Categories

Aeroplanes

Aeroplanes

Sunday, 3 January 2010

ब्लॉगपोस्ट लिहिण्याचे १०१ मार्ग!

महेंद्रजींनी ब्लॉग न लिहणार्‍यांची बरीच कारणं दिलीत.. प्रत्येकाचे काही न् काही कारण असतेच.. पैकीच एक म्हणजे - दरवेळी कोणत्या विषयांवर लिहायचे? ब्लॉगिंग सुरु केल्यानंतर काही मंडळीकडचा ब्लॉगच्या आयडिया - किवा विषय म्हणा - संपल्यासारखे वाटु लागतात. मग लिहण्यासाठी टाळाटाळ साहजिकच आहे! असो. तर मलाही असं होतंच.. म्हणुन एकदा महाजालावर थोडी शोधा-शोध करुन पाहिलं आणि ब्लॉगपोस्ट लिहिण्याचे चक्क शंभरपेक्षा अधिक मार्ग सापडले!

मला माहित आहे.. ही पुर्ण पोस्ट वाचणे जरा वेळ खर्ची करण्यासारखं आहे. म्हणुनच त्याची साधी पी.डी.एफ. बनवली आहे.
डाऊनलोड करा आणि आरामात वाचा.

चला त्यावर सविस्तरच बोलुया...!

१. आवडीचे कोनाडे शोधा:
बर्‍याच ब्लॉग/ वेबसाईट्सवर आपल्या आवडीचे लेख/ विषय असतात. गुगल-रीडर मध्ये अशा वेबसाईट्स/ ब्लॉग यांची ई-मेल वर्गणी [सबस्क्रिप्शन] घेऊन ठेवा आणि दररोज - वेळ मिळेल तेंव्हा किमान त्याच्या मथळयावर नजर फिरवा. तुम्हाला तुमचा विषय मिळेल. अशाच काही मथळ्याचसाठी "डंप लिटल मॅन" किंवा "लाईफहॅक" या संकेतस्थळांना भेट द्या - त्यांचे सबस्क्रिप्शन घ्या.

२. लोकल - स्थानिक वर्तमान पत्रे वाचा:
तुमच्याच शहराचे - विभागाचे किंवा गावचे स्थानिक वर्तमान पत्रही तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयावर एखादी बातमी - आयडिया देऊ शकतं. बर्‍याचदा, आपल्या आवडीबाहेचं वाचनही आपल्याला एखादी भन्नाट कल्पना/ विषय देतं.

३. वाचकांना विचारा
तुमचा ब्लॉग वाचणार्‍यांना विचारुन पहा - त्यांना कोणत्या विषयांवर वाचायला आवडेल? काही जण, अगदी प्रोफेशनल ब्लॉगर्सही, त्यांच्या वाचकांकडुन अशी माहिती विचारतात आणि त्यावर येणर्‍या मतांमधुन/ प्रतिसादातुन तुम्हाला तुमचा विषय निवडता येतो. उदा. प्रोब्लॉगरचा डॅरन रोज.

४. तुमचे प्रश्न - उत्तरे शोधा:
चांगल्या पोस्ट/ लिखाण हे तुम्हाला पडलेल्या लाख मोलाच्या प्रश्नावर अवलंबुन असतं. तुमच्या विषयाला अनुसरुन विचारलेले प्रश्न, त्याची उत्तरे यातुनच तुम्हाला लिहायला एक चांगला विषय मिळु शकतो. किमान तो प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर हेच एखादी पोस्ट होऊ शकतं! याहु आणि विकि वर तुम्हाला अशी बरेच प्रश्नोत्तरे सापडतील.

५. कल्पना करा - तुम्ही एक सॉलिड लेख लिहिलाय!
जरासं वेगळं वाटलं ना? अहो कल्पना करा की तुमची एक भन्नाट पोस्ट झालीय.. लोक त्या लेखांबद्दल चर्चा करताहेत... प्रतिक्रिया लिहिताहेत आणि त्यातुनच तुम्हाला नविन विषय सुचतोय - नवी पोस्ट लिहायला!

६. फ़ोरम - चर्चासत्रांना भेट द्या
इंटरनेटवरील फोरम - चर्चा सदरांनी भेट द्या.. बघा लोक कशाबद्दल आणि काय बोलताहेत. त्यांना काय हवंय, कशाबद्दल माहिती हवीय? जर तुम्हाला हे कळालं तर तुमची पुढची पोस्ट बनलीच ना! इंग्रजीच नाही तर तुम्हाला "मिसळपाव", "मनोगत", "मायबोली" यांवरही रोज नविन विषय वाचायल मिळतील हो!

७. आर्टीकल डिरेक्टरीजना भेट द्या
विषयवार माहिती देणार्‍या "मार्गदर्शिकांना" - डिरेक्टरींना भेट देऊन तुम्हाला तुमच्या आवडत्या किंवा न आवडत्या विषयांवरही अधिक माहिती मिळवता येईल. काही वेळा लिहु घातलेल्या किंवा पुर्ण होत आलेल्या पोस्टलाही संपुर्ण करण्यासाठी अशा मार्गदर्शिका फार उपयोगी पडतात. उदा. इझाईन मार्गदर्शिका

८. इंटरनेट वरील शोधाचा उपयोग करा.
गुगल वर काही शोधताना तुमच्या शोध शब्दासारखेच - साधर्म्य असणारे शोध तुमच्याआधी घेतल्या गेल्याचे तुम्ही पाहिलेच असेल. ते शोध शब्द काय होते.. लोक त्यातुन काय शोधत होते हे त्या शोधा वर - पोस्टवर जाऊन पहा, तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती मिळतेय का? म्हणजे काही शोधताना सापडलेल्या माहितीचाही - पुढची पोस्ट लिहिताना उपयोग होईल, नाही का?

९. काही ठराविक शब्द शोधा
हा अजुन एक सोपा मार्ग. एखादा शब्द घ्या आणि त्यावर शोधा. बघा काय - काय हाती लागतंय. उदा. देतो. समजा मी "पुणे" असा शब्द "वर्डट्रॅकर" या साधनाच्या सहाय्याने शोधला तर मला चिक्कार शब्द सापडले. तुम्हीही तुमचा एखादा शब्द शोधुन पहा!

१०. ऑनलाईन वाचा
स्थानिक बातम्या प्रमाणेच ऑनलाईन न्युज ही नविन लिहायला विषय मिळवुन देतात. ऑनलाईन बातम्या वाचण्याचा मोठा फायदा म्हणजे - ताबडतोब बातमी वाचायला मिळते. शिवाय, गुगल वापरुन देशात चाललेल्या "हॉट ट्रेन्ड्स" बद्दल ही माहिती घ्या. यातुनच तुम्हाला तुमच विषय मिळेल ना! उदा. आजचे "हॉट ट्रेन्ड्स" पहा.

११. ऍनालीटीक्सचे आकडे पहा
पाठीमागच्य एका पोस्टमध्ये मी गुगल ऍनालीटीक्स बद्दल लिहलं होतं. त्याच्या रिपोर्ट मध्ये पाहताना तुम्हाला कळेल की लोक कोणत्या विषयावर जास्त वाचताहेत, कोण काय शोधुन तुमच्या ब्लॉग/ साईटवर आलं. ही माहिती वापरुन किंवा त्यावरच तुम्हाला नविन पोस्ट लिहिता येईल.

१२. जुन्या पोस्ट धुंडाळा
तुम्ही ब्लॉगच्या सुरुवातीला लिहिलेल्या विषयाबद्दल आठवतंय? जरा स्वत:च्याच जुन्या पोस्ट धुंङाळुन पहा. त्यातले विषय, वाचकांच्या प्रतिक्रिया यावरुन तुम्हाला नविन पोस्टसाठी काही सुचेलच ना!

१३. दुसऱ्यांच्या ब्लॉगच्या जुन्या पोस्ट धुंडाळा
काही जाणकार आणि प्रसिध्द ब्लॉगर्सच्या जुन्या पोस्ट धुंडाळा. काही नविन आयडिया मिळतील.... हां, मात्र तीच पोस्ट कॉपी - पेस्ट मारु नका म्हणजे झालं!

१४. कुणाची तरी मुलाखत घ्या!
कुणाची तरी म्हणजे एखाद्या विचारवंताची, गावच्या सरपंचांची, शेतकर्‍याचीही! पत्रकार म्हणुन नव्हे.. त्यांचे विषय ... अडचणी/ मत समाजाला अवगत करुन देता आलं तर एक समाजसेवाच होईल नाही का?

१५. अमेझॉन वर शोधा
अमेझॉन वर तुम्हाला सध्याच्या प्रसिध्द पुस्तकं - विषय या बद्दल माहिती मिळेल. ती वापरुन एखादी ब्लॉगपोस्ट नक्कीच लिहिता येईल.

१६. टेड.कॉम वर पहा - नविन काय आहे?
टेड.कॉम या साईटवरुन तुम्हाला समजेल की सध्या तांत्रिक - करमणुक किंवा इतर बाजारात काय चालु आहे. या नविन घडामोडीबद्दल तुम्हालाही माहिती मिळेल.

१७. रिकाम्या वेळात - विचार करा!
रिकामं मन - शैतानाचा कारखाना असतो असं म्हणतात... हाच कारखाना आपण आपल्या ब्लॉगसाठी नविन पोस्ट छापायला वापरायचा! मनात आलेला विषय लागलीच कागदावर - समोर असणार्‍या वहीत, हवं तर मोबाईलमध्ये ड्राफ्ट करुन ठेवा आणि त्यावर लिहा.

१८. पी.एल.आर. आर्टिकल्स शोधा
अगदीच विषय संपले असं वाटत असेल तर हा पर्याय. पी.एल्.आर. म्हणजे "प्रायवेट लेबल राईट्स". यानुसार तुम्ही एखादं पुस्तक, लेख खरेदी करुन नंतर तुमच्या सोयी/ आवडीनुसार त्यात बदल करु शकता. उदा. पी.एल.आर. स्टोर

१९. संगित ऐका.
गाणी ऐकणं - सर्वांनाच आवडतं.. नाही का? गाणी ऐकताना एखादा शब्द/ कडवं किंवा त्यातला एखादा ठेकाही तुम्हाला नविन पोस्ट लिहायला विषय मिळवुन देईल. शिवाय - आवडती गाणी/ गायक/ संगीत अशा अनेक विषयांवर लिहिता येईल ते सांगायची गरज नाही, हो ना :)

२०. मुक्त विचार
कोणताही विषय पुर्वनियोजित न ठेवता नविन विषयांच्या विचारात मनाला अगदी मोकाट सोडा.. बघा काय विचार मनात येताहेत.. ते विचार लागलीच नोंद करुन ठेवा.

२१. कोट्ससाईला भेट द्या
थींक-एक्जिस्ट किंवा ब्रेनीकोट्स यांसारख्या संकेतस्थळांना भेट देऊन पहा. अनेक वेगगेळया विषयांवर तुम्हाला चांगले कोट्स - विचार वाचायला मिळतील. त्यातलेच काही विचार तुम्हाला एखादी चांगली पोस्ट लिहायला मदत करतील.

२२. मित्र आणि नातेवाईकांना विचारा
मित्र आणि नातेवाईकांकडे "मी नविन पोस्ट लिहितोय, तुम्हाला काही प्रश्न किंवा माहिती हवी आहे का?" असं विचारुन पहा. एका पेक्षा एक आयडिया मिळतील. कदाचित तुम्ही विचार न केलेला किंवा मनात नसलेला सुद्धा एखादा विषय लिहायला मिळेल.

२३. माईन्ड ब्लॉकेज!
अगदी तडकाफडकी विषय - म्हणजे, बरेच आठवुनही जर तुम्हाला एखादा विषय/ नाव किंवा सिनेमाच आठवत नसेल तर तो विषय मना आल्या-आल्या तुम्हाला सुचलेला विषय किंवा कल्पनाही नविन पोस्ट लिहिण्यास पुरेशी असते. अगदी मुळात न घुसता लागलीच मिळालेल्या - सुचलेल्या विषयावरच लिहायला घ्या!

२४. ध्यान - मेडिटेशन करा
मेडिटेशन - मी काही अगदीच ध्यानमग्न व्हायला सांगत नाही, पण बर्‍याचदा अगदी डोळे मिटुन शांत - निर्विकार बसुनही मनातले अनेक विचार साफ होतात. मनात शांत रस निर्माण होऊन तुम्हाला एखादा विषय नक्कीच सुचतो!

२५. गुगल-वंडर-व्हील
गुगल वंडर व्हील ही सुविधा वापरुन आपल्याला आपण शोधत असलेल्या फ्रेज बद्दल जरा अधिक माहिती मिळते. आता हे चक्र कसे वापराल?
१. गुगल.कॉम वर जा - शक्यतो गुगल त्या त्या देशाचे सर्च इंजिन वापरते त्यामुळे गुगच्या होमपेजवर जाऊन गुगल.कॉम वर क्लिक करा.
२. एखादा शब्द किंवा फ्रेज शोधा.
३. सर्च रिजल्ट पानावर, गुगलच्या लोगो खाली "show options" दिसेल. त्यावर क्लिक करा.
४. जरा खाली स्क्रोल करुन "standard view." पहा आणि त्यामध्ये "wonder wheel." वर क्लिक करा आणि पहा, तुम्हाला अनेक पर्याय दिसतात!

उदा. गुगल वंडरवर "ब्लॉगिंग" शोधा... आणि हे घ्या निकाल.
आता तुम्हाला तुमच्या शोधाबद्दल अधिक माहिती घेणे सोपं जाईल!

२६. ट्विटरवर टॅग्स व टॉपिक्स शोधा
ट्विटरबद्दल आपणांस माहितचा आहे. १४० अक्षरांत आपल्या सद्य - परिस्थिती - कार्य इ. बद्दल आपण इतरांना माहिती देवु शकतो. ट्विटरवर "हॅश टॅग" या सदरात आपण आपला निरोप जोडुन त्या विषयांवर अधिक ट्विट्स पाहु शकता. असे "हॅश टॅग" आपणांस नविन लेखन करण्यासाठीही वापरता येतील. सध्याचे हॅश टॅग पाहण्यासाठी आपण हॅशटॅग या संकेतस्थळालाही भेट देवु शकता.

२७. काहीतरी वेगळं करा - लिहा!
वेगळं म्हणजे, जे करायचं राहुन गेलं.. जसं एखादा गड किल्ला - ट्रेक - सामाजिक कार्य वगैरे. असं काही हातुन घडलं तर त्यात जो आनंद आहे तो अवर्णनियच! आणि तो आनंद - अनुभव इतरांशी वाटण्यातही वेगळाच आनंद आहे. त्यावर एखादी पोस्ट नक्कीच होईल, नाही का?

२८. पुस्तक वाचा!
आता हे काही सांगावं लागत नाही! मात्र बर्‍याचदा कामाच्या गडबडीत अगदी प्रसिध्द आणि आपली आवडती - आवडत्या लेखकाची पुस्तकं वाचणेही राहुन जाते. थोडा वेळ काढुन ती वाचुन काढा. मग त्यातील आवडलेल्या लेख/ मुद्दा/ लेखक यांवर आपणांस नक्कीच लिहता येईल.

२९. खेळ खेळा
सध्याच्या धावपळीच्या जगात मैदानी खेळ खेळायला वेळ मिळणं जरा कठीणच, नाही का? असो. आपण काही संगणकावर असणारे खेळ - ज्याला व्ही.डी.ओ. गेम्स म्हणतात ते तर खेळुच शकतो. अशाच आपल्या आवडत्या खेळाबद्दल, तो कुठे - कसा खेळता येईल/ त्यातील टिप्स - ट्रिक्स यावर लिहा.

३०. मुलांशी बोला
"मुलं म्हणजे देवाघरची फुलं" असं म्हणतात. अगदी निरागस आणि बिंधास्त विषयही त्यांच्याकडुनच तुम्हा - आम्हाला ऐकायला मिळतील. त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारा. बघा तुम्हाला तुमचा नविन लेखनाचा विषय कसा पटकन मिळतो ते!

३१. चालायला किंवा व्यायामाला जा!
माझ्यासाठी तरी व्यायाम करणे ही गोष्ट "धर - सोड" या प्रकारात मोडते. म्हणजे अनेकदा सुरुवात करुनही त्यात आजही नियमितता नाही. मात्र तुम्ही जर नियमित व्यायाम करायला अथवा चालायला जात असाल तर तुमचे शरीर नक्कीच निरोगी राहिल. आता व्यायामशाळेतील अनुभव - किस्से किंवा सकाळी - सायंकाळी चालायला गेल्यानंतर इतरांशी होणारे संभाषण यातुन तुमच्या ब्लॉगसाठी चांगलाच खुराक मिळेल!

३२. काहीतरी बनवा!
काहीतरी बनवा म्हणतोय - कुणालातरी बनवा, असं नाही. शाळा - कॉलेज पर्यत असताना क्राप्टचा विषय असायचा. त्यातील काही कलाकुसरीवर नविन एखादा प्रयत्न करुन पहा. शिवाय "मी हे सुरु करतोय" असं सदर सुरु करुन त्यावर चालु घडामोडींबद्दल लिहित रहा. यामध्ये स्वत:च्या घराचे काम - ते तंत्रज्ञान या पर्यत अनेक विषय तुम्हाला निवडता येतील.

३३. शाळेला एकदा भेट देऊन या!
तुम्हाला तुमची शाळा - कॉलेज आठवतंय.. काहीतरीच काय? आठवतच असेल! तुमची शाळा किंवा दुसरी एखादी शाळा जवळ - शहरात असेल तर एक फेरफटका नक्की मारा. विद्यार्थी/ शिक्षक यांच्याशी गप्पा मारा.. अहो चिक्कार विषय मिळतील तुम्हाला लिहायला!

३४. एखादा ग्रुप जॉईन करा
आता ऑनलाईन ग्रुपचा तर ढीग पडलाय.. तरीही एखादा क्रियाशील असा ग्रुप निवडुन त्यात सहभागी व्हा. शिवाय आसपास असणारे - भाषिक, सामाजसेवा करणारी मंडळे यांनाही सहभागी होऊन तुम्हाला काहीतरी मदत करता येईल. त्यांच्या अडी - अडचणी. कार्यशिलता याबाबत त्यांना मदत करता करता तुम्हाला तुमच्या पोस्टसाठी कित्येक विषय मिळतील.

३५. शैक्षणिक संकेतस्थळांना भेट द्या
महाजालावरती अशी अनेक संकेतस्थळे मिळतील की जिथे तुम्हाला शिक्षण - पध्दती - नविन पदवी वगैरे असं बरंच काही शिकता येईल. टोटल ट्रेनिंग ही त्यापैकीच एक. तेथे सापडणार्‍या विषयांवर तुमची नविन पोस्ट लागलीच लिहिता येईल.

३६. स्वतःच्या जीवनातील गोष्टी पहा.
कालच मी माझ्या मुलीकडुन नविन कविता शिकलो. हो, लहानपणीच्या आपल्या बालकविता आणि आत्ताच्या कविता यांत फार फरक आहे. अगदी छोट्या गोष्टीही आपणांस बरंच शिकवुन जातात. शिवाय नोकरी करताना - लग्नानंतर - एखादा मित्र मिळाल्यानंतर तुमच्यांत झालेले बदल .. शिकलेल्या गोष्टी अशा अनेक विषयांवर तुम्ही लिहु शकाल.

३७. माईंड मॅपिंग
"माईंड मॅप" अर्थात तुमच्या कल्पनेला आकृतीच्या रुपात सादर करणे. यात तुमच्या मुख्य कल्पना केंद्रस्थळी ठेवुन त्याभोवती संबंधित विचार/ कल्पना/ विषय यांचा मांडणी करतात. अशा प्रकारे तुमच्या मध्यवर्ती कल्पनेबरोबरच तुम्हाला लिहायला अनेक उपविषयही मिळतील. माझ्या वाचनातील "माईंड मॅप" चा सर्वोत्तम वापर मी सोमेशच्या ब्लॉगवर पाहिला. तुम्हीही पहा.. कसे विषयाला - विषय मिळत गेलेत!

३८. नेहमी छोटी डायरी आणि पेन बाळगा.
तुम्हाला कोणता विचार विषय कोठेही सुचु शकतो. अगदी रस्ते - बस - बस स्टॉप वगैरे वगैरे. त्यासाठी एखादी छोटीशी डायरी आणि पेन सोबत ठेवा. विषय सुचल्यावर लागलीच तो विषय आणि त्यातील मुख्य मुद्दे यांचे नोंद करा. हे आपणांस आपल्या मोबाईलवरही करता येईल. वेळ मिळताच त्यावर सुंदर पोस्ट लिहा.

३९,. सेमिनार - व्याखानाला हजर रहा.
शहरामध्ये - कंपनीमध्ये असणार्‍या व्याख्यानमाला वगैरेना हजर रहा. त्यातुन तुम्हाला त्या विषयांवरच्या चालु घडामोडी कळतील. शिवाय अशा व्याख्यानमाला - सेमिनार्स यावर तुम्हांला तुमचं मतही लिहिता येईल.

४०. आसपासच्या परीसराबद्दल बोला.
आसपास चालणार्‍या घडामोडी - हालचालींवर तर नक्कीच तुम्हाला लिहता येईल. अगदी घराच्या पाठीमागे चालु असलेल्या ईमारतीच्या बांधकामापासुन, त्यावर काम करणार्‍या रोजगार्‍यांपर्यत ते तुमच्या परीसरातील नविन बागेपर्यंत!

४१. स्वतःचे अनुभव लिहा.
स्वानुभव हा अगदी नविन ब्लॉग सुरु करण्यासारखा विषय आहे. गेल्या वर्षीच्या "स्टार माझा - ब्लॉग माझा" च्या विजेत्यापैकी श्री. देव हे आपल्या अनुभवावरतीच लिहितात. आता तुम्ही तुमच्या ब्लॉगवरही अशा काही पोस्टस् नक्कीच लिहु शकाल, नाही का?

४२. सिझनल लिखान - सण - वार
हा एक प्रमुख विषय होईल. म्हणजे, नविन वर्षापासुन नाताळापर्यंतच्या सर्व सण- सणावळीवर तुम्हाला एक-दोन पोस्टस् आरामात लिहिता येतील.

४३. केस स्टडी - मोस्ट कमेंटेड - विचारलेले प्रश्न!
तुमच्या ब्लॉगवरील आलेल्या प्रतिक्रिया - विषय - वाद विवाद यावरही चांगले लेखन होईल. श्री. महेंद्र कुलकर्णींच्या ब्लॉगवर याची उदाहरणे पाहता येतील.

४४. नियमित लिखानाचा रकाना - दैनंदिनी!
रोजच्या आढाव्यावर तुम्हाला ब्लॉगवर एक "दैनंदिनी" असा रकाना बनवता येईल व त्यामध्ये तुमचे रोजचे लेखन करता येईल.. कसं?

४५. तुमचे आवडते ब्लॉगर्स!
आवडते कवी - लेखक - अभिनेता... अगदी तसंच आवडते ब्लॉगर्सही असतातच ना! अशाच तुमच्या आवडत्या ब्लॉग आणि ब्लॉगर्स विषयी लिहा. कदाचित आठवड्यातुन एकदा तुम्ही "या आठवड्याचा ब्लॉगर मित्र" यांवर नक्कीच लिहु शकता. हो, अधिक माहितीसाठी तुम्ही आधी त्या आवडत्या ब्लॉगशी संपर्क साधा.. त्याला/ तिला एखादी प्रश्नावली पाठवुन अधिक माहिती घ्या.. अगदी मुलाखत घेतली तरी वावगे ठरु नये!

४६. फ़ोटो गॅलरी!
छायाचित्र - फोटो काढणे आणि काढुन घेणे हा माझ्या आवडत्या छंदापैकी एक. आता हा छंद काही माझा एकट्याचाच नाही. मला वाटतं प्रत्येका - दिसणारी सुंदर - चांगली गोष्ट टिपुन घेणे - ठेवणे आवडतेच. मग अशा ठेवणीतल्या आठवणींसाठी एखादा रकाना - पोस्ट लिहा. त्यात त्या फोटोबद्दलही माहिती लिहा.

४७. डिग्.कॉम
डिग्.कॉम वर तुम्हाला प्रशिध्द आणि वाचकांना आवडणार्‍या विषयांबद्दल माहिती मिळेल. त्यातुनच तुम्हाला तुमच्या तुमचा नविन "पॉप्युलर" विषयही मिळेल.

४८. आठवड्यातुन एकदा - गुगल ऱीडर्सचे टॉप पोस्ट पहा
गुगल रीडर्स मध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या व्लॉगचे वर्गणीदार व्हा. किमान आठवड्यातुन एकदा तुम्ही तुमच्या गुगल रीडरला भेट द्या आणि पहा की तुमचे आवडते ब्लॉगर्स काय लिहिताहेत.. कशावर बोलताहेत. यातुनच तुम्हाला तुमची "आठवड्याची पोस्ट" लिहायची प्रेरणा मिळेल.

४९. वादविवाद - वादंग करणारी पोस्ट!
आता आपल्याकडे अशा विषयाला काय कमी? असे विषय तुमच्या ब्लॉगला चांगलीच प्रसिध्दी देवु शकतात. मात्र अशा विषयावर लिहण्याआधी त्या विषयाचा पुर्ण विचार - अभ्यास करा. मन आणि डोकं शांत ठेवुन विचारपुर्वक लिहा. कुणाच्या भावना दुखावतील असं लिहु नका. येणार्‍या प्रतिक्रियांनाही शांतपणेच उत्तरे द्या!

५०. सुधार - सुधारणा यांवर लिहा.
सुधारणा आणि बदल काही एका दिवसांत होत नाहीत. तुमच्यातील काही बदल कसे झाले किंवा काही सामाजिक बदलांसाठी काय करता येईल.. किंवा समोरचा रस्ता / उड्डाणपुल कसा 'अर्थ'पुर्ण / निरर्थक ठरला इ. विषयांवर तुम्ही तुमचे प्रामाणिक मत मांडु शकता ना?

५१. तुमचा प्रोग्रेस रिपोर्ट दाखवा
५२. टॉप टेन लिस्ट लिहा.
५३. वाचकांना मदत करा!
५४. पुस्तकाचा आढावा लिहा.
५५. ई-मेल वरती लक्ष द्या!
५६. बुकमार्क केलेल्या साईट्स पहा
५७. तुमच्या समजुती - विश्वास यावर लिहा
५८. एखाद - दुसरा, पाहुणा ब्लॉगर शोधा
५९. तुमच्या वाचनातील - महिला ब्लॉगर्स चे लेख मांडा.
६०. ब्लॉगकार्निवल - ब्लॉगोत्सव - हजर रहा.
६१. पैज लावा
६२. इंटरनेट वरुन कंटेट शोधा
६३. स्वतःचा विड़ीओ - क्लीप करा.
६४. ब्रेक घ्या
६५. इव्हेंट हजर रहा
६६. स्वप्नांची दुनिया
६७. ऍफ़िलिएटस - साईट्स
६८. डमि'ज गाईड
६९. ई-बे.कॉम
७०. प्रकाशकांचे कॅलेंडर
७१. जुन्या फ़ॅशन्स - नवं रुप!
७२. नाटक पहा.
७३. तुमचं भय!
७४. नविन कोर्स?
७५. शासकिय आकडेवारी
७६. रिकाम्या जागा भरा!
७७. टी.व्ही. गाईड!
७८. मान्यवर काय म्हणताहेत?
७९. न्युजलेटर सबस्क्रिप्शन?
८०. ब्लॉगचे पुढे काय? भविष्य?
८१. फ़ॅबल वापरा
८२. बेस्ट ऑफ़
८३. गुण-दोषविवेचन
८४. बेस्ट ऑफ़ टॉप पोस्टस.. का?
८५. सल्ला - मसलत
८६. साधन उपलब्धी
८७. विशिष्ट काळातील लोकप्रिय प्रघात
८८. लोकांवर नजर!
८९. न आवडत्या विषयावर लिहा.
९०. बातम्यावर मत मांडा
९१. व्याख्या देणे
९२. स्फूर्तिस्थान = प्रेस रीलिजेस
९३. वस्तु / उत्पादना ची शिफारस करा.
९४. कसे कराल..? हाऊ टु?
९५. ग्रीटींग कार्ड - नजरानजर
९६. ज्ञानकोश शोधा
९७. गूगल एलर्ट
९८. येऊ घातलेले बदल
९९. मतदान किंवा सर्वेक्षण
१००. खेळ - खेळाडु बद्द्ल लिहा!
१०१. शिका आणि शिकवा

कदाचित माझ्या ब्लॉगरील ही सर्वात मोठी पोस्ट असेल..

Wednesday, 30 December 2009

नविन वर्षाची काही शुभेच्छापत्रे - तुमच्यासाठी!

नविन वर्षाची एक छोटीशी भेट. नेटवरुन काही फ्री-ग्राफिक्स एकत्र करुन काही[= ११] मराठी शुभेच्छापत्रे बनवलीत. तुम्हाला तुमच्या मित्रांना पाठवता यावीत - ब्लॉगवर टाकता यावीत म्हणुन!

समोरच्या गिफ्टवर क्लिक करुन झिप फाईल डाऊनलोड करुन पहा, एखादं आवडलं तर?
प्रत्येक कार्डावर एकच मेसेज आहे - नविन वर्ष सुखाचे, भरभराटीचे जावो!

कार्डाबरोबर तुम्ही तुमचा संदेश लिहा :)

डाऊनलोड्स:
मंडळी,
मराठी शुभेच्छापत्रे पाठविण्यासाठी मराठीग्रिटींग्ज.नेट हे संकेतस्थळ नुकतेच कार्यरत झाल्याचे पाहिले. मराठीग्रिटींग्ज वरुन मराठीमधुन शुभेच्छापत्रे पाठवु शकता शिवाय मराठी वॉलपेपर्स, मराठी संदेश व ब्लॉग ग्राफिक्स ही डाऊनलोड करता येतात. आपणही याचा फायदा जरुर घ्यावा.

नव्या वर्षाच्या शुभेच्छा !!

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा..
तुमच्या कर्तॄत्वाला, पुन्हा एक नवी दिशा..

मागे वळुनी नको पाहणे, नको भाषा दु:खाची..
सदैव वाहो तुमच्या दारी, सरिता ही आंनदाची..

नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !



नविन वर्ष तुम्हाला सुख-समृद्धी व भरभराटीचे जावो हिच श्रींच्या चरणी प्रार्थना...!!

Monday, 28 December 2009

मग.. तुमचा नविन वर्षाचा "निग्रह" - रिझॉल्युशन - काय आहे?

दरवर्षी या वेळेला, म्हणजे वर्षाच्या शेवटी जवळ जवळ सारेचजण नविन वर्षासाठी काही ना काही प्लान करतात. काहीतरी नविन करण्याचा... काही असं जे आत्तापर्यंत/ यावर्षी करायचं राहून गेलं असं... आणि एक लिस्ट बनते.. [कदाचित] त्यालाच "न्यु ईअर रिझॉल्युशन" म्हणतात!



तसं मी ही काही अपवाद नाही. आतापर्यंत बरीच रिझॉल्युशन्स केली आणि थोडीच पुर्ण करण्यात धन्य पावलो. काही हरकत नाही, बाकीच्या पुढच्या वर्षासाठी! तर, आतापर्यतच्या लिस्टवरुन बनवलेली ही काही कॉमन रिझॉल्युशन्स!


१. व्यसन मुक्ती [स्मोकिंग / दारु]: अगदी सार्‍याच स्मोकर्सचं हे पेटेंट रिझॉल्युशन्स! वर्षभर सिगारेट लोढल्यानंतर जेंव्हा कधी मनात ती सोडण्याचा विचार येतो, तेंव्हा ३१ डिसेंबरची वाट पाहिली जाते. १ जानेवारी पासुन सिगारेट सोडण्याचे शपथेवर सांगितलं जातं. एक - दोन दिवसांतच हे रिझॉल्युशन्स पुढच्या वर्षापर्यंत 'तहकुब' करण्यात येतं! तेच दारुच्या बाबतीत म्हणता येईल. दारु सोडण्याआधी ३१ डिसेंबरला - गटारी करायची - मनसोक्त प्यायची आणि मग सोडायची असं एकंदरीत टार्गेट असतं!
दोस्त, चांगली आणि योग्य गोष्ट करायला नविन वर्षाची वाट कशाला पहायला हवी. कदाचित पुढचं वर्षच तुझ्यासाठी नसलं तर? रेमेंम्बर, स्मोकिंग किल्स!

२. फॅमिली बरोबर अधिक वेळ घालवणारः हां, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात जिथं जेवायलाही वेळ नसतो तिथं फॅमिलीसाठी वेळ मिळणं कठीणच, नाही का?
लगेच हो म्हणु नका... आपण जे सगळं करताहात ते फॅमिलीसाठी असं जरी असलं तरी त्या फॅमिलीला आपण आणि आपली सोबतही हवी आहे हे विसरु नका म्हणजे झालं!

३. व्यायाम करणारः हसु नका... खरं तेच सांगतोय! पोटाचा वाढलेला तंबु नेहमीच व्यायाम करण्याबद्दल खुणावर असतो. त्यात घरचे - विशेषत: बायको - जरा जास्तच हटकत असते. किमान सकाळी वॉकला जाण्याबद्दल तरी तिची हक्काची मागणी असते. तसं आम्ही सुरुवात करतो, पण दोन-तीन दिवस, आठवडयानंतर आमची अवस्था - पालथ्या घड्यावर पाणी अशी होते.
सकाळी / संध्याकाळी वॉकला जाण्यासारखा व्यायाम नक्कीच करता येण्यासारखा आहे. किमान जेवणानंतर 'शतपावली' करा हवं तर!

४. दुसर्‍यांना मदत करणार - डोनेशन्स वगैरे: काही जण सोशल होण्यासाठीही नविन वर्षाची वाट पाहतात. दुसर्‍यांसाठी काहीतरी करायचय.. काय ते नक्की माहित नाही... मात्र इतरांकडुन ऐकुन/ वाचुन असंच काहीतरी करण्याची हुकी येते.. चांगलं आहे.. !
पण मित्रा, त्यासाठी कशाची आणि कुणाची वाट पहायतोय? रेमेंम्बर - देअर इज नो राँग टाईम टु डु अ राईट थिंग!

५. वजन कमी करणारः पुन्हा एक नविन चॅलेंज. ऑफिसमध्ये - ए.सी. मध्ये बसुन म्हणा किंवा चटर-पटर खाऊन म्हणा, पोटाचा नगारा वाढतोच, पण त्याचबरोबर वजनही. शिवाय व्यायामाच्या नावाने शंखच असल्याने वाढत्या वजनावर कंट्रोल ठेवणे अवघड जाते. मग हा प्वाँईंट या यादीत जातो.
स्नॅक्स, चटर-पटर खाण्यावर हळु-हळु का होईना पण अंकुश ठेवणे गरजेचं आहे. नाहीतर वजनवाढीबरोरच - बी.पी आणि हार्ट अटॅकलाही आमंत्रण आहेच!

६. काहीतरी नविन शिकणारः पण काय ते नक्की नाही.. कदाचित गिटार किंवा तबला वाजवायला शिकायचय! टेक्निकली नविन काही शिकेन... पोहायला?... की नविन भाषा शिकु.. जापनिज - जर्मन सध्दया चांगल्याच फार्मात आहेत!
भाऊ, काहीही शिक.. शिक्षण/ कला कधी वाया नाही जात. फक्त शिकायचंय म्हणुन लिस्टवर नको सोडु, एक प्रामाणिक प्रयत्न कर!

७. कर्ज 'निल' करणारः हम्म.. पर्स्नल लोन, कार लोन, होम लोन अशी बरीच "लोनची" लफडी मागे असतात. पुढच्या वर्षी यातील एकाचा तरी निकाल लावायचाच!
कितीही ईजी इंस्टालमेंट्स असल्या तरी कर्ज हे कर्जच असतं. थोडीशी बचत करुन, थोडीशी काटकसर करुन हे कर्जाचं भुत उतरवायलाच हवं!

८. एक लाँग हॉलिडे: फॅमिलीला वेळ देत नाही असे टोमणे ऐकुन किंवा स्वत:साठीही थोडा चेंज आणि आराम म्हणुन बरेच लोक हा प्लान करतात. आता काहींना सुट्टी मिळते, काहींना मिळत नाही. काही प्लान परदेशातला सुट्टीचा बनवतात तर काही भारतातच.
प्लान मस्त आहे! छोटा असला तरी चालेल, पण फॅमिली बरोबर ठरवला असेल तर तो पुर्ण "कौंटुबिकच" असावा. त्यात सोबत लॅपटॉप.. मग मेल चेकिंग.. शेअर मार्केटवर नजर अशा गोष्टी जरावेळ दुरच ठेवा!

९. प्रमोशन / नविन नोकरी: बस्स यार.. खुप दिवस झाले, आता नविन नोकरी शोधु.. आय नीड अ चेंज असं वाक्य बर्‍याचदा ऐकण्यात येतं. मग पुढच्या वर्षी नविन नोकरी बघायचीच असा मनसुबा बनतो.
हां, चेंज इज लाईफ हे सर्वांनाच माहिती आहे, मात्र असा काही प्रकार करु नका ज्याने लाईफ चेंज होईल.

१०. पुढच्या वर्षी 'प्रेमात पडायचं!': माफ करा, कदाचित - 'गर्लफ्रेंड बनवायचीच' असा प्लान असेल.. कदाचित 'बाबा ... लगिन!' असं आई-वडिलांना रेमाइंड करायचं.... एकंदरीत - जीवनसाथी सोधायचा... बस्स झालं एकटं - बॅचलर लाईफ!
प्लान मस्त आहे, शुभेच्छा!

हां, तर असेच काही प्लान्स/ रिझॉल्युशन बनतात. कदाचित यापेक्षाही जास्त असतील.... तुम्ही सांगालच ना? थोडक्यात - देअर विल अलवेज बी अ ३१स्ट डिसेंबर! आणि हो, ३१ डिसेंबरला मी तर घरीच असणार आहे... तुमचा काय प्लान आहे?

मुळ ग्राफिक्स.

Thursday, 24 December 2009

टॅगा-टॅगी

हां, तर टॅगा-टॅगी त माझ्या नंबर लागला तर - महेंद्रजी, भाग्यश्री आणि पंकज यांच्या टॅगच्या उत्तरादाखल ही पोस्ट!

1.Where is your cell phone?
हॉलमधल्या लाकडी शोकेसवर - तिथेच नेटवर्क येतं - वॉट एन आयडिया सरजी!

2.Your hair?
थोडेच राहिले म्हणा... त्यात बर्‍याचदा झिरो कट असतो!

3.Your mother?
संस्कार - बायकोला आणि पोरीला अहो-जावो करायला शिकव... अरे-तुरे काय करतात तुला?

4.Your father?
बिंधास - स्टील मिलिटरी रुल्स!

5.Your favorite food?
अंडी आणि चिकन - अगदी रोज खाऊ शकतो!

6.Your dream last night?
हुम्म... आतापर्यंत एकही स्वप्न सकाळपर्यंत लक्षात रहात नाही... पण स्वप्नं पडतात मात्र!

7.Your favorite drink?
लस्सी किंवा मिल्क शेक.

8.Your dream/goal?
आई - बाबांना विमान प्रवास करवायचाय!


9.What room are you in?
मधल्या खोलीत.. कंम्प्युटर रूम म्हणा हवं तर!

10.Your hobby?
ट्रेकिंग - फोटोगिरी, डिझाईन, ब्लॉगिंग....!

11.Your fear?
गुडघ्याच्या दुखण्यामुळं ट्रेकिंग - भटकंती बंद तर नाही ना करावी लागणार?

12.Where do you want to be in 6 years?
स्वत:च्या शेती फार्मात!

13.Where were you last night?
घरीच! सावंतवाडीच्या प्रवासानंतर मस्त झोप घेतली!

14.Something that you aren’t diplomatic?
मैत्री आणि मित्र!

15.Muffins?
सध्या तरी फार आवडतात असं म्हणता नाही येणार!

16.Wish list item?
चार चाकी घ्यावी म्हणतोय.. बुलेटवर तिघांनी जरा अवघडल्यासारखं होतं... !

17.Where did you grow up?
सांगोला - सोलापुर जिल्हा!

18.Last thing you did?
सावंतवाडीवरुन गुडघ्याला - नॅचरोपथी - लेप देवुन आलोय.

19.What are you wearing?
टी-शर्ट आणि ट्रॅक पँट..

20.Your TV?
ओनिडा - लग्नात मिळालेला! ब्रँड विचारताय का आवडते कार्यक्रम [सोनीवरचा सी.आय.डी., सी.एन्,बी.सी - आवाज, डिस्कवरी] ?

21.Your pets?
कोणी नाही!

22.Friends
खुप आहेत आणि कॉलेजमधली मैत्री अजुनही टिकुन आहे!

23.Your life?
नथिंग स्केड्युलड...

24.Your mood?
ठिक आहे. आत्ताच ते कडु औषध घेतलंय!

25.Missing someone?
हां.. कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है!

26.Vehicle?
रॉयल इन्फिल्ड ५-एस!

27.Something you’re not wearing?
हातातलं घड्याळ!

28.Your favorite store?
विंडो शॉपिंग आणि टाईमपाससाठी कोणतंही...!

29.Your favorite color?
काळा आणि त्याचे अनेक शेड्स!

30.When was the last time you laughed?
काल रात्री - सावंतवाडीवरुन छोकरीसाठी 'लाकडी मगर' आणली. तिच्याबरोबर खेळत मस्त हसवा-हसवी झाली!

31.Last time you cried?
२६ नोव्हेंबर २००८

32.Your best friend?
हा डब्बा - कंम्प्युटर!

33.One place that you go to over and over?
स्वयंपाकखोली... चटरपटर खाणं आणि बायकोनं बनवलेली आणि लपवुन ठेवलेली चॉकलेट्स शोधुन खाणं हा माझा आणि छोकरीचा आवडता उद्योग!

34.One person who emails me regularly?
बरेच आहेत... बर्याचदा फॉरवर्डेड ईमेल्स येतात, त्यामुळे नेमका एक सांगता येणार नाही!

35.Favorite place to eat?
मोजक्याच - पुण्यात = विमाननगरला - आंध्रा बिर्याणी, सातारा रोडवर सिटी प्राईडसमोरचं शिवनेरी, स.पेठेतलं दुर्गा, गोपी, कोथरुडचं तिरंगा, निसर्ग... त्यापैकी काही!

हा... तर संपल एकदाचं...
आता मी टॅगणार - अर्थातच बरेच लोक आहेत... या घडीला आठवलेले - महेंद्रजी, पंकज,रोहन चौधरी, भाग्यश्री, तन्वी, विशाल [दादा!], मंदार जोशी, विनायकराव, हरेकृष्णाजी, अजय, विक्रम, अनुक्षरे, सोनल, कांचन, सोनल, प्रभास गुप्ते....

नाताळाच्या शुभेच्छा!


Wednesday, 23 December 2009

ब्लॉगर - पोस्ट शेअरींग !

Sunday, 20 December 2009

ओळखीचे फायदे - तोटे

Wednesday, 16 December 2009

ब्लॉगर - लेखाच्या पाऊलखुणा दाखवा!

काही ब्लॉगवर आपण पाहिलं असेल की एखादी पोस्ट दाखवताना त्या पोस्टच्या वरती ती कोणत्या कॅटेगरीत आहे ती त्या लेखाच्या आधी लिंक करुन दाखवलेली असते. इंग्रजीत - टेक्निकली या प्रकाराला "ब्रेडक्रंब्स ट्रेल" असं म्हणतात. मला काय म्हणायचय हे समजायला थोडं कठीण आहे आणि मलाही ते सांगायला. पण खाली दिलेला स्क्रीनशॉट पाहुन आपल्याला कळेल, मला काय म्हणाचय ते.



आता हे कशासाठी करायचं? तर - एक तर तुमच्या विजिटर्सना सोपं नेविगेशन व्हावं आणि समजावं की ही पोस्ट - लेख कोणत्या प्रकारातला आहे. शिवाय सर्च इंजिनमध्येही आणखी एकदा त्या वर्गाची आणि शब्दाची गणती होते... आणि ती पोस्ट - लेख जरा वरती लिस्ट व्हायला मदत होते.

तर, ब्लॉगर वर एखादी पोस्ट लिहिल्यानंतर ती पोस्ट ज्या वर्गात मोडते ती दाखवण्यासाठी खाली दिलेली साधी ट्रिक वापरता येईल.

१. ब्लॉगरला लॉगिन करुन "लेऑऊट" आणि नंतर "Edit HTML" टॅबवर क्लिक करा.
२. नेहमीप्रमाणेच आपल्या टेंप्लेटची बॅकअप घ्या!
३. नंतर "Expand Widget Templates" पुढे क्लिक करुन कोड एक्सपान्ड करा.
४. आता, ही खाली दिलेली लाईन शोधा.
<b:includable id='post' var='post'>
याच्या खाली, ही खाली दिलेली लाईन शोधा

<div class="post hentry uncustomized-post-template">
किंवा
<div class="post hentry">
५. आता, त्या लाईनच्या लागलीच खाली, हा कोड पेस्ट करा.
<!-- Start breadcrumb trail-->
<b:if cond='data:blog.homepageUrl == data:blog.url'>
<b:else/>
<b:if cond='data:blog.pageType == &quot;item&quot;'>
<div class='breadcrumbsTrail'>
<a expr:href='data:blog.homepageUrl'><data:blog.title/></a> &#187;
<b:if cond='data:post.labels'><b:loop values='data:post.labels' var='label'>
<a expr:href='data:label.url' rel='tag'><data:label.name/></a>
<b:if cond='data:label.isLast != &quot;true&quot;'> &#187; </b:if>
</b:loop>
</b:if> &#187; <data:post.title/>
</div>
</b:if>
</b:if>
<!-- End breadcrumb trail-->

६. आता, "]]>" शोधा आणि त्याच्या लागलीच वरती, हा कोड पेस्ट करा.
.breadcrumbsTrail{
padding:5px 5px 5px 10px;
margin:0;font-size:95%;
line-height:1.4em;
}
७. टेंप्लेट सेव करा आणि एखाद्या पोस्ट वर क्लिक करुन पहा.
८. ती लाईन अशी दिसेल!

ब्लॉगचे नाव » वर्गाचे नाव » पोस्ट/ लेखाचे नाव

तुमच्या कमेंट्स?

Monday, 14 December 2009

शिक्षणाच्या आयचा घो!

महेश मांजरेकरांचा नवा चित्रपट "शिक्षणाच्या आयचा घो!" १५ जानेवारी २०१० ला प्रदर्शित होतोय. व्यवहारी शिक्षण आणि मुलभुत शिक्षणाच्या मुद्द्यावरचा विषय असणारा हा चित्रपट त्याच्या प्रोमो पाहिल्यानंतर मला बराच 'आपल्यातल्याच एकाची स्टोरी' असल्यासारखा वाटला! शिक्षण घेत असताना "...घो!" म्हणण्याची एकदा तरी ईच्छा सर्वांनाच झाली असावी...!



मला तर नक्कीच झाली होती... मराठी माध्यमातुन शिक्षण... मग विज्ञान शाखा - इंग्रजीतुन असलं तरीही त्यातही मराठीचा स्वाद! मग पुण्यासारख्या ठिकाणी इंग्रजी माध्यमातुन शिकलेल्यांशी नोकरीसाठीची कसरत! त्यामुळं असा "घो!" घालणं साहजिकच होतं..!

पण शिक्षणाच्या माध्यमाशी वाद कधीच नव्हता. कारण आमच्या ठिकाणी इंग्रजी शाळाच नव्हत्या! मला मान्य होतं की आज ना उद्या मी ही व्यवहाराची भाषाही शिकुन घेईन. त्यामुळं मी 'लिटरेट' आणि 'एज्युकेटेड' असण्यामधला फरक ही समजुन गेलो. पण वाद आहे तो - आपण शिकलेलो, समजलेलो ज्ञान आपल्या जीवनात खरंच १००% उपयोगी पडतं का? उदाहरण द्यायचं तर - मी सायन्स ग्रॅज्युएट.. मग व्यवहारी - टेक्निकल कोर्स. पण माझ्या मुख्य पदवीचा - विज्ञान - चा मला फायदा झाला का? पदवीनंतर मला फक्त एकदाच - सुरुवातीच्या मुलाखतीत - रसायनशास्त्रावर एकच प्रश्न विचारला होता. कदाचित ते मुलाखत घेणारेही विज्ञान शाखेचे पदवीधर होते. त्यानंतर गेल्या दहा वर्षात आठवणीत रहावा असा एकही प्रसंग आला नाही. मला मान्य आहे की शिक्षण कधीच वाया जात नाही... पण .. कधी उपयोगी येणार हा ही एक प्रश्नच आहे.. कदाचित माझ्या मुलीस मी चांगल्यापैकी विज्ञान शिकवु शकेन!

  • १७ * ७ =?
    अं.. मला माहित नाही. एक मिनिट - मोबाईल मध्ये कॅल्क्युलेट करुन सांगतो.
  • अलाउदीन खिलजीचा जन्म कधी झाला?
    सांगतो ना - एक मिनिट - विकिपिडिया.कॉम किंवा गुगल.कॉम!

तुम्हाला वाटतंय - एका विद्यार्थ्याच्या अयुष्यात हे प्रश्न ती इयत्ता सोडली/ परिक्षा सोडली तर यासारखे प्रश्न कधी येतील? हां एक चान्स आहे - जर तुम्ही एखाद्या रीएलिटी शो मध्ये गेलात तर - पण त्याचा चान्स कीती?

लहानपणापासुनच आपल्या मुलाने/ मुलीने हे व्हावं/ ते बनावं असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. कदाचित जे बननं आपल्याला जमलं नाही, ते आपल्या अपत्यानं बनावं अशीही काहींची अपेक्षा असते. मग आपल्या अपत्याकडुन त्यासाठी प्रयत्न करवुन घेतले जातात. त्याला/ किंवा तिला जर खेळात/ नृत्यात करीअर करावं वाटत असेल तरी आपल्या मर्जीखातर ते तिला इंजिनिअर/ डॉक्टर बनवतात.. काहीजण बनतातही आणि काहीजण मग तो आत्महत्येचा नंबर [१६००] वाढवतात!

बरं, शिक्षण घेतलेल्या क्षेत्रातच नोकरी मिळेल याची शाश्वतीही नसते/ नाही!.. उदाहरण - गेल्या काही दिवसांतील पोलिस भरती - सैन्य भरती ला हजर असणार्‍यांच्या संख्येकडे पाहिल्यास जाणवते की, १२ वी पासची अट असणार्‍या या भरतीला पदवीधर - वकील - इंजिनिअर मुलं हजर होती. त्यांनी ही हा असा "घो" घातलाच असेल!

शिक्षणासाठी - व्यवहारीक शिक्षणासाठी - नावारुपास आलेल्या आणि अचानक बंद झालेल्या ए.एच ए. - राय इंस्टिट्युट - बालाजी इंस्टिट्युट या सारख्या शैक्षणिक संस्था करीअर बनवता - बनवता एक दिवस विद्यार्थ्यांनाच बनवतात! सोमवारी - मनसे च्या कार्यकर्त्यानी असंच ए.एच ए. च्या विद्यार्थ्यांबरोबर "भीक मांगो आंदोलन" केलं.

अगदी बालवाडी पासुन - पदवी पर्यंत डोनेशन्स, भरगच्च फीस, पुस्तके यांचा खर्च झेलावा लागतो. अगदी बाजारी रुप आलय या सार्‍या पद्धतीला! हे सारं झेलताना - करताना सारे पालकही खुश असतात असं नाही ना. काहींनी तर अगदी कर्ज काढुन डोनेशन्स आणि फीस भरलेल्या असतात. ज्यांना कर्ज मिळत नाही ते सावकारापर्यंतही जातात! त्यांनी अशा या शिक्षणाला नमस्कार घातला असेल असं मला वाटत नाही.

एक विद्यार्थी म्हणुन माझ्या मनात जेंव्हा हा "घो" आला असेल, त्याच्या कीती तरी आधी माझ्या आई-वडिलांनी हा तो घातला असेल!

विषय मोठा आणि वादाचा आहे. थांबतो आता! अरे हां, या चित्रपटाबद्दल अधिक माहिती या लिंकवर आहे. शिवाय फेसबुकवर याचा प्रोमोही पहायला मिळाला.
पोस्टर - चित्रपटाच्या नावासोबत - सक्षमचा फोटो जोडलायः साभार इरॉस

Tuesday, 8 December 2009

ब्लॉगर कमेंट्स - तुमचे रिप्लाय ठ़ळकपणे दाखवा!

ब्लॉग वर आलेल्या कमेंट्सना रिप्लाय देणे हा ब्लॉग - एटिकेट्स एक भाग असतो. त्यामुळे तुमच्या विजिटर्स सोबत एक संवादही सांधता येतो. आता हे रिप्लाय देताना गरज वाटते ती स्वतःच्या, म्हणजे ब्लॉग कर्त्याच्या कमेंट्स ऊठुन दिसण्याची. त्यामुळे दिलेली कमेंट ही 'रिप्लाय' आहे हे जाणवते.



उदा. दयायचे तर - माझ्या ब्लॉगवर मी दिलेले रिप्लाय जरा वेगळे - उठुन दिसताहेत. त्यांच्याभोवती बॉर्डर आहे, शिवाय भुंग्याचे चित्रही आहे. अच्छा, मला काय म्हणायचे आहे ते समजले तर! ठिक, तर हा प्रकार तुमच्या ब्लॉगवर कसा करता येईल, ते पाहु!

०. सर्वात महत्त्वाचे म्हणजे - आपल्या टेंप्लेटचे बॅकअप घ्या - "Download Full Template" या लिंकवर क्लिक करुन ते सेव करा. काही अडचण झाल्यास आपणास ते पुन्हा अपलोड करता येईल!
१. ब्लॉगरला लॉगिन करुन "लेआऊट" वरुन - Edit HTML टॅब क्लिक करा.
२. 'Expand Widget Templates' च्या समोर असणारा चेबॉक्स् चेक करा, म्हणजे संपुर्ण कोड दिसेल.
३. आता, कमेंट्स दाखवणारा कोड शोधु.. हा खाली दिलेला कोड शोधा -

<dd class='comment-body-bhunga'>
<b:if cond='data:comment.isDeleted'>
<span class='deleted-comment'><data:comment.body/></span>
<b:else/>
<p><data:comment.body/></p>
</b:if>
</dd>

४. आता त्याच्या जागी - तो डिलिट करा किंवा सिलेक्ट करुन त्याच्यावर खाली दिलेला कोड पेस्ट करा.
<b:if cond='data:comment.authorUrl == &quot;http://www.blogger.com/profile/PasteYourProfileNumber&quot;'>

<dd class='comment-body-admin'>
<b:if cond='data:comment.isDeleted'>
<span class='deleted-comment'><data:comment.body/></span>
<b:else/>
<p><data:comment.body/></p>
</b:if>
</dd>

<b:else/>

<dd class='comment-body'>
<b:if cond='data:comment.isDeleted'>
<span class='deleted-comment'><data:comment.body/></span>
<b:else/>
<p><data:comment.body/></p>
</b:if>
</dd>
</b:if>
५. वरती पहिल्या ओळीत - PasteYourProfileNumber च्या जागी तुमच्या ब्लॉगरचा प्रोफिईल नंबर टाका. हा ' प्रोफिईल नंबर' प्रत्येकाच वेगवेगळा असतो.
तो पाहण्यासाठी ब्लॉगरच्या डॅशबोर्डवरुन 'View Profile' या लिंकवर क्लिक करा. तुमच्या प्रोफाईल पेज दिसेल. आता त्या लिंक मध्ये शेवटी दिसणारा नंबर म्हणजे - प्रोफाईल नंबर!
६. आता ' ]]></b:skin> ' च्या लगेच वरती खाली दिलेला कोड पेस्ट करा.
.comment-body-admin{
width:300px;
border-style: solid;
border-top: 1px solid #FFD129;
border-right: 1px solid #ffd129;
border-left: 1px solid #ffd129;
border-bottom: 3px solid #ffd129;
-moz-border-radius: 3px;
background-color: #f5f6f7;
margin-top: 5px;
margin-bottom: 15px;
font-size:13px;
line-height:20px;
padding: 10px 10px 10px 95px;
background:#fff url(http://LinkToYourPicture.jpg) no-repeat 0 bottom;
min-height: 100px;
}
७. वरच्या कोड मध्ये 'http://LinkToYourPicture.jpg' च्या जागी तुमच्या फोटोची लिंक पेस्ट करा. फोटो शक्यतो छोटाच असावा.
८. 'सेव टेंप्लेट' करुन एखाद्या कमेंट्ला उत्तर द्या - किंवा तुम्ही दिलेलं उत्तर शोधा आणि पहा - तुमची कमेंट वेगळी दिसते का!
९. नं. सहा मध्ये जे '#FFD129' हे असे कलर कोड आहेत त्याजागी तुम्ही तुमच्या डिझाईनला अनुसरुन कलर कोड लिहा. '#FFD129' च्या जागी 'blue' लिहिला तरी चालेलच!

आता तुमच्या कमेंट्स येऊ दयात..... :)

Friday, 4 December 2009

दि ग्रेट पुणेरी हेल्मेट शो!

टाईम्सच्या "पुणे मिरर" या पुरवणीमध्ये गेल्या काही दिवसांपासुन हेल्मेट वापरा संबधीत मोहीम चालु आहे. रोजच हेल्मेट वापरणारे आणि न वापरणारे यांची मते प्रकाशित केली जातात. हेल्मेटला विरोध करणार्‍यांची काही कारणे आणि अडचणीपैकी मी थोडक्यात जमवलेल्या काही अडचणी:


[असं चित्र काढण्याची आयडीया - 'दि लाईफ' वाल्या 'सोमेश'च्या च्या पोस्ट वाचुन आली!]

१. हेल्मेट वापरल्याने केस गळतात!
अहो आश्चर्यम! नविनच शोध!! - असेलही - मी माहिती - तंत्रज्ञात जरा मागासलेला आहे. जरा त्या शोधाबद्दल माहिती मिळेल का? आणि तसंपण - अ‍ॅक्सिडेंड नंतर चुराडा झालेल्या डोक्यावर केस असले काय अन् नसले काय - काय फरक पडतो. तुम्ही काय जगप्रसिध्द सेलिब्रेटी आहे का काय - की लोक तुमचे केस ताईत बनवुन गळ्यात घालतील? ऑ?

२. मोबाईलवर बोलता येत नाही!
हां, एका हाताने ड्राइव करत दुसर्‍या हाताने मोबाईलवर बोलत जाणार्‍यांसाठी हेल्मेट ही फार मोठी अडचण आहे! पण फोन वाजलाच तर गाडी बाजुला उभी करुन बोलता येतंच की. हेल्मेट घातल्याने तोंड थोडच बंद होतं? शिवाय ब्लु - टुथ चा पर्याय आहेच की! बरेच लोक हेल्मेट घालुनही कानात इअर-फोन लावतातच - ते कधी अशी बोंब नाही मारत!

३. वागवायचे / कॅरी करायचे कुणी?
काय राव, मोबाईलच्या बाबतीत - ऑफिसच्या बॅगच्या - जेवणाचा डब्बा आणत असाल तर - असा कधी विचार आलाय मनात. ते कॅरी करताच ना? शिवाय बाईकला लॉकर बसवुन घ्या..!

४. लोकांचे चेहरे पाहता येत नाहीत!
मला वाटतं तुम्हाला 'मुलींचे' चेहरे पाहता येत नाहीत, असं म्हणायचं आहे! कॉलेज जवळच्या रस्त्यावरुन जाताना किंवा रस्त्यावरही चालु असलेलं हे "निरीक्षण आणि गणना" आम्हीही बर्‍याचदा पाहिली आहे राव. पण सध्या 'मुली' ही ते स्कार्फ बांधुनच मग ??

५. पान - गु-टखा - तंबाखु चं काय?
काय म्हणजे? जर खायचं असेल तर आतल्या आत थुंकायला - म्हणजे - गिळायला शिका. तुमच्या या रंगकामामुळे बरीच जनता आणि इमारती आधीच रंगल्या आहेत!

६. हेल्मेट जड आहे!
अहो, चांगल्या ब्रँडचं - हलकं घ्या.. ड्रेस.. मोबाईल.. शुज अशा वस्तु आपण कसं शोधुन - नाजुक - हलकं घेतो नां, तसंच हेल्मेटही घ्या ना!

मला वाटतं पवार साहेबांच्या काळात - १ जुलै १९८९ रोजी नवा मोटारवाहन कायदा अस्तित्वात आला आणि तेंव्हापासुन हेल्मेटसची सक्ती, कायदेशीर रीत्या आहे. हा कायदा भारत सरकारने देशभर लागू केला असल्याने फक्त महाराष्ट्र सरकारच्या किंवा एखाद्या मंत्र्याच्या नावे बोंब मारण्यात काही तथ्य वाटत नाही!

दोस्त, हेल्मेट वापरायचं किंवा नाही हा मुद्दा जेवढा खेचावा तेवढा वाढणारा आहे. जरा आसपास होणारे अपघात बघ - त्यात मरणारे - अपंग होणारेही आधी असाच वाद घालत होते! त्यांच्या घरच्यांनी काय गमावलंय हे बघ! आज तारुण्याच्या मस्तीत वा धुंदीत झालेला एक अपघात तुला किंवा दुसर्‍या कायमचा अपंग करु शकतो. व्हीलचेअर वरची व्यक्ती रीयल लाईफ मध्ये जगणं सोपं नाही रे! हां आता तू जर हे सारं धुडकावुन 'जाणार'च असशील तर जा - उगाच 'जाणार्‍या'ला अडवु नये! पुन्हा भेट होईल - न होईल म्हणुन आधीच ही प्रार्थना - मृतात्म्यास शांती लाभो!