Categories

Aeroplanes

Aeroplanes

Thursday, 3 September 2009

मी प्रमाणापेक्षा जास्त आळशी झालोय?

दैनंदिनी - ३ स्प्टें. २००९
सुट्टीचा दिवस... मस्त आरामात उठणे.. सोप्यावर पडुन टीव्ही पाहणे.. यातच सकाळ संपली...!
दुपारी गेलेली लाईट रात्री ९.१५ आली... आणि म्हणे पुण्यात लोड शेडिंग कमी होणारयं... हो.. खरं का? कधी पासुन?
संध्याकाळी पाऊस - रिमझिम - होताच... त्यामुळे पुण्यात जाऊन - म्हणजे - पेठेत जाऊन - "गणपती पाहणे" झालेच नाही... असो... सोसायटीचा गणपती विसर्जनाचा कार्यक्रम - खिडकीतुनच पाहिला.... कदाचित मी प्रमाणापेक्षा [*] जास्त आळशी झालोय, हेच खरं!

@शिनु साठी कमेंटस् मध्येच हेल्प पॉईंटस् लिहिलेत... होप, ही विल सक्सिड् !
विचार होता - ऑनलाइन न जाण्याचा... पण जाम बोअर होतं... विदाऊट ब्लॉगिंग, मेलिंग... :(
माझं अगदीच "अट्टल दारुड्या" सारखं झालयं… कितीही नाही म्हटलं तरी तो गुत्त्यावर आणि मी नेटवर जायला चुकत नाही !
* आळसाचं प्रमाण कसं ठरवायचं? चला, शुभरात्री .. उद्या भेटु!

Wednesday, 2 September 2009

विश्रांती नम:

दैनंदिनी - २ सप्टें. २००९
... मंथली रिव्ह्युवज मिटींग... रिपोर्ट... डिस्कशन.. बस्स.. दिवसाची सुरुवात! दोन - ती असायन्ड टास्कस् ... डन!
सोमवार पर्यंत मस्त सुट्टीवर आहे... ट्विटर किंवा चॅटवर ऑनलाइन नसणार... थोडक्यात म्हणजे - विश्रांती नम: ||
रात्री वेळ - मिळाला तर एखादी टेक पोस्ट टाकावी म्हणतोय... बघु..! चला.. तसं सोमवारी भेटुच ... काळजी घ्या!

झिमँटा - ब्लॉगिंगच्या भन्नाट अनुभवासाठी!

पोस्ट किंवा एखादे आर्टिकल लिहिताना ब्लॉगर्सना गरज पडते ती संबधित फोटो किंवा इमेजची. शिवाय फोटोसहित लिहिलेली पोस्ट दिसायला आणि वाचायलाही छान असते! असा फोटो नेटवर शोधणे तसं फार अवघड नाही, मात्र बर्‍याचदा कॉपी-राइट च्या प्रकरणात गुंतण्याची शक्यता असते. तसं भारतामध्ये ही प्रकरणं तशी "किरकोळ" जरी समजण्यात येत असली तरी हा फार मोठा इश्शु आहे - होऊ शकतो. तर यावर "झिमॅटा" नावाची वेबसाइट - फायरफॉक्स प्लगिन आपल्या फार उपयोगी पडतं. कसं ते या डेमो मध्ये पहा!
तुम्ही जर फायरफॉक्सचे युजर [मी तर फॅन आहे!] असाल तर फायरफॉक्सचे हे प्लगिन इंस्टाल करा. तुमचा ग्राफिक्सचा प्रश्न सुटलाच म्हणुन समजा!

कसे वापरावे:
एकदा झिमँटा इंस्टाल झाले की तुम्ही ब्लॉगर किंवा वर्डप्रेस ला लॉगिन करा. पोस्ट लिहिण्याच्या उजव्या बाजुला ते दिसेल. तुम्ही काही पोस्ट संबंधित ओळी लिहिल्या की ते तुम्हाला संबंधित ग्राफिक्स आणि लिंक्सही दाखवेल. संबधित इमेजवर क्लिक केलं की ती इमेज तुमच्या पोस्ट मध्ये जाईल.. सोप्प ना! झिमँटा हे, विकि - फ्लिकर्, नेट वरच्या कॉपी राइट्स फ्री - इमेजेस दाखवतं म्हणजे आपण त्या वापरायला मोकळे. आता तुम्ही मराठी किंवा हिंदीत लिहित असाल तर संबधित ग्राफिक्ससाठी काही शब्द/ ओळी इंग्रजीत लिहा म्हणजे तुम्हाला योग्य ग्राफिक्स सापडेल. नंतर पब्लिश करण्याआधी ते शब्द / ओळी डीलीट करायला विसरु नका!

आता, ग्राफिक्स डाव्या [डिफॉल्ड सेटींग] बाजुला जातात.. ते तुम्ही उजव्या बाजुलाही सेट करु शकता. पोस्टच्या खाली - रीब्लॉगचे बटन येते. ते तुमच्या विजिटर्सनी पुन्हा ती पोस्ट पब्लिश करण्यासाठी मदत करतं. तुम्हाला ते नको असेल तर HTML टॅब मध्ये जाउन तो कोड डिलिट करा.

शिवाय तुमच्या पोस्टशी निगडीत काही इतर पोस्टच्या लिंकही त्या ग्राफिक्सच्या खाली दिसतात. त्यावर क्लिक केलं की ती लिंक तुमच्या पोस्ट मध्ये टाकली जाते. तसेच पोस्टमध्ये वापरलेले शब्द आपण लेबल्स म्हणुनही क्लिक करुन टाकू शकता. हे प्लगिन जवळ - जवळ सर्व ब्राउजर्स [फायरफॉक्स, आय.ई वगैरे] आणि ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मसाठी [ब्लॉगर, वर्डप्रेस वगैरे] आहे. आणि हो! हेच प्लगिन मेल [जीमेल किंवा याहु] साठीही चालतं! सही ना?

हुम्म..! तर, आशा आहे आपणांस हे वाचुन ब्लॉगिंगसाठी मदत होईल. चला तर मग - लागा तयारीला! शिवाय तुम्हाला एखादी माहिती हवी असेल तर सांगा - हॅपी टु हेल्प!
Reblog this post [with Zemanta]

Tuesday, 1 September 2009

ब्लॉग एडिक्ट?

दैनंदिनी - १ सप्टें. २००९

बर्‍यापैकी दिवस होता.. आज काल कामातुन मिळालेला थोडासा वेळही ब्लॉगिंग करण्यात किंवा वाचण्यात जातोय.. मला माहितय, मी नेट एडिक्ट आहे... काय फरक पडतो - ब्लॉग एडिक्ट झालं तर?
काही वेळ घालवुन काही ब्लॉग वेजिटस् तयार केली.... काही महेंद्रजींच्या ब्लॉगसाठी तर काही माझ्या ब्लॉगवर चिकटवायला... ! तुम्ही जर एक्टीव ब्लॉगर असाल तर मला लिन्क पाठवा, मी तुमच्या ब्लॉगसाठी विजेट बनवायचा प्रयत्न [*] करेन!

* अटी लागू: मला वेळ मिळणं... तुम्ही एक्टीव ब्लॉगर असणं आणि मला बॅक लिंक देणं आवश्यक!

ब्लॉगर ची नवीन डिझाइन्स - टेम्प्लेटस्!

बर्‍याच ब्लॉगर्सना आपले डिफॉल्ट टेम्प्लेट बदलायचे असते. मात्र कसं बदलायचं, किंवा नविन चांगले टेम्प्लेटस् कुठं मिळेल याची माहिती हवी असते. असो! ब्लॉगर.कॉम च्या ब्लॉगर्स साठी खाली दिलेल्या काही लिंक्स आहेत. बरेच चांगले टेम्प्लेटस् आहेत. बघा एखादं आवडतयं का?
बीटेम्प्लेटस्
ब्लॉगर टेम्प्लेटस् फ्री
ब्लॉगर बस्टर
अच्छा... आवडलं एखादं.. डाऊनलोड - अनझिप - करा.
आता हे नविन टेम्प्लेट वापरणार कसं? त्यासाठी ही खाली दिलेली लिंक बघा.. अगदी स्टेप - बाय - स्टेप माहिती आहे : ब्लॉगर ट्रीक्स
माझ्या ब्लॉगला लिंक अशी द्या..! काही मदत हवी असल्यास कमेंट टाका!

Friday, 21 August 2009

मी येतोय!

Thursday, 20 August 2009

स्री. बैलांचा सण: बैल पोळा!

काल पोळा व्हता. हा स्री. बैलांचा सण असल्याने यास "बैल पोळा" पण म्हणत्यात. पण गाईंच्या सणाला "पोळी" म्हणत न्हाईत. पुण्यात चपातीला पोळी म्हणत्यात. पोळा सरावणातल्या आमुशेला येतो. वरिसभर मर-मर काम करणार्‍या स्री. बैलांनला प्रेम दाखविण्यासाठी हयो सण साजरा करत्यात. हायस्कुल संपस्तोवर मी पण बैल होतो त्यामुळे या सणाशी माझी वैयक्तिक जवळीक आहे. तसेच भारत हा शेतकर्यांचा देश असल्याने हा एक राष्ट्रीय सण असावा आनि या दिवशी सर्व्यांना सुट्टी आसावी अशी माझी इच्छा आहे. बैलपोळा हा माज्या माहितीतला - मुक्या प्रान्यांसाठी मानसासारख्या जनावरानं साजरा केलेला एकुलता एक सण आहे.


पोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलांच्या आदी उठतात. बैलांना नदीवर नायतर वड्यावर नेऊन निरमा लाऊन धुत्यात. शिंगे तासली जातात. नाकात नवी येसण आणि गळ्यात नवा कासरा लावतात. पायची खुरं कापुन पत्री मारत्यात.

आपल्याला नाय का आइ दिवाळीला लवकर उठ्वते आन् मोती साबणानं आंगुळ घालुन नवी कापडं देत्यात. तस या दिवशी बैलांचा लय थाट आसतुय. त्यांनला दिवसभर कामाला लावत न्हाइत. बैलांच्या वशिंडावर हळद व आसेलच तर तेल/ तुप लाऊन मालिश करत्यात. मोठं वशिंड असणारा बैल हा पैलवान बैल असतो. सर्व्या आंगावर रंगाचं नायतर गेरुचं ठिपके देत्यात आन् आपल्या हाताचे शिक्के पण मारत्यात. शिंगावर शेंदुर नायतर इंगुळ लावुन त्यावर रंग-बिरंगी बेगडं चिटकवत्यात. बेगाड लय नाजुक असतं. ते दोर्‍याने कापत्यात व त्याच्या पट्ट्या करुन ते शिंगावर लावत्यात. शिंगाच्या टोकाला चिलिमीसारखे पितळेचे एक इभुषण घालत्यात. ते पडु नये म्हणुन एक - एक मोळा बी मारत्यात. पण त्याच्यानं शिंगातुन रगत येत नाही. त्याच्यावर उभे गोंडे लावतात. गळ्यात चंगाळ बांधतात. चंगाळ घराच्या आडाला बांधल्यामुळे ते धुराने काळं कळ-कुळीत झालेलं असतं. बैलाच्या गळयात बांधाच्या आदी ते निरम्याने धुवावे लागतं. नाही तर पांढर्‍या बैलावर त्याचा काळा रंग लागतो. बैल चालताना त्या चंगळाचा लय मस्त आवाज व्हतो. गळ्यात चंगाळ्याबरोबर कवड्याच्या माळाबी बांधत्यात. पायात काळ्या आन् लाल रंगाचं करदोड्याचं तोडं बांधत्यात. त्यामुळं बैल लय भारी दिसतो आन् तेला द्रुष्ट लागत नाय.. म्हणुन मी अजुनपर्यंत माझ्या पायात काळा करदोडा बांधतो.

पाठीवर नक्शी केलेलं झुल टाकत्यात. आन् त्यां सगळ्याशिनला गावातन वाजवत नेत्यात. त्यांच्या मोरं हालगी वाजणार मस्त ठेका लाउन वाजवत असतो. डांग नाकी कोकणाकी..डांग नाकी कोकणाकी.. ड डांग डांग नाकी कोकणाकी.. असा आवाज आसतोय.

गावातल्या येशीवर सगळी बैलवाली मंडळी गोळा होत्यात .. मग वाजंत्री .. नगारं .. ढोल.. सनया वाजवुन झडत्या म्हणत्यात. जिकणार्‍या पार्टीस सरपंच नायतर पाटील इनाम देत्यात. त्यातपन येकादा आगावपणा करुन भाशनाला उभारतो. बैलाची तारीप करत्यात. आन् पावसा-पान्याच्या गोश्टी पन. पान तंबाकुचं देनं-घेनं होतं आन् मग पोळा फुटतो. मग संद्याकाळी परतीच्या वाटंवर मारतीच्या देवळाला दर्शनाला जात्यात. घरी आल्यावर पुन्यांदा बैलांनला आन् बैलकर्‍यास ववाळतात. बैलाशिनला खायला पुरणाची पोळी आन् सुग्रास - पेंडीचा निवद देत्यात. बैलकर्‍यासबी नवी कापडं मिळत्यात. दिवसबर दोगंबी लय खुशीत असत्यात.

असा हा स्री. बैल पोळा मला लय - लय आवडतो. तुमास्नी बी आवडतच आसल. व्हय ना... मान हालउ नगा... तसं लिव्हा!
मामाच्या गावी पोळा मोठ्या आनंदानं साजरा केला जायचा. " सादया - महादया " ही बैलांची जोडी मनात कायम राहिलेली. अगदी मोटनं पाणी खेचण्यापासुन नांगरणी - पेरणीच्या वेळी नांगरावर बसुन मामाबरोबर - बैलांबरोबर फिरायचो. आज त्या आठवणी पुन्हा दस्तक देऊन गेल्या!

Saturday, 15 August 2009

गेलं वर्ष ....

गेलं वर्ष काही चांगल्या आठवणींपेक्षा वाईट अनुभवातच जास्त गेलं. या वर्षातल्या माझ्या काही आठवणी...

ऑगस्ट २००८:
सप्टेंबर २००८:
ऑक्टोंबर २००८:
  • केंबोर्नच्या गेस्ट हाऊसमध्ये दिवे लाऊन साजरी केलेली "शांत" दिवाळी - अविस्मरणीय!
नोव्हेंबर २००८:
  • कॅब्रिजचे फायरवर्कः या वर्षीच्या हुकलेल्या दिवाळीची मजा आम्हीं इथे भरुन काढली...!
  • लंडन सोबत - विंम्बली स्टेडियमला पण जाऊन आलो. या शिवाय नेस्डेनच्या स्वामी नारायण मंदिरातही ... जगप्रसिध्द आणि गिनिज बुक मध्ये रेकौर्डस असलेले हे मंदिर इकडे सायबाच्या देशात ....वा!
  • मुंबईवरच्या त्या दहशतवादी हल्ल्याचं लाईव्ह प्रक्षेपण केंबोर्न मधुन पाहणं... टि.व्ही. वरच्या त्या मुर्खांना आतघुसुन मार मार मारावं असं वाटणारं... आतुन आक्रोश करणारं मन... भरलेले डोळे... सारं कसं सुन्न करणारं. ती काळी रात्र तशीच जागुन काढलेली... ! त्या वीर शहीदांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...!
डिसेंबर २००८:
  • यु. के वरुन परत. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यानंतरचं एअरपोर्टवरचं वातावरण, अफवा यांनी लोकांना जीव मुठीत घेऊन - चुपचाप बाहेर पडताना पाहणं त्या दहशतवादी हल्ल्याची जाणीव वारंवार करुन देत होतं

जानेवारी २००९:
  • छोकरीच्या शाळेच्या दाखल्यासाठी बिशप स्कुलमध्ये हजर राहणे आणि इंटरव्ह्युव देणे... नोकरीच्या वेळीही आलं नव्हतं तेवढं टेंशन होतं!
  • मनात नसतानाही पुन्हा यु.के. ला जावं लागलं. छोकरीच्या शाळेचं/ दाखल्याच टेंशन आणि राहुन राहुन उठणार्‍या आतंकवादी हल्ल्याच्या अफवांचं वेगळंच टेंशन!
फेब्रुवारी २००९:
मार्च २००९:
  • यु.एस. मध्ये लिलावात काढलेल्या गांधींच्या काही वस्त बोली जिंकुन परत मिळवल्याबद्दल विजय मल्ल्यांचे फार कौतुक वाटले... मंड़ळ आपले आभारी आहे!
एप्रिल २००९:
मे २००९:
  • यु.के. वरुन परत आल्यानंतर - मुंबई एअरपोर्टवर स्वाईन फ्ल्यु ची टेस्ट न होता केवळ नाव - पत्ता लिहुन जायलासांगणे - अगदीच सरप्राइजिंग होतं!
  • फॅमिलीसहितची लाँग पेंडिंग कोंकण यात्रा चांगली झाली
जुन २००९:
जुलै २००९:
ऑगस्ट २००९:
  • स्वाईन फ्ल्यु चा भारतातला पहिलाच बळी पुण्याचा... कुणाची चुक, काय कारणं.... अनेक अनुत्तरीत प्रश्न!

अरे हां, तुम्ही म्हणाल - हे कोणतं वर्ष मधेच उद्भावलं ?
तर - काल माझा वाढदिवस होता.. आणि वरच्या आठवणी ऑगस्ट २००८ ते ऑगस्ट २००९ या वर्षाच्या आहेत!

Friday, 14 August 2009

स्वातंत्र्य दिनाच्या लाख - लाख शुभेच्छा!


एक जात, एक धर्म - मी भारतीय!
स्वातंत्र्यदिन चिरायु होवो!
स्वातंत्र्य दिनाच्या लाख - लाख शुभेच्छा!

Wednesday, 12 August 2009

पूणेरी वाहन - चालक कसा ओळखावा?

गेल्या दहा वर्षात पुण्यातला वाहतुकीचा आणि वाहनचालकांचा अनुभव पाहता, मी खालील तर्क काढले आहेत.
कदाचित ते चुकीचेही असतील किंवा त्यामध्ये तुम्हाला अतिशोक्तीही वाटेल... पण मी माझ्या मतावर अजुनही ठाम आहे!

१. वाहतुकीचे नियम पाळले तर आपली गर्लफ्रेंड / मित्र आपल्याला भ्याड समजेल / समजतील अशी यांची पक्की समजुत असते.
२. समोर पोलीस दिसला तरच नियम पाळायचा, असा पुणेकरांचा स्वतःचा नियम असतो.
३. समोरच्या चौकात पोलीस आहेत की नाही, याची दुरूनच खात्री करुन घ्यायची आणि जर तो नसेल, तर एकदम बिनधास्त - स्पीडमध्ये सिग्नल तोडून वन-टु का फोर व्हायचे हे त्यांना कुणी सांगावे लागत नाही!
४. सिग्नल ऑरेंज होत असेल तर, स्पीड कमी न करता, अधिकच वाढवत, गाडी तशीच दुमटत पुढे न्यायची... भलेही रस्त्याच्या मधोमध थांबावे लागले तरी हरकत नाही!
५. सिग्नल ग्रीन झाला की तुमच्या पाठीमागचा न चुकता हॉर्न वाजवतोच! बर्‍याचदा असा हॉर्नच सिग्नल ग्रीन झाल्याची निशाणी असते!
६. आपल्या लाखाच्या गाडीला दोन इंडिकेटर्स असतात यांची जाणीव आणि त्यांचा वापर, या दोन्ही गोष्टींचा यांना पुर्ण विसर पडलेला असतो. इंडिकेटर लावलाच तर तो गाडी बंद होई पर्यंत चालुच असतो!
७. कानात हेडफोन घालुन एखासा चार चाकी गाडी चालवत असेल तर - साहेबांनी आत्ताच दुचाकी विकुन - चारचाकी घेतली आहे असे समजावे!
८. अशा इस्टंट गाडीवाल्यांपासुन दहा -फुट अंतराने आपले वाहन हाकावे. यांची दुचाकीची सवय अजुनही गेलेली नसते - ते कधी - कसाही कट मारु शकतात!
९. झेब्रा क्रॉसिंग - फुटपाथ या ठीकाणांची यांना खास आवड - आकर्षण असते. त्यावर गाडी थांबवणे - चालवणे - याला ते शौर्य समजतात!
१०. गाडी चालवताना, ओव्हरटेक कोणत्या बाजुने करावे - यापेक्षा थोडीशी मोकळी जागा कोणत्या बाजुला आहे, यावर त्यांचे खास ध्यान असते आणि चुकुन अशी थोडीशी जागा मिळाल्यास ते कुशलतेने ओव्हरटेक करतात!
११. नो - एन्ट्री/ रोड क्लोज्ड असे बोर्ड असताना देखिल हे त्या रोडवर एन्ड पर्यंत जातील. परत येतील... मात्र दुसर्‍या दिवशी पुन्हा तो रोड चेक करायला जरुर जातील.
१२. हेल्मेट घालणं म्हणजे यांना जीवावर आल्यासारखे वाटते. त्याच्या विरोधात ते राष्टीयच काय आंतराष्ट्रीय पातळीवरही लढायला तयार असतात.

मला वाटतं:
१३. रिक्षा चालकांना पुण्यात खास ट्रेनिंग दिले जाते. कुठेही ३६० डिग्रीमध्ये वळावे... सायकलही न जाणार्‍या जागेतुन रिक्षा कशी घालावी... कुणी हात केलाच तर जागेवरच कसे थांबावे - हे त्यातले काही धडे!
१४. पी.एम.टी. वाल्यांना वर ट्रेनिंग घेतलेल्या रिक्षावाल्यांकडुन खास सवलतीच्या दरात तेच ट्रेनिंग दिले जाते.
१५. चार चाकी वाला नेहमीच दुचाकी आणि तीन चाकी वाल्याकडे अगदीच तुच्छतेने पाहतो. उगाचच, अशी एखादी तरी झलक देतीलच!


बाकी, आपण अनुभवी आहातच... आपले अनुभव - तर्क काय म्हणताहेत?

Tuesday, 11 August 2009

आपण यांना पाहिलंत का?

आ. मा. पुण्याचे पालन कर्ता/धर्ता - श्री. सुरेश/जी कलमाडी/जी/साहेबजी
आणि त्याच तोडीचे
श्री. अजितदादा/जी/राव पवार/जी/साहेब.

माननीय महोदय,
आपणांस आठवण्यास कारण की वि. वि.

बरेच दिवस झालं, आपणांस लिहिन - लिहिन म्हणत होतो... पण कामांतुन वेळच मिळत नव्हता आणि आता स्वाईन फ्लुच्या टेंशन मुळं कामात लक्ष लागत नाही.... ! म्हटलं लिहावं ...
तर, बरेच दिवस झाले आपलं दर्शन - साक्षात्कार नाही म्हणत हो... न्युजपेपर वगैरे मधुन, झालं नाही. आणि त्यातच स्वाईन फ्ल्युचं तांडव सुरु आहे.... वाटलं विचारपुस करावी.
जिवंत आहात न्हवं?

तसा मी काय पुणेरी नाही... पण गेली दहा वर्षे झाली इथं राहतोय.... दुसर्‍या शहरांत राहण्याच्या - सेटल होण्याच्या आलेल्या संध्या पुण्यासाठीच सोडल्या.... पुणेच आपलं मानलं...त्या पुण्याची हालत आज बघवत नाही हो.. मित्रांच्या घोळक्यात बर्‍याचदा तुमची नावं ऐकलीत... की तुम्ही लोकंच पुण्याचं माय - बाप आहात म्हणे... गार्डियन्स म्हणे.... आज न राहुन मनात प्रश्न आलाच - आपण कुठं आहात?

आम्हाला मान्य आहे की यावेळच्या इलेक्शन मध्ये आपणास भरघोस मताधिक्य मिळालं नाही.... वेबसाइट आणि सो. नेटवर्क ही गेल्या इलेक्शन पासुन अपडेट केलेल्या नाहीत.... का हो - ते काम फक्त हे इलेक्शन ते इलेक्शन असंच होतं का?

मात्र आपल्या वेबसाइट्स - फेसबुक चे प्रोफाइल बघुन हे मात्र कळाले की आपण अगदी २१ व्या शतकातील राजकारणी आहात... त्यामुळे कदाचित आपण लपुन - छपुन नव्या शतकाची वाट बघताहात काय?

फार मोठ्या अपेक्षा नाहित इथं - फक्त एक गार्डियन म्हणुन आपण आपल्या कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शक सल्ला द्या.... दवाखाने - शाळा अशा ठीकांनी कार्यकर्त्यांना पाठवुन जारगुकता करता येते का पहा... किमान तुम्ही आहात - हे तर पुण्याला दाखवुन द्या.
उद्याचं काय सांगावं - व्हिजन २०२० चा आराखडा फार सुंदर आहे... पण त्यासाठी लोकं जगायला हवीत... जगलेल्या लोकांनी तुम्हाला जाणायला हवं... जाणकारांनी मत द्यायला हवं ... आणि तुम्ही जिंकायला हवं!
तुम्हाला तरी काय म्हणायचं! खरं - खोटं देव जाणो!

कळावे,
लोभ असावा/ काळजी घ्या!
मी.

Saturday, 8 August 2009

सुशिक्षित मुर्ख!

आज संध्यकाळी काही औषधे आणण्यासाठी मेडिकल स्टोअर मध्ये गेलो होतो... स्वाईन फ्ल्युच्या भीतीमुळे म्हणा वा आजारी वातावरणामुळे असो, स्टोअर हाऊसफुल्ल होतं..एक बुरखा - म्हणजे चेहर्‍यावर मुंडासे गुंडाळलेली - घातलेली बाई त्या गर्दीत घुसुन सर्वात पुढे होऊन मास्क घेण्याच्या तयारीत होती... साहजिकच सर्वांचे लक्ष तिच्याकडे लागुन होते.

SYDNEY, AUSTRALIA - APRIL 29:  A traveller wea...Image by Getty Images via Daylife

ती: ये मास्क दिखाना...
तो: ये लिजिये..
ती: क्या कीमत है?
तो: १० रु.
ती: मेहंगा है..
तो: ... डिस्पोजेबल है, मॅडम
ती: मतलब - युज ऐंड थ्रो..
तो: हां...
......
.........
ती: वो दिखाना... कितने का है?
तो: ३० रु.
ती: बहोत मेहंगा है! ... डिमांड है, इसलिये इतना मेहंगा बेच रहे हो....
तो: नही मॅडम.... हमेंभी तो मेहंगा मिलता है!
....इथपर्यंत सगळं ठीक...

त्या नंतर त्या बाईने, मुंमुडासे खाली ओढुन तो मास्क लाऊन बघितला.... बसतोय असं वाटल्यानंतर, तिने तो परत ठेऊन नविन मास्क घेतला व पैसे देऊ लागली... समोरच्या एकाने तिला विचारले - मॅडम, अगर आपने वो पहले वाला मास्क लगाके देखा है तो वही खरीद लिजिये ना.... वो वैसेही वापस करके आप नया कैसे ले रहे हो...?

आपल्याला अगदीच काही न कळाल्याच्या आव आणत ती त्याला म्हणते, की मैने तो सिर्फ देखा के बैठता है की नही! आणि पैसे देऊन ती बाहेर पडली...!

दुकानदार, त्याला सांगेपर्यंत, तो मास्क इतर मास्क मध्ये मिसळुन परत ठेऊन देतो!!

एकतर स्वाईन फ्ल्यु संसर्गजन्य... त्यात असे लोक... मास्क वापरुन तो परत ठेवुन दुसरा उचलतात... आपण सुरक्षित झालो म्हणजे झालं... दुसर्‍याचं काय आपल्याला?
कसे लोक असतात ना...? आपण फार सुशिक्षित आहोत हे दाखवण्यासाठी केवढा मुर्खपणा करतात!
Reblog this post [with Zemanta]