Categories

Aeroplanes

Aeroplanes

Thursday, 24 December 2009

नाताळाच्या शुभेच्छा!


Wednesday, 23 December 2009

ब्लॉगर - पोस्ट शेअरींग !

Sunday, 20 December 2009

ओळखीचे फायदे - तोटे

Wednesday, 16 December 2009

ब्लॉगर - लेखाच्या पाऊलखुणा दाखवा!

काही ब्लॉगवर आपण पाहिलं असेल की एखादी पोस्ट दाखवताना त्या पोस्टच्या वरती ती कोणत्या कॅटेगरीत आहे ती त्या लेखाच्या आधी लिंक करुन दाखवलेली असते. इंग्रजीत - टेक्निकली या प्रकाराला "ब्रेडक्रंब्स ट्रेल" असं म्हणतात. मला काय म्हणायचय हे समजायला थोडं कठीण आहे आणि मलाही ते सांगायला. पण खाली दिलेला स्क्रीनशॉट पाहुन आपल्याला कळेल, मला काय म्हणाचय ते.



आता हे कशासाठी करायचं? तर - एक तर तुमच्या विजिटर्सना सोपं नेविगेशन व्हावं आणि समजावं की ही पोस्ट - लेख कोणत्या प्रकारातला आहे. शिवाय सर्च इंजिनमध्येही आणखी एकदा त्या वर्गाची आणि शब्दाची गणती होते... आणि ती पोस्ट - लेख जरा वरती लिस्ट व्हायला मदत होते.

तर, ब्लॉगर वर एखादी पोस्ट लिहिल्यानंतर ती पोस्ट ज्या वर्गात मोडते ती दाखवण्यासाठी खाली दिलेली साधी ट्रिक वापरता येईल.

१. ब्लॉगरला लॉगिन करुन "लेऑऊट" आणि नंतर "Edit HTML" टॅबवर क्लिक करा.
२. नेहमीप्रमाणेच आपल्या टेंप्लेटची बॅकअप घ्या!
३. नंतर "Expand Widget Templates" पुढे क्लिक करुन कोड एक्सपान्ड करा.
४. आता, ही खाली दिलेली लाईन शोधा.
<b:includable id='post' var='post'>
याच्या खाली, ही खाली दिलेली लाईन शोधा

<div class="post hentry uncustomized-post-template">
किंवा
<div class="post hentry">
५. आता, त्या लाईनच्या लागलीच खाली, हा कोड पेस्ट करा.
<!-- Start breadcrumb trail-->
<b:if cond='data:blog.homepageUrl == data:blog.url'>
<b:else/>
<b:if cond='data:blog.pageType == &quot;item&quot;'>
<div class='breadcrumbsTrail'>
<a expr:href='data:blog.homepageUrl'><data:blog.title/></a> &#187;
<b:if cond='data:post.labels'><b:loop values='data:post.labels' var='label'>
<a expr:href='data:label.url' rel='tag'><data:label.name/></a>
<b:if cond='data:label.isLast != &quot;true&quot;'> &#187; </b:if>
</b:loop>
</b:if> &#187; <data:post.title/>
</div>
</b:if>
</b:if>
<!-- End breadcrumb trail-->

६. आता, "]]>" शोधा आणि त्याच्या लागलीच वरती, हा कोड पेस्ट करा.
.breadcrumbsTrail{
padding:5px 5px 5px 10px;
margin:0;font-size:95%;
line-height:1.4em;
}
७. टेंप्लेट सेव करा आणि एखाद्या पोस्ट वर क्लिक करुन पहा.
८. ती लाईन अशी दिसेल!

ब्लॉगचे नाव » वर्गाचे नाव » पोस्ट/ लेखाचे नाव

तुमच्या कमेंट्स?

Monday, 14 December 2009

शिक्षणाच्या आयचा घो!

महेश मांजरेकरांचा नवा चित्रपट "शिक्षणाच्या आयचा घो!" १५ जानेवारी २०१० ला प्रदर्शित होतोय. व्यवहारी शिक्षण आणि मुलभुत शिक्षणाच्या मुद्द्यावरचा विषय असणारा हा चित्रपट त्याच्या प्रोमो पाहिल्यानंतर मला बराच 'आपल्यातल्याच एकाची स्टोरी' असल्यासारखा वाटला! शिक्षण घेत असताना "...घो!" म्हणण्याची एकदा तरी ईच्छा सर्वांनाच झाली असावी...!



मला तर नक्कीच झाली होती... मराठी माध्यमातुन शिक्षण... मग विज्ञान शाखा - इंग्रजीतुन असलं तरीही त्यातही मराठीचा स्वाद! मग पुण्यासारख्या ठिकाणी इंग्रजी माध्यमातुन शिकलेल्यांशी नोकरीसाठीची कसरत! त्यामुळं असा "घो!" घालणं साहजिकच होतं..!

पण शिक्षणाच्या माध्यमाशी वाद कधीच नव्हता. कारण आमच्या ठिकाणी इंग्रजी शाळाच नव्हत्या! मला मान्य होतं की आज ना उद्या मी ही व्यवहाराची भाषाही शिकुन घेईन. त्यामुळं मी 'लिटरेट' आणि 'एज्युकेटेड' असण्यामधला फरक ही समजुन गेलो. पण वाद आहे तो - आपण शिकलेलो, समजलेलो ज्ञान आपल्या जीवनात खरंच १००% उपयोगी पडतं का? उदाहरण द्यायचं तर - मी सायन्स ग्रॅज्युएट.. मग व्यवहारी - टेक्निकल कोर्स. पण माझ्या मुख्य पदवीचा - विज्ञान - चा मला फायदा झाला का? पदवीनंतर मला फक्त एकदाच - सुरुवातीच्या मुलाखतीत - रसायनशास्त्रावर एकच प्रश्न विचारला होता. कदाचित ते मुलाखत घेणारेही विज्ञान शाखेचे पदवीधर होते. त्यानंतर गेल्या दहा वर्षात आठवणीत रहावा असा एकही प्रसंग आला नाही. मला मान्य आहे की शिक्षण कधीच वाया जात नाही... पण .. कधी उपयोगी येणार हा ही एक प्रश्नच आहे.. कदाचित माझ्या मुलीस मी चांगल्यापैकी विज्ञान शिकवु शकेन!

  • १७ * ७ =?
    अं.. मला माहित नाही. एक मिनिट - मोबाईल मध्ये कॅल्क्युलेट करुन सांगतो.
  • अलाउदीन खिलजीचा जन्म कधी झाला?
    सांगतो ना - एक मिनिट - विकिपिडिया.कॉम किंवा गुगल.कॉम!

तुम्हाला वाटतंय - एका विद्यार्थ्याच्या अयुष्यात हे प्रश्न ती इयत्ता सोडली/ परिक्षा सोडली तर यासारखे प्रश्न कधी येतील? हां एक चान्स आहे - जर तुम्ही एखाद्या रीएलिटी शो मध्ये गेलात तर - पण त्याचा चान्स कीती?

लहानपणापासुनच आपल्या मुलाने/ मुलीने हे व्हावं/ ते बनावं असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. कदाचित जे बननं आपल्याला जमलं नाही, ते आपल्या अपत्यानं बनावं अशीही काहींची अपेक्षा असते. मग आपल्या अपत्याकडुन त्यासाठी प्रयत्न करवुन घेतले जातात. त्याला/ किंवा तिला जर खेळात/ नृत्यात करीअर करावं वाटत असेल तरी आपल्या मर्जीखातर ते तिला इंजिनिअर/ डॉक्टर बनवतात.. काहीजण बनतातही आणि काहीजण मग तो आत्महत्येचा नंबर [१६००] वाढवतात!

बरं, शिक्षण घेतलेल्या क्षेत्रातच नोकरी मिळेल याची शाश्वतीही नसते/ नाही!.. उदाहरण - गेल्या काही दिवसांतील पोलिस भरती - सैन्य भरती ला हजर असणार्‍यांच्या संख्येकडे पाहिल्यास जाणवते की, १२ वी पासची अट असणार्‍या या भरतीला पदवीधर - वकील - इंजिनिअर मुलं हजर होती. त्यांनी ही हा असा "घो" घातलाच असेल!

शिक्षणासाठी - व्यवहारीक शिक्षणासाठी - नावारुपास आलेल्या आणि अचानक बंद झालेल्या ए.एच ए. - राय इंस्टिट्युट - बालाजी इंस्टिट्युट या सारख्या शैक्षणिक संस्था करीअर बनवता - बनवता एक दिवस विद्यार्थ्यांनाच बनवतात! सोमवारी - मनसे च्या कार्यकर्त्यानी असंच ए.एच ए. च्या विद्यार्थ्यांबरोबर "भीक मांगो आंदोलन" केलं.

अगदी बालवाडी पासुन - पदवी पर्यंत डोनेशन्स, भरगच्च फीस, पुस्तके यांचा खर्च झेलावा लागतो. अगदी बाजारी रुप आलय या सार्‍या पद्धतीला! हे सारं झेलताना - करताना सारे पालकही खुश असतात असं नाही ना. काहींनी तर अगदी कर्ज काढुन डोनेशन्स आणि फीस भरलेल्या असतात. ज्यांना कर्ज मिळत नाही ते सावकारापर्यंतही जातात! त्यांनी अशा या शिक्षणाला नमस्कार घातला असेल असं मला वाटत नाही.

एक विद्यार्थी म्हणुन माझ्या मनात जेंव्हा हा "घो" आला असेल, त्याच्या कीती तरी आधी माझ्या आई-वडिलांनी हा तो घातला असेल!

विषय मोठा आणि वादाचा आहे. थांबतो आता! अरे हां, या चित्रपटाबद्दल अधिक माहिती या लिंकवर आहे. शिवाय फेसबुकवर याचा प्रोमोही पहायला मिळाला.
पोस्टर - चित्रपटाच्या नावासोबत - सक्षमचा फोटो जोडलायः साभार इरॉस

Tuesday, 8 December 2009

ब्लॉगर कमेंट्स - तुमचे रिप्लाय ठ़ळकपणे दाखवा!

ब्लॉग वर आलेल्या कमेंट्सना रिप्लाय देणे हा ब्लॉग - एटिकेट्स एक भाग असतो. त्यामुळे तुमच्या विजिटर्स सोबत एक संवादही सांधता येतो. आता हे रिप्लाय देताना गरज वाटते ती स्वतःच्या, म्हणजे ब्लॉग कर्त्याच्या कमेंट्स ऊठुन दिसण्याची. त्यामुळे दिलेली कमेंट ही 'रिप्लाय' आहे हे जाणवते.



उदा. दयायचे तर - माझ्या ब्लॉगवर मी दिलेले रिप्लाय जरा वेगळे - उठुन दिसताहेत. त्यांच्याभोवती बॉर्डर आहे, शिवाय भुंग्याचे चित्रही आहे. अच्छा, मला काय म्हणायचे आहे ते समजले तर! ठिक, तर हा प्रकार तुमच्या ब्लॉगवर कसा करता येईल, ते पाहु!

०. सर्वात महत्त्वाचे म्हणजे - आपल्या टेंप्लेटचे बॅकअप घ्या - "Download Full Template" या लिंकवर क्लिक करुन ते सेव करा. काही अडचण झाल्यास आपणास ते पुन्हा अपलोड करता येईल!
१. ब्लॉगरला लॉगिन करुन "लेआऊट" वरुन - Edit HTML टॅब क्लिक करा.
२. 'Expand Widget Templates' च्या समोर असणारा चेबॉक्स् चेक करा, म्हणजे संपुर्ण कोड दिसेल.
३. आता, कमेंट्स दाखवणारा कोड शोधु.. हा खाली दिलेला कोड शोधा -

<dd class='comment-body-bhunga'>
<b:if cond='data:comment.isDeleted'>
<span class='deleted-comment'><data:comment.body/></span>
<b:else/>
<p><data:comment.body/></p>
</b:if>
</dd>

४. आता त्याच्या जागी - तो डिलिट करा किंवा सिलेक्ट करुन त्याच्यावर खाली दिलेला कोड पेस्ट करा.
<b:if cond='data:comment.authorUrl == &quot;http://www.blogger.com/profile/PasteYourProfileNumber&quot;'>

<dd class='comment-body-admin'>
<b:if cond='data:comment.isDeleted'>
<span class='deleted-comment'><data:comment.body/></span>
<b:else/>
<p><data:comment.body/></p>
</b:if>
</dd>

<b:else/>

<dd class='comment-body'>
<b:if cond='data:comment.isDeleted'>
<span class='deleted-comment'><data:comment.body/></span>
<b:else/>
<p><data:comment.body/></p>
</b:if>
</dd>
</b:if>
५. वरती पहिल्या ओळीत - PasteYourProfileNumber च्या जागी तुमच्या ब्लॉगरचा प्रोफिईल नंबर टाका. हा ' प्रोफिईल नंबर' प्रत्येकाच वेगवेगळा असतो.
तो पाहण्यासाठी ब्लॉगरच्या डॅशबोर्डवरुन 'View Profile' या लिंकवर क्लिक करा. तुमच्या प्रोफाईल पेज दिसेल. आता त्या लिंक मध्ये शेवटी दिसणारा नंबर म्हणजे - प्रोफाईल नंबर!
६. आता ' ]]></b:skin> ' च्या लगेच वरती खाली दिलेला कोड पेस्ट करा.
.comment-body-admin{
width:300px;
border-style: solid;
border-top: 1px solid #FFD129;
border-right: 1px solid #ffd129;
border-left: 1px solid #ffd129;
border-bottom: 3px solid #ffd129;
-moz-border-radius: 3px;
background-color: #f5f6f7;
margin-top: 5px;
margin-bottom: 15px;
font-size:13px;
line-height:20px;
padding: 10px 10px 10px 95px;
background:#fff url(http://LinkToYourPicture.jpg) no-repeat 0 bottom;
min-height: 100px;
}
७. वरच्या कोड मध्ये 'http://LinkToYourPicture.jpg' च्या जागी तुमच्या फोटोची लिंक पेस्ट करा. फोटो शक्यतो छोटाच असावा.
८. 'सेव टेंप्लेट' करुन एखाद्या कमेंट्ला उत्तर द्या - किंवा तुम्ही दिलेलं उत्तर शोधा आणि पहा - तुमची कमेंट वेगळी दिसते का!
९. नं. सहा मध्ये जे '#FFD129' हे असे कलर कोड आहेत त्याजागी तुम्ही तुमच्या डिझाईनला अनुसरुन कलर कोड लिहा. '#FFD129' च्या जागी 'blue' लिहिला तरी चालेलच!

आता तुमच्या कमेंट्स येऊ दयात..... :)

Friday, 4 December 2009

दि ग्रेट पुणेरी हेल्मेट शो!

टाईम्सच्या "पुणे मिरर" या पुरवणीमध्ये गेल्या काही दिवसांपासुन हेल्मेट वापरा संबधीत मोहीम चालु आहे. रोजच हेल्मेट वापरणारे आणि न वापरणारे यांची मते प्रकाशित केली जातात. हेल्मेटला विरोध करणार्‍यांची काही कारणे आणि अडचणीपैकी मी थोडक्यात जमवलेल्या काही अडचणी:


[असं चित्र काढण्याची आयडीया - 'दि लाईफ' वाल्या 'सोमेश'च्या च्या पोस्ट वाचुन आली!]

१. हेल्मेट वापरल्याने केस गळतात!
अहो आश्चर्यम! नविनच शोध!! - असेलही - मी माहिती - तंत्रज्ञात जरा मागासलेला आहे. जरा त्या शोधाबद्दल माहिती मिळेल का? आणि तसंपण - अ‍ॅक्सिडेंड नंतर चुराडा झालेल्या डोक्यावर केस असले काय अन् नसले काय - काय फरक पडतो. तुम्ही काय जगप्रसिध्द सेलिब्रेटी आहे का काय - की लोक तुमचे केस ताईत बनवुन गळ्यात घालतील? ऑ?

२. मोबाईलवर बोलता येत नाही!
हां, एका हाताने ड्राइव करत दुसर्‍या हाताने मोबाईलवर बोलत जाणार्‍यांसाठी हेल्मेट ही फार मोठी अडचण आहे! पण फोन वाजलाच तर गाडी बाजुला उभी करुन बोलता येतंच की. हेल्मेट घातल्याने तोंड थोडच बंद होतं? शिवाय ब्लु - टुथ चा पर्याय आहेच की! बरेच लोक हेल्मेट घालुनही कानात इअर-फोन लावतातच - ते कधी अशी बोंब नाही मारत!

३. वागवायचे / कॅरी करायचे कुणी?
काय राव, मोबाईलच्या बाबतीत - ऑफिसच्या बॅगच्या - जेवणाचा डब्बा आणत असाल तर - असा कधी विचार आलाय मनात. ते कॅरी करताच ना? शिवाय बाईकला लॉकर बसवुन घ्या..!

४. लोकांचे चेहरे पाहता येत नाहीत!
मला वाटतं तुम्हाला 'मुलींचे' चेहरे पाहता येत नाहीत, असं म्हणायचं आहे! कॉलेज जवळच्या रस्त्यावरुन जाताना किंवा रस्त्यावरही चालु असलेलं हे "निरीक्षण आणि गणना" आम्हीही बर्‍याचदा पाहिली आहे राव. पण सध्या 'मुली' ही ते स्कार्फ बांधुनच मग ??

५. पान - गु-टखा - तंबाखु चं काय?
काय म्हणजे? जर खायचं असेल तर आतल्या आत थुंकायला - म्हणजे - गिळायला शिका. तुमच्या या रंगकामामुळे बरीच जनता आणि इमारती आधीच रंगल्या आहेत!

६. हेल्मेट जड आहे!
अहो, चांगल्या ब्रँडचं - हलकं घ्या.. ड्रेस.. मोबाईल.. शुज अशा वस्तु आपण कसं शोधुन - नाजुक - हलकं घेतो नां, तसंच हेल्मेटही घ्या ना!

मला वाटतं पवार साहेबांच्या काळात - १ जुलै १९८९ रोजी नवा मोटारवाहन कायदा अस्तित्वात आला आणि तेंव्हापासुन हेल्मेटसची सक्ती, कायदेशीर रीत्या आहे. हा कायदा भारत सरकारने देशभर लागू केला असल्याने फक्त महाराष्ट्र सरकारच्या किंवा एखाद्या मंत्र्याच्या नावे बोंब मारण्यात काही तथ्य वाटत नाही!

दोस्त, हेल्मेट वापरायचं किंवा नाही हा मुद्दा जेवढा खेचावा तेवढा वाढणारा आहे. जरा आसपास होणारे अपघात बघ - त्यात मरणारे - अपंग होणारेही आधी असाच वाद घालत होते! त्यांच्या घरच्यांनी काय गमावलंय हे बघ! आज तारुण्याच्या मस्तीत वा धुंदीत झालेला एक अपघात तुला किंवा दुसर्‍या कायमचा अपंग करु शकतो. व्हीलचेअर वरची व्यक्ती रीयल लाईफ मध्ये जगणं सोपं नाही रे! हां आता तू जर हे सारं धुडकावुन 'जाणार'च असशील तर जा - उगाच 'जाणार्‍या'ला अडवु नये! पुन्हा भेट होईल - न होईल म्हणुन आधीच ही प्रार्थना - मृतात्म्यास शांती लाभो!

Wednesday, 2 December 2009

पेपर टाकले? ऑल द बेस्ट!!

महेंद्रजींच्या ब्लॉगवर 'पेपर दिला' ही पोस्ट वाचुन मी अर्ध्यात सोडलेली ही पोस्ट: कदाचित पुर्ण नाही!



गेली एक-दोन वर्ष 'रिसेशन',' स्लोडाऊन', 'मर्जर' अशा दिसायाला छोट्या मात्र फार मोठी भीती दाखवणार्‍या टर्मस् ऐकण्यात - वाचण्यातच गेली. काही [? बर्‍याच!] लोकांच्या नोकर्‍या गेल्या.... कंपन्या दिवाळखोरी निघाल्या.... बंद झाल्या मात्र आज काल परिस्थिती थोडी बदलल्याची जाणीव व्हायला लागली आहे! काल - परवा पर्‍यंत अगदी दोन पानांचा "टाईम्स अ‍ॅसेंट" गेल्या वेळी मस्त ८-१० पानांचा होता. 'अर्ध-पान'भर असणार्‍या जाहिराती पुन्हा दिसु लागल्यात. बंद झालेले जॉब कंन्सलटंटचे फोन पुन्हा वाजताहेत. मेलबॉक्स मध्ये नविन ओपनिंगच्या मेल यायला लागल्यात! थोडक्यात - नविन नोकर्‍या उपलब्ध होताहेत आणि पेपर पडताहेत........... आज जरा यावरच बोलु ..पेपर टाकण्याच्या कारणापासुन - नोटीस पिरिअड मधील कामापर्यंत आज जरा सविस्तर बोलुयात!

तर, पेपर टाकण्यामागे बरीच कारणे असतात, अगदी ढोबळ-मानाने मला जाणवलेली:

१. अधिक सॅलरी पॅकेज मिळणे
२. मोठी - चांगली कंपनीची ऑफर असणे
३. बढतीवर जाणे - म्हणजे लीड पोस्ट - मॅनेजर वगैरे
४. स्टॅग्नंट फीलिंग येणे - म्हणजे वाढ थांबल्यासारखं वाटणे
५. इनसिक्युर फिल होणे!
६. खास मित्राने पेपर टाकणे
७. पर्सनल कारण असणे

यापेक्षा अधिक किंवा वेगळी कारणेही असतील, असावीत. त्यासाठी तुमच्या कमेंटस् आहेतच!

आता हीच कारणे जरा डिटेलमध्ये:
१. अधिक सॅलरी पॅकेज मिळणे: "बाईला वय आणि पुरुषाला पगार विचारु नये" असं म्हणतात! जास्त पैसा कुणाला नको असतो? खरं तर आपल्याला नक्की किती पगार दिला म्हणजे आपण खुश होऊ हे सांगणं कोणालाही जमणार नाही - मला तर नाही. कारण दिलेला पगार मग तो कितीही असो ३० तारखेच्या आत संपतोच आणि आम्ही पुन्हा १ तारखेची वाट पहातो! जो पर्यंत आपल्याला आपल्या मित्राचा किंवा कलिगचा पगार माहित नसतो, तोपर्यंत आपला पगार ठीक ठाक वाटतो. मात्र जर त्यांचा पगार जास्त असेल तर मात्र मनांत एक "जलन" होऊ लागते. मग जास्त पगाराची नोकरी शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न करु लागतो! काही वेळा आपलं राहणीमान - वाढलेले खर्च यांचा ताळमेळ घालण्यासाठीही मग अधिक पगाराची गरज भासु लागते! मला वाटतं अगदी कोटी मध्ये पगार दिला तर तो पचवायची ताकद/ अक्क्लही पाहिजेच ना! आणि अकलेपेक्षा जास्त अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे? सॉफ्ट्वेअर कंपन्यात बलाढ्य पगार असतात - असं म्हणतात - असतातही. पण ते असे-तसे कुणालाही मिळतात का? त्यासाठी अनुभव - एक्सपर्टीज सारखे गुणही लागतात. सांगायचा मुद्दा एवढाच की - एखाद्याला त्याच्या अनुभव - एक्सपर्टीज वरुन पगार मिळतो - मिळावा. जास्त पगाराच्या अपेक्षेत बरेच लोक अगदी सहा महिने - एक वर्षाच्या आत जॉब बदलतात - चांगलं ऑप्शन आहे - एक वर्षात जेवढं अ‍ॅप्राइजल होत नाही - त्यापेक्षा अधिक इंक्रीमेंट जॉब बदलताना मिळते! एवढंच काय, अहो मी लोकांना महिना १ हजारच्या वाढीवर जॉब बदलताना पाहिलंय!

२. मोठी - चांगली कंपनीची ऑफर असणे: दुसर्‍याची नोकरी आणि बायको की नेहमी चांगली वाटते! खरं तर लोकांना स्वत:ची म्हणजे स्वतः काम करत असलेली कंपनी सोडुन दुसर्‍या सगळ्या चांगल्या वाटतात ! आता चांगली कंपनी म्हणजे काय किंवा ती चांगली हे कसं म्हणायचं? मला वाटतं ज्या कंपनीत ५०-६०...... हजार! लोक काम करतात, आय.टी. पार्क किंवा एम्.आय.डी.सी. मध्ये एकर - दोन एकर मध्ये भव्य बिल्डींग असते वगैरे वगैरे! आता अशा स्वप्नवत कंपनीतुन ऑफर असेल तर काय कुणाची - नाही - म्हणायची टाप आहे? शिवाय मित्रांच्या कंपनीच्या पॉलिसीज, मेडिक्लेम्स, पेड हॉलिडेज, हायर - एज्युकेशची सोय अशा बर्‍याच गोष्टी मनाला भुरळ पाडतात!

३. बढतीवर जाणे - म्हणजे लीड पोस्ट - मॅनेजर वगैरे: काही लोकांना पहिल्या नोकरीतच बॉसची, लीडची किंवा मॅनेजरची पोस्ट ही स्वतःची पोस्टअसावी अशी स्वप्ने पडतात! हो, खरंच सांगतोय! माझ्या बघण्यातलीच उदाहरणं आहेत. मग आपण अजुन ज्युनिअर आहोत हे फिलिंग जाऊन - सिनॅरीटीचं भुत लागतं. आपलीच कामं करण्यात मन लागत नाही.. कुणी काम सांगितलं तर अपमान वाटतो अशी अवस्था होते आणि मग आम्ही नविन नोकरी विथ सिनिअस पोस्ट, शोधु लागतो. मला वाटतं, अनुभवातुन - एक्सपर्टीज मधुन मिळालेली सिनिअर पोस्ट ही अधिक मजबुत आणि खंबीर असते. बर्‍याचदा 'नोकरी सोडुन जाऊ नये' म्हणुनही सिनिअर पोस्ट मिळाल्याचं पाहण्यात आहे. मग या मिळालेल्या पोस्टवर काही वेळ थांबुन आम्ही हक्काची नविन सिनिअर - लीड पोस्ट शोधु लागतो. काही वेळा आमचा लीड - मॅनेजर इतका इंप्रेसीव्ह असतो की - आम्हाला त्याच्या पोस्टचा हेवा वाटु लागतो आणि आम्ही ती पोस्ट मिळवण्याचा प्रयत्न करु लागतो, भलेही मग ती नविन कंपनीत का असेना!

४. स्टॅग्नंट फीलिंग येणे - म्हणजे वाढ थांबल्यासारखं वाटणे: हे असलं फिलिंग म्हणजे नक्की काय ते मलाही सांगता येणार नाही. मग - नोकरी बदलण्यासाठी काहीच कारण नाही मिळालं तर ठोकुन द्यायचं - आय एम फिलिंग स्टॅग्नंट! माझे काही मित्र एकाच कंपनीत ५ वर्षे काम करत होते. नविन प्रोजेक्टस होतेच शिवाय वेळेवर होणारी पगार वाढ आणि चांगला बॉस यामुळे त्यांना बरेच दिवस "पेपर टाकावे" असं वाटलंच नाही! त्यांच्या मते काम चांगले आहे - व्यवस्थित पगार आणि वाढ आहे - बॉस चांगला आहे, मग कशाला जॉब बदला? समोरची कंपनी काय बसुन थोडाच पगार देणार आहे? पाच वर्षांनी मात्र त्यांनी ती कंपनी बदलली - कारण होतं - नविन/ लेटेस्ट टेक्नॉलॉजीशिकणं/ त्यावर काम करणं!

५. इनसिक्युर फिल होणे: शेजारच्या क्युब मध्यल्याने "पेपर टाकले" की त्या पुर्ण स्क्वेअरमध्ये एक पॅनिक लहर येते! उगाचच आपला जॉब सिक्युअर नसल्याचं फिलिंग तयार होतं. शेजार्‍याचं कारण काहीही असो - आम्हालाही नविन जॉब बघावा असं वाटु लागतं. बोलता - बोलता 'रीसेशन', 'स्लो-डाऊन' अशा दिसायला छोट्या पण मोठी भीती दाखवणार्‍या टर्म डिस्कस होऊ लागतात. जाणारा त्यात अधिकच भर घालतो. काही वेळा तर अगदी कंपनीच्या ताळे-बंदी विषयीही बोलायला मागे-पुढे पहात नाही. ' ** वैताग आला इथे', 'आपुन तो निकल गया, बॉस!' असं बोलणं उगाचच आमच्या मनात इनसिक्युर पणाचं फिलिंग भरतात आणि आम्ही ऑनलाईन रिजुमी अपडेट करु लागतो!

६. खास मित्राने पेपर टाकणे: ऑफिसमधल्या काही काळातच काही खास दोस्त बनतात. स्मोकिंग फ्रेंड्स, सकाळी ब्रेकफास्टला एकत्र जाणारे दोस्त, एकाच टीममध्ये असणारे दोस्त... असे काही दोस्त - दोस्ती बनते. मग यातील एखाद्याने - इतर कोणत्याही कारणाने - पेपर टाकले की मग आमचेही मॅनेजमेंट बिघडते. बर्‍याचदा हा खास मित्र - रुम/ फ्लॅट मेट असतो. मग अशा वेळी त्या मित्राच्याच कंपनीत किंवा जवळ जॉब शोधला जातो. इंटरेस्टिंगली - हे कारण मी खास बोलतानाच - डिस्कशन मध्येच - ऐकले आहे. पेपर टाकण्याच्या ऑफिशल मेल मध्ये किंवा नविन कंपनीत विचारण्यात येणार्‍या - नविन जॉब का शोधताय? - या प्रश्नाच्या उत्तरादाखल हे - "खास मित्राने पेपर टाकले म्हणुन मी ही..." कारण माझ्या पाहण्यात नाही!

७. पर्सनल कारण असणे: आता पर्सनल कारणे खुप असु शकतात. पैकी, मी पाहिलेली काही - ऑफिसातल्या आवड्त्या मुलीचे लग्न होणे किंवा मित्राबरोबर - फ्रेंडशिप - लग्न - होणे...लीड / मॅनेजर / बॉसबरोबर " तु तू-मै मै " होणे...पॅरेंटस ची बदली होणे...
..... या परिस्थितीही नविन जॉब शोधुन - पेपर टाकले जातात!

हूम्मम्म! तर आता पेपर टाकल्यानंतर: एकदा पेपर टाकले की आपण मोकळे झालो अशा आविर्भावात काही लोक वावरतात. कालपर्यंत ज्यांच वागणं - बोलणं जबाबदारीचं असतं - तेच आता बिंधास्त झालेलं असतं! इतरांना "तो" कुठे चाललाय?.. किती इंन्क्रीमेंट भेटली?.. असे क्युरीअस प्रश्न विचारायचे असतात. नोटीस पिरीड हा "त्याच्या" अगदी जीवावर आलेला असतो. उशिरा येणं... वारंवार ब्रेक घेणं चालु असतं! साला, नोकरीत असताना जे करता येत नव्हतं, ते आता बिधास्तपणे चालु असतं! मग कंपनी, बॉस, मॅनेजर, लीड यांचा अगदी मनापासुन "धावा आणि पुजा" केली जाते. एकंदरीत - " आपुन तो निकल गया, बॉस! " असा अ‍ॅटीट्युड होतो!

दोस्त! कंपनी बदलली म्हणजे जग बदलत नाही! आज- नाही तर उद्या एकमेकांसमोर येण्याचा चान्स असतोच. तेव्हा - नोटीस मध्ये असताना, आपण केलेल्या कामाचे डॉक्युमेंटेशन करणे - आपले काम व कामाचे स्टेटस व्यवस्थित दुसर्‍याकडे सोपवणे, इतर डिपार्टमेंट्स चे क्लिरंस सर्टिफिकेट मिळवणे हे कंटाळवाणे न समजता एक जबाबदारी म्हणुन कर! कुणा एकाच्या 'पेपर टाकण्याने' कंपनी बंद झाल्याची बातमी - माझ्या तरी ऐकिवात नाही. तेंव्हा जाताना उगाच 'इगो' दाखवु नकोस. "रेफरन्स कॉल्स", "रिलिविंग लेटर", "एक्सपेरिंस लेटर" आणि "यु-टर्न" या टर्म विसरु नकोस. काय सांगावं - उद्या हाच लीड/ बॉस उद्या तुझ्याच नविन कंपनीत नविन बॉस म्हणुन येईल! ऑल द बेस्ट!!

Monday, 30 November 2009

१ डिसेंबर: जागतिक एड्स दिन

आज १ डिसेंबर, जागतिक एड्स दिन. एड्स सारख्या महाभयंकर रोगाबद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळला जातो. ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर यां दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या, जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात यांचा संकल्पना मांडली. डॉ. मन् यांचा सहमती नंतर १ डिसेंबर १९८८ पासुन हा दिवस पाळण्यात येऊ लागला.



१९८१ ते २००७ च्या दरम्यान एड्स मुळे सुमारे २५ दक्षलक्ष लोक मेले आहेत. २००७ मध्येच सुमारे २ दक्षलक्ष लोक मेले आहेत ज्यामध्ये २७०,००० लहान मुले होती!
सुरक्षा आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या वेबसाईटस भेट द्या:

Saturday, 28 November 2009

आई ग.... अजुनही आय.ई. ६?

अजुनही बर्‍याच लोकांसाठी इंटनेट म्हणजे = इंटरनेट एक्सप्लोरर असंच समीकरण आहे. कदाचित त्यांना नविन ब्राऊजर बद्दल माहिती नसावी किंवा ते वापरण्यात थोडीशी कचराई वाटत असावी. हां, मात्र एक वेळच अशी होती की इंटरनेट ब्राऊज करण्यासाठी आय.ई. हाच ब्राऊजर वापरण्यात यायचा. बदलत्या टेक्नॉलॉजीप्रमाणे ब्राऊजरही बदलत गेले. मग नेटस्केप नेविगटर आला, त्यानंतर सफारी, मोझिला, ओपेरा, फायरफॉक्स, फ्लॉक, क्रोम ..... असे बरेच!



आता प्रश्न निर्माण झाला, की तुम्ही तयार केलेली वेबसाईट/ ब्लॉग या ब्राऊजरांबरोबर कंपॅटीबल आहे की नाही हे कुणी पहयचं? बर्‍याचदा आपण आपला ब्लॉग आपल्या आवडत्या ब्राऊजरमध्येच चेक करतो. आपले क्लाईंट, विजिटर्स वापरत असणार्‍या ब्राऊजरबद्दल आपण विचारही करत नाही. मात्र कार्पोरेट किंवा वेब दुनियेत असं चालत नाही. तुम्ही बनवलेला ब्लॉग/ डिझाईन, वेबसईट किंव वेब प्रोजेक्ट ब्राऊजर कंपॅटीबल असणं तेवढंच महत्त्वाचं मानलं जातं.

आता त्यासाठी प्रत्येक ब्लॉगर काळजी करेलच असं नाही. करण त्याचे/ तिचेही काही टेक्निकल रिस्ट्रीक्शन्स असतातच. तर अशा वेळी बरेचजण वेबसाईटच्या खाली - फुटर मध्ये - संबधित ब्राऊजर आणि स्क्रीन रिजॉल्युशन बद्दल नोट लिहितात की - हा ब्लॉग/ वेबसाईट "या" ब्राऊजर मध्ये आणि "या" स्क्रिन रिजॉल्युशन मध्ये चांगली दिसेल! पण हा एक तात्पुरता पर्याय होऊ शकेल. तुमचा क्लाईंट/ विजिटर तो ब्राऊजर वापरेलच असं नाही ना! शिवाय त्याला तुमचा आवडता ब्राऊजर डाऊनलोड करण्यासाठी जबरदस्ती नाही करता येत ना!! आणि शेवटी लिहिलेली ही नोट कीती लोक पहातील हाही एक प्रश्नच आहे!

आता दुसरा पर्याय म्हणजे, अशी तुमच्य विजिटरना अशी नोट नजरेस पडेल अशा ठिकाणी दाखवणे. म्हणहे वरच्या - हेडर च्या भागात. पण वारंवार बदलणार्‍या आणि नविन वर्जन येणार्‍या ब्राऊजरबद्दल कोण माहिती ठेवणार आणि ती नोट अपडेट करणार? त्यासाठी खालील पर्याय करता येतील.

१. खाली दिलेली स्क्रिप्ट तुमच्या ब्लॉगच्या </head> च्या लगेच वरती पेस्ट करा!
<link href='http://sites.google.com/site/blogstoresite/blogger/pushup.css' rel='stylesheet' type='text/css'/>
<script src='http://sites.google.com/site/blogstoresite/blogger/pushup.js' type='text/javascript'></script>

जर ब्राऊजर लेटेस्ट वर्जनपेक्षा जुना असेल तर वरच्या कोपर्‍यात उजव्या हाताला तशी नोट दिसेल!

२. विजिटर्सना "ब्राऊजहॅपी" या वेबसाईची सैर करवा.

३. वर्डप्रेस - सेल्फ होस्टेड - हे प्लगिन इंस्टॉल करा.

४. या पेजवर दिलेली स्क्रीप्ट तुमच्या ब्लॉगच्या </head> च्या लगेच वरती पेस्ट करा!

पर्याय कोणता निवडणं हे तुमच्या हातात आहे. फक्त जास्तीत जास्त विजिटरांपर्यंत हा मेसेज मिळावा व त्यांच्याकडे नविन आणि सेफ ब्राऊजर असावा, हीच अपेक्षा!

कांचन कराई - यांच्या कमेंट वरुन -

आय.ई. ६ व ७-८ मधील फरकः
१. टॅब स्ट्रक्चर आय. ई. ७-८ मध्ये आहे - जे ६ मध्ये नाही.
२. आय. ई. ७-८ मध्ये इन-बिल्ट सर्च आहे.
३. फायरफॉक्ससारखे काही अ‍ॅड-ऑन, आय. ई. ७-८ मध्ये इन्स्टॉल करता येतात
४. आय. ई. ८ मध्ये इंस्टॉल केलं तर आय. ई. ७ चाही व्ह्युव - कंपॅटीबिलिटी पाहता येते.

शिवाय आय. ई. ८ काही जावास्क्रिप्ट १.५ ला सपोर्ट, काही कडक सिक्युरिटी फिचर्स आहेत. मात्र तरीही आइ. ई. सेफ नाही हे या ठीकाणी वाचा.

आता - कोणता ब्राऊजर श्रेयिस्कर?
माझी पसंती - फायरफॉक्सच! का व कशासाठी हे लिहिणं फार मोठं होईल. त्यामूळे आपणच हे फीचर्स पहा.

टेक्निकली बोलायचं तर - वेब डिझायनर - डेव्हलपर्सचीच ही जबाबदारी असते. मात्र आपल्या ब्लॉगच्या बाबतीत सर्व काही आपणच आहोत, नाही का?

Wednesday, 25 November 2009

भावपूर्ण श्रद्धांजली...!

जीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे: हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे आदी अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...!



"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा" - शहीद रामप्रसाद बिस्मिल.

Thursday, 19 November 2009

मंडळ आपले आभारी आहे!

स्टार माझा च्या "ब्लॉग माझा" स्पर्धेचे निकाल लागल्याचे सकाळी ट्विटरवर समजले आणि मग मेल वरुन सविस्तर बातमी समजली!



आपल्या प्रोत्साहनासाठी, आपण सर्व मित्र - वाचक वर्ग आणि स्टार माझाच्या टीमच्या या कौतुकास्पद कार्यक्रमासाठी - मंडळ आपणा सर्वांचे हार्दिक आभारी आहे!! सर्व विजेत्याचेही मन:पुर्वक अभिनंदन!



FIRST THREE WINNERS:
Aniket Samudra: http://manatale.wordpress.com

Neeraja Patwardhan: http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

Dipak Shinde: http://bhunga.blogspot.com

REMARKABLE PARTICIPATION:

Hariprasad Bhalerao: http://www.chhota-don.blogspot.com

Devdatta Ganar: http://maajhianudini.blogspot.com/

Medha Sakpal: http://www.medhasakpal.wordpress.com

Salil Chaudhary: http://www.netbhet.com

Pramod Dev: http://purvaanubhava.blogspot.com/

Raj Kumar Jain: http://rajkiranjain.blogspot.com

Minanath Dhaske: http://minanath.blogspot.com

Vijaysinh Holam: http://policenama.blogspot.com

Deepak kulkarni: http://aschkaahitri.blogspot.com/

Anand Ghare: http://anandghan.blogspot.com

ता. क. खास करुन मला पंकज - भटक्या चे जाणीवपुर्वक आभार मानायचे आहेत. त्यानेच मला ह्या कार्यक्रमाची माहिती पाठवली आणि भाग घेण्यास सुचवले. मित्रा, तुझे शतशः आभार!

चला, पुन्हा कामाला लागतो. १ तारखेला रीलिज आहे... चला भेटत राहु!