे कीती पैसे भरायचे?
ती: जर आपण २५ किंवा ५०००० वर खरेदी केली तर काही नाही. नाहीतर ५०० किंवा १००० रु. तुम्ही निवडलेल्या कार्ड नुसार!
मी: हुम्म! पण बाकीच्या बँक तर काहीच चार्ज घेत नाहीत, वर्षाचे.
ती: म्हणुन तर ते कॅशबॅक देत नाहीत ना सर. आणि महत्वाचं म्हणजे - आता फक्त एस.बी.आय. आणि स्टॅ.चॅ. च कार्ड देतात. बाकी सार्‍या बॅंकांनी बंद केलय!
मी: अच्छा! तरीही.... मला कार्ड नकोय. माफ करा.
ती: ठीक आहे, सर!

तसा हा टेली - कॉल बर्‍याच दिवसांतुन वर्षातुन - आला होता. त्यामुळे थोडं बोलणंही झालं. त्यामुळं त्या दिवशी तसं नविन काही वाटलं नाही. मात्र दुसर्‍या दिवसांपासुन अगदी रांगच लागली.

तो: स्टॅ.चॅ. = नविन कार्ड आलयं... कॅशबॅक... हे आहे... ते आहे..
ती: रेलिगेअर मधुन बोलतेय - आपल्या रिटायरमेंट प्लान बद्द्ल थोडं बोलायचं होतं. कधी पाठवु आमच्या एक्झिक्युटिवला?
ती: सर, अविवा मधुन बोलतेय, नविन इंश्युरंस स्कीम आहे. आपली दहा मिनिटे हवी आहेत. मी आपणास लगेच एक्सप्लेन करते.

हुश्श्श्श्श्श्श्श....!

आता या कॉल्स बरोबर एस.एम.एस. ही चालुच होते.

**** हॉटेलमध्ये या, २०% डिस्काऊंट चालु आहे!
**** या कोर्सचे ट्रेनिंग सुरु होत आहे. लवकरात लवरकर नाव नोंदणी करा!
**** कॉल करा... फ्ल्युंएट इंग्लिश बोलायला शिका..

आता मात्र डोकं सटकलं. तडक आयडियाला मेल लिहिली आणि वरचे सारे नंबर दिले. हे पण नमुद केले की, माझा नंबर डिसें. २००७ पासुन डी.एन.डी. साठी रजिस्टर्डआहे. मात्र गेल्या सात दिवसांतील ह्या फोन आणि मेसेजेसमुळे मी अगदी भांडावुन गेलो आहे. ताबडतोब सोक्षमोक्ष लावा...!

हुम्म... मेल गेल्या गुरुवारी लिहिली. शुक्रवारी टेली - कॉल किंवा मेसेज नाही आला. बरं वाटलं!

मात्र आता नविनच मेसेजेस सुरु झालेत!

आपले नेते **** यांची पदयात्रा
दि. ** रोजी ** येथे आहे.
वाजत गाजत या!

आपले नेते **** हे दि. ** रोजी ** मधुन
आपली उमेदवारी दाखल करणार आहेत.
हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा!

आवडते नेते **** यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा!

खरंय, लोकनेते, म्हणजे लोक आणि नेते, दोन्हीही टेक्नो आणि त्याचबरोबर इस्टमनकलरही झालेत. आजकाल एस.एम.एस. वर असं निवडणुकांच मार्केटींग कँपेन जोरात चालु आहे. काही वर्षापुर्वी, माझ्या एका मित्राच्या मोबाईलवर फोन आला. त्यांनं हॅलो म्हटल्याबरोबर तिकडुन आवाज आला - "नमस्कार, मै अटलबिहारी वाजपेयी बोल रहा हुं! " [ अ.मा = लोकसत्ता - २५ फेब. २००४]

.... या विषयावर लिहायचं नाही, असं ठरवलं होतं, मात्र आत्ताच पुन्हा एस.बी.आय. चा क्रेडीट कार्डचा फोन झाला... आणि .... टींग - टींग...थांबा, नविन मेसेज आलाय....... ....... ...... .....!

Monday, 28 September 2009

स्टार माझा - ब्लॉग माझा स्पर्धा.

नमस्कार,........!
'ब्लॉग माझा' स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. गेल्या वर्षी 'स्टार माझा'नं ही स्पर्धा सुरू केली. मुळात ब्लॉगिंगसारख्या नव्या माध्यमाबाबत त्यातही मराठी ब्लॉगिंगसंदर्भात विशिष्ट वर्तुळातच चर्चा, उपक्रम होताना दिसतात. म्हणूनच ब्लॉगिंगचा प्रसार व्हावा, नवे ब्लॉग निर्माण व्हावेत, सध्या जे मराठी ब्लॉगर्स आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं; या हेतूने मराठी ब्लॉगर्ससाठीची अशी ही स्पर्धा पहिल्यांदाच 'स्टार माझा'नं आयोजित केली आहे.
- स्टार माझा - वरुन, मराठी ब्लॉगर्सच्या माहितीसाठी.

ब्लॉग मराठीतच लिहिलेला हवा
ब्लॉग पाठवण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २००९.
अधिक माहिती = ब्लॉग माझा स्पर्धा

Sunday, 27 September 2009

दसर्‍याच्या लाख - लाख शुभेच्छा ..!

सोनेरी दिवस, सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी,
सोनेरी शुभेच्छा, सोन्यासारख्या लोकांना ..!

डाऊनलोड [ ]



डाऊनलोड [ ]


डाऊनलोड [ ]

आज हुतात्मा भगतसिंग यांचा जन्मदिन..


हुतात्मा भगतसिंग
जन्म: सप्टेंबर २७, १९०७
'जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान,
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान'

- कुसुमाग्रज

फोटो - विकि